मन वढाय वढाय
By Admin | Updated: February 23, 2015 22:45 IST2015-02-23T22:45:49+5:302015-02-23T22:45:49+5:30
खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मन’ या प्रसिद्ध कवितेतील हे कडवे आहे. बहिणाबार्इंचे शिक्षण वारकरी विद्यापीठात आणि मंदिराच्या पाठशाळेत झाल्यामुळे

मन वढाय वढाय
डॉ. दिलीप धोंडगे -
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर
खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मन’ या प्रसिद्ध कवितेतील हे कडवे आहे. बहिणाबार्इंचे शिक्षण वारकरी विद्यापीठात आणि मंदिराच्या पाठशाळेत झाल्यामुळे संतांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्या एकंदर विचारपद्धतीवर झालेला होता. माया, मोह, मद, मत्सरादी षड्विकारांचा मनाला प्रादुर्भाव होतो. असे विकारग्रस्त मन मग अनावर होते. संतांचे तत्त्वज्ञानदेखील हेच असते.
‘तुम्ही करा रे भजन । ऐका रे कीर्तन ।।
नका होऊं रे राकेस । शुद्ध ठेवा मन ।।
असं म्हणणाऱ्या बहिणाबार्इंना माणसाचा राक्षस होऊ नये याचे अगत्य वाटते व यासाठी मन शुद्ध ठेवण्याची गरज प्रतीत होते. मन शुद्ध ठेवण्याचा त्यांना आकळलेला उपायही त्या सांगतात व तो उपाय म्हणजे भजन-कीर्तन हा असल्याचा स्पष्ट करतात. भजन-कीर्तन हा मंदिराच्या पाठशाळेतला स्वाध्याय आहे. मन शुद्ध नसलं तर मनुष्य राक्षस होतो. कारण मन हे ओढाळ आहे. दोन वेळा ‘वढाय’ हा शब्द आलेला आहे. द्विरुक्ती ही ते विशेषण ठसविण्यासाठी आहे. मनाचं वढायपण स्पष्ट करण्यासाठी बहिणाबार्इंनी एकदम चपखल प्रतिमा वापरली आहे. ती प्रतिमा म्हणजे ते ‘उभ्या पिकातलं ढोर’ अशी आहे. उभं पीक म्हणजे फळाफुलाला आलेलं पीक. त्याला उपभोगणारं मन हे ओढाळ मन. यामुळे ओढाळपण हे सार्थ होतं. पुढे हे ओढाळपण बहिणाबाई अधिक गडद करतात.
‘किती हाकला हाकला ।
फिरी येतं पिकावर ।।’
कितीही हाकला, हे ‘हाकला हाकला’ या द्विरुक्तीतून मांडले आहे. क्रियेचे आधिक्य सूचित करण्यासाठी वापरलेले क्रियापद मनाच्या आसक्तीचंही वर्णन करतं. पुन्हा ते मन पिकावर फिरून येतं. ढोराचं हे सहजस्वाभाविक वर्तन सर्वांच्याच निरीक्षणात आलेलं असल्यामुळे प्रतिपाद्य विषयाचे आकलन सहजसुलभ होते. पण ढोराच्या वर्तनामागे मनाची प्रेरणा कार्यशील असल्याचे काही मानसशास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट झालेले नाही. ढोराची प्रेरणा ही त्याला केलेल्या प्रतिबंधातून मुक्त होण्याची धडपड ही असू शकते व ही धडपड त्याच्या भुकेशी निगडित असू शकते. पण मानवाच्या बाबतीत मनाची प्रेरणा ही प्रधान असल्याचे सिद्ध झालेले आहे. म्हणून मनाला ओढाळ ढोराची प्राकृतिक उपमा दिलेली आहे. अमूर्त तत्त्व स्पष्ट करण्यासाठी मूर्त उपमानांचा वापर करावा लागतो. बहिणाबार्इंनी संतांच्या तत्त्वज्ञानाच्या संस्काराचा आपल्या प्रतिभेच्या साहाय्याने जो नवोन्मेष प्रकट केला, तो विलोभनीय होय. यादृष्टीने हे कडवे तत्त्वकाव्य होय.