मनाचिये गुंथी - दु:ख
By Admin | Updated: May 1, 2017 01:04 IST2017-05-01T01:04:56+5:302017-05-01T01:04:56+5:30
सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे - सगळे संत दु:खाबद्दल बोलतात. म्हणजे सुख एवढंसं पाहिजे असेल तर दु:ख पर्वताएवढं झेलावं लागतं

मनाचिये गुंथी - दु:ख
सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे - सगळे संत दु:खाबद्दल बोलतात. म्हणजे सुख एवढंसं पाहिजे असेल तर दु:ख पर्वताएवढं झेलावं लागतं. म्हणजे पुन्हा दु:खाची मिजास जास्त. ते मोठं असणार आणि ते सोसलं की इवलं सुख मिळणार. पण त्यासाठी कष्ट अपार, यातनाही खूप, वेदनाही भरपूर. ज्याची झोळी वेदनांनी ओथंबून आलेली त्याला सुख कुठेतरी ठिबकताना दिसेल. पण परमेश्वर हुशारच म्हणायला हवा. प्रत्येक दु:खाला तो सुखाची किनार देतो. म्हणजे आपल्या भवतीचं वातावरण तो असं बनवतो, निसर्गदत्त सौंदर्य असं खुलवतो की आपण मोहरतो. काही क्षण तरी आपण दु:ख विसरतो. माणसं सफरीला जातात, जंगलात घुसतात, पशू-पक्षी-प्राणी पाहतात. दूर कठीण पर्वतावर गिर्यारोहण करून वर आल्यावर पाण्याचा झरा दिसतो. हा निसर्गाचा चमत्कार म्हणावा की देवाची किमया. इतकं निर्मळ स्वच्छ सुंदर स्फटिकजल पाहताना मन प्रफुल्ल होतं. उत्तरेच्या टोकावर हिमालय साद घालतो. त्याचे ते अजस्त्र महाकाय रूप क्षणभर भेदरून सोडते पण नंतर तेच आपल्याला कुशीत घेते. आपण म्हणतो ऋषी-मुनी डोंगराच्या गुहेत दिसतात. पण ते कसे जात असतील? कसे राहत असतील? माणूस मर्त्य आहे हे एकदा मान्य केले की सगळे अमर्त्य आपले मित्र होतात. मग अगदी आपल्या अंगणात नाचणारी चिमणीही. फक्त डोळे उघडे ठेवून तिला पाहायला हवं. तिचे रंग पाहायला हवेत. मग घुबडही सुंदर दिसू लागते. त्याचं ते बसकं तोंड, मिचमिचे डोळे बघून आपण त्याला वाईट ठरवतो. परंतु कधी आपण त्याला जवळून निरखलंत तर तो आपला मित्रही होतो. कुत्रा हा तर असा प्राणी आहे की त्याचं कौटुंबिक स्थान हे मुलगा, आई, बाबा, भाऊ ह्यांच्यापेक्षा वरचं आहे. दोन कुत्रे पाळणारे एकत्र आले की त्यांचे संबंध पाहावेत, बोलणे ऐकावे. एक न समजणाऱ्या शब्दात कुत्र्याची जात गर्वाने सांगतो. दुसरा तोंडात बोटं घालून अबब म्हणतो. कित्येकदा अशा मित्रांचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी कुत्रे पाळले की कुत्र्याने त्यांना पाळलं असा प्रश्न पडतो. त्याचा लगान, आवड, प्रेमळपणा, स्वामिनिष्ठा यांच्या अगाध गोष्टी ऐकायला मिळतात आणि बापरे हे असे असते का? हे म्हणण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. त्यातून कुत्रं पाळणारी माणसं कुत्र्याचा संबंध चावण्यापलीकडे, इंजेक्शन्स घेण्यापलीकडे नसतो, असं मानणाऱ्या माणसांकडे इतक्या दयार्द्र, केविलवाण्या नजरेने पाहतात की असं वाटतं, त्या नजरेपेक्षा पटकन् पळत जावं आणि कुत्र्याची पपी घ्यावी. तर दु:खावर अजून एक रामबाण उपाय म्हणजे कुत्रे पाळणे. म्हणजे त्याच्याशी गप्पा मारण्यात, पोरं-बाळं होऊ देणं यात आयुष्य बऱ्यापैकी सरते. मग पुस्तक वाचणे, ज्ञान चौफेर करणे, एखादा परभाषेतला मेंदूला झिणझिण्या आणणारा चित्रपट पाहणे, उत्तम भाषण ऐकणे, कविता किंवा गाणे ऐकणे असे (फुटकळ) आनंद आपण शोधत नाही. म्हणजे कुत्रं मेलं म्हणून माझ्याजवळ ढसाढसा रडणारा मित्र आईला वृद्धाश्रमात सहज पोचवतो. वर आईला एक केअरटेकर ठेवलाय, असं अभिमानाने सांगतो त्याला दु:ख कसं सांगावं? कुत्रं जाणे!
- किशोर पाठक -