मंत्र्याच्या कमरेला पिस्तुल
By Admin | Updated: March 31, 2015 22:51 IST2015-03-31T22:51:31+5:302015-03-31T22:51:31+5:30
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अनेकांना त्यांच्या स्वत:च्या अपक्वपणावर आणि बालिशपणावर एवढ्या दिवसानंतरही उठता आले नाही

मंत्र्याच्या कमरेला पिस्तुल
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अनेकांना त्यांच्या स्वत:च्या अपक्वपणावर आणि बालिशपणावर एवढ्या दिवसानंतरही उठता आले नाही. त्यातल्या काहींची वक्तव्ये वाचली व ऐकली तरी या गड्यांना नेमके काय म्हणायचे आहे आणि विकासाचा कोणता कार्यक्रम त्यांच्यापुढे आहे ते कळत नाही. मोदींच्या मंत्रिमंडळात निरांजना किंवा प्राची यासारखे जे नमुने आहेत त्यांच्याच या मराठी आवृत्त्या आहेत. गिरीश महाजन या मंत्र्याने कमरेला पिस्तुल लटकवून जळगावच्या शाळकरी मुलांसमोर परवा जे भाषण ठोकले तो याच पोरकटपणाचा सरकारी अवतार आहे. ‘मी माझ्याजवळ स्वसंरक्षणार्थ पिस्तुल बाळगतो’ असे त्याने आपल्या वर्तनाचे समर्थन करणे हा तर त्याच्या बावळटपणाचाही कळस आहे. या मंत्र्याला लाल दिव्याची गाडी आहे. त्याच्या सुरक्षेसाठी शस्त्रधारी जवान तैनात आहेत. त्याच्या मागेपुढे सशस्त्र पोलिसांच्या गाड्या फिरणाऱ्या आहेत. एवढ्या सगळ्या व्यवस्थेनंतरही त्याला आपल्या कमरेला पिस्तुल ठेवावे लागत असेल आणि ते शाळकरी पोरांसमोर मिरवण्याची हौस तो फिटवित असेल तर ती त्याला मंत्रिमंडळात आणणाऱ्या व्यक्तींच्याही माणसांची पारख करण्याच्या कुवतीवर प्रकाश टाकणारी बाब आहे. मुख्यमंत्री म्हणतात ‘त्यांच्याजवळ पिस्तुलाचा परवाना आहे’. मात्र असे सारेच परवानाधारक कमरेला पिस्तुल लटकवून रस्त्यात फिरू लागले तर? दारूची परमिटेही अनेकांजवळ आहेत. पण त्यामुळे हातात बाटली घेऊन रस्त्याने हिंडण्याची परवानगी वा मान्यता त्यांना मिळते काय? मोदींना पिस्तुलाची गरज नाही, मनमोहनसिंगांना ती कधी पडली नाही, ज्यांच्या कुटुंबातली दोन माणसे शस्त्राचाऱ्यांच्या हल्ल्यात बळी पडली त्या सोनिया गांधींना पिस्तुल बाळगावेसे कधी वाटले नाही. फार कशाला, हजारो नक्षल्यांना तुरुंगाची वाट दाखवणाऱ्या आर.आर. पाटलांनाही ते जवळ असावेसे कधी वाटले नाही. गिरीश महाजनांना अशा कोणाचे भय आहे की त्यांना त्यांची सध्याची सुरक्षा व्यवस्था अपुरी वाटावी? त्यांनी आपल्या असुरक्षेचे भय गृहमंत्रिपद ज्यांच्याकडे आहे त्या मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की नाही? की मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे कळूनही त्याकडे दुर्लक्षच केले? (खरे तर अशा बालिश गोष्टी दुर्लक्षिण्याजोग्या असतात. त्याची एवढी दखल घेण्याचे कारण एका मंत्र्याने तिचे मुलांसमोर केलेले जाहीर व काहीसे असभ्य समर्थन हे आहे.) महाराष्ट्र हे सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा खून करणाऱ्यांचे राज्य होत असल्याची शंका दाभोलकर आणि पानसरे यांच्या खुनामुळे दृढ झाली. सुधारणावादाचा पुरस्कार करणाऱ्यांबाबत परंपराभिमान्यांकडून दिली जाणारी वक्तव्ये पाहता ही शंका रास्त असल्याचेही अनेकांना वाटते. ती घालविण्यासाठी योग्य ती कारवाई सरकारकडून होताना न दिसणे आणि ‘पोलीस तपास की सीबीआय’ अशी टोलवाटोलव त्याच्याकडून होणे हा प्रकारही या संशयाला बळकटी देणारा आहे. काहींना हे हवेच आहे आणि बंदोबस्त करणाऱ्या यंत्रणा हतबल आहेत असे चित्र या काळात उभे राहिले आहे. मात्र या प्रकाराचे भय गिरीश महाजनांनी बाळगण्याचे कारण नाही. ते मंत्री आहेत आणि सुरक्षेच्या घेऱ्यात राहणारे आहेत. त्यांना विरोधक असलेच तरी ते राजकारणातले असणार व त्यांची तेवढीशी चिंता बाळगण्याचे कारण नसते. स्वत:च्या जिवावर उदार होऊन समाजाच्या विकासाची व सुधाराची कामे करणाऱ्या जमातीत ते नाहीत. त्यांना कोणाच्या धमक्या आल्या नाहीत आणि कोणाविषयी त्यांना तसा संशय असलाच तर तो पोलिसात सांगायलाही ते मोकळे आहेत. या स्थितीत त्यांनी उघडपणे शस्त्र बाळगणे हा या व्यवस्थेविषयी त्यांना वाटणाऱ्या अविश्वासाचा प्रकार आहे आणि ही व्यवस्था म्हणजे दुसरेतिसरे काही नसून ते ज्या सरकारात मंत्री आहेत ते सरकारच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गिरीश महाजनांच्या या वर्तनाची सरकारने दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारातील भाजपाने लाड चालविले असले तरी त्यासाठी अशा कारवाईपर्यंत त्याची मजल जाणार नाही. अखेर जनतेने व विशेषत: महाजनांच्या मतदारांनीच यातून काय तो धडा घ्यायचा आणि त्यांनाही तो शिकवायचा आहे. शाळकरी पोरांसमोर पिस्तुलाचे बेकायदा प्रदर्शन करणे हा गंभीर प्रकार आहे आणि त्याची नोंद अपराध या सदरातच होणे गरजेचे आहे. मंत्र्याने पिस्तुल बाळगले म्हणून उद्या आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी पिस्तुले कमरेला लटकावताना दिसले किंवा पूर्वीचे भालदार चोपदार सोबत बाळगताना दिसले तर ते परंपराभिमानी लोकांना आवडेलही. सध्या देशात परंपराभिमान्यांचे वर्चस्व वाढते आहे. ते या प्रकाराचे समर्थनही करतील. फक्त ते लोकशाहीत बसणारे नाही हे सांगणे येथे आवश्यक ठरते आणि गिरीश महाजनांसारख्या मंत्र्यापासून आपली मुले वाचवा आणि तुम्हीही चार हात दूर रहा हे नागरिकांना सांगणे भाग पडते. या निमित्ताने आपल्या मंत्रिमंडळातील अशाच बाष्कळ व पोरकट मंत्र्यांचा शोध घेणे ही मुख्यमंत्र्यांचीही गरज आहे. त्यांचे मंत्रिमंडळ तरुण असावे पण पोरकट नसावे एवढेच येथे सुचवायचे आहे. अखेर सरकार हा थट्टेचा नव्हे जनतेच्या आदराचा विषय असला पाहिजे.