पक्षापेक्षा स्वत: मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा आणि उच्चकोटीचा अहंकार, नागपुरातील काँग्रेस नेत्यांमधील या गुणांमुळे एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या नागपुरात आता पक्ष अखेरच्या घटका मोजतो आहे. काँग्रेसच्या हातून महापालिका हिसकत भाजपाने हॅट्ट्रिक मारली. पाठोपाठ लोकसभा अन् विधानसभेच्या सहाही जागा जिंकत काँग्रेसमुक्त नागपूरचे अभियान पूर्ण केले. ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही, असे म्हणतात. पण नागपुरात ही म्हणही लागू पडत नाही. येथील काँग्रेस नेत्यांना एकामागून एक ठेचा लागत गेल्या. ठेच लागण्याचा दु:खद अनुभव पदरी असतानाही ते दुस-यांच्या मार्गात दगड कसे रचता येतील यातच गुंग झाले आहेत. नागपुरात गेल्या काही वर्षांपासून भाजपा पहिल्या क्रमांकावर अबाधित आहे. दुस-या क्रमांकासाठी मात्र मुत्तेमवार काँग्रेस व चतुर्वेदी काँग्रेसमध्ये लढत सुरू असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या निवडणुकीत चतुर्वेदी गटाला तिकिटा मिळू नये म्हणून मुत्तेमवार गटाने ताकद पणाला लावली. मतभेद टोकाला गेले. प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकण्यापर्यंत काळा दिवस पाहण्याची वेळ आली. तेव्हा त्या काळात काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन गावोगाव फिरणा-या निष्ठावंतांच्या मनावर काय परिणाम झाला असेल, याचा विचार करायलाही कुणाला वेळ नाही. याला अडवा, त्याला जिरवा, असा एककलमी कार्यक्रम काँग्रेस नेत्यांनी आखला आहे. निवडणुकीनंतर मुत्तेमवार गटाने आग्रह धरल्याने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. आता सर्व काही शांत होईल, गटबाजी संपेल असे हायकमांडला अपेक्षित होते. मात्र, झाले उलटेच. चतुर्वेदी समर्थक पुन्हा एकजूट होऊन समोर आले अन् कारवाईच चुकीची असल्याचा आलाप घेत दिल्लीत पोहचले. त्यांच्या पाठोपाठ मुत्तेमवार गटही चतुर्वेदींवरील कारवाई कशी योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी दिल्लीत पोहचला. त्यांनीही कौशल्य पणाला लावले. मागील दोन दिवस दोन्ही शिष्टमंडळं दिल्ली दरबारी एका नेत्याकडून दुस-या नेत्याकडे फिरत होती. गल्लीत गोंधळ घातल्यानंतर काँग्रेसनेते दिल्लीत हायकमांडसमोर मुजरा घालत होते. एकमेकांवर दोषारोप करीत होते. तर दुसरीकडे त्यांच्या या कृतीतून आधीच उतरती कळा लागलेली काँग्रेस आणखी कमकुवत होत होती. दोन्ही गट एकमेकांवर भाजपाचे हस्तक असल्याचा उघड आरोपही करीत होते. मात्र, कुणीही आजपासूनच भाजपाच्या विरोधात रान पेटवितो, असे म्हणत पक्षाची बीजं नव्याने पेरण्याचे आव्हान स्वीकारत नव्हते. ज्याची खरी आज गरज होती. नेत्यांच्या भांडणात काँग्रेसचे पीठ होतयं अन् त्या पीठाच्या भाकरी शेकण्याची आयती संधी भाजपाला मिळतेय. यावर काँग्रेस जनांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे.
गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:32 IST