माया-ममता
By Admin | Updated: March 2, 2015 09:52 IST2015-03-02T00:36:57+5:302015-03-02T09:52:11+5:30
परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्तीही नाही, असं समजणं हीदेखील परमेश्वरी माया होय. तर परमेश्वराचं आनंद हे स्वरूप असून

माया-ममता
डॉ. कुमुद गोसावी -
परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्तीही नाही, असं समजणं हीदेखील परमेश्वरी माया होय. तर परमेश्वराचं आनंद हे स्वरूप असून, जाणीव हे त्याचं रूप आहे आणि शक्ती हा त्याचा गाभा आहे, हे समजणं म्हणजे तो मायारहित विचार होय.
‘सुखानं जगा आणि जगू द्या!’ या धारणेला खरा धर्म म्हणतात. माणसानं निर्माण केलेल्या मूर्तिपूजेतच केवळ गुंतून न राहता विश्वातील प्रत्येक माणूस हीच साक्षात परमेश्वरानं निर्माण केलेली परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे या सत्याची जाणीव ‘मायाच’ आपल्याला होऊ देत नसेल तर तिला बाजूला सारून संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागायला हवं.
जे जे भेटेल भूत ।
ते ते मानिजे भगवंत ।
असं संतांनी केवळ सांगितलं नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आणलं. म्हणून तर संत एकनाथ महाराज यांनी पैठणच्या वाटेवरून उत्तरकाशीतून आणलेलं गंगाजल रामेश्वराला परंपरेनुसार अर्पण करण्यासाठी वाहून नेताना तहानेनं तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखी घालून त्याचे प्राण वाचविले नि सोबतच्या लोकांनी आता रामेश्वराचं काय? असं विचारताच सहज उत्तर दिलं की, ‘हे गाढव म्हणजेच माझा रामेश्वर!’ प्राण वाचल्यानं आनंदित होऊन उठलेलं गाढव पाहण्यात ज्याला परमेश्वर पाहता
आला त्याच्यावर मायेचा प्रभाव पडेलच कसा?
दिसो परतत्त्व डोळा ।
पाहो सुखाचा सोहळा ।
रिघो महाबोध सुकाळा ।
माजी विश्व ।।
असं ज्ञानदेव माउलीने म्हटलं आहे तेही मोठं लक्षणीय आहे. कारण आपल्या डोळ्यांना परतत्त्व पाहण्याचा सुखसोहळा लाभणं कोणाला नको आहे?
झाडावर राहणारे दोन पक्षी दिसतात एकसारखे; मात्र एक झाडाची फळं खाणारा, तर दुसरा न खाणारा म्हणजे मोठा हुशार आणि ज्ञानी मानायचा का? आणि फळ खाणारा अज्ञानी आहे असे म्हणायचं का? इथं ‘माया’ भ्रम आणि ज्ञान- डोळसपणा म्हणजे बद्ध आणि मोक्ष असा संबंध जोडला जातो. त्यातील सूत्र ध्यानी घेता मायेचं डोळ्यांवरील पटल दूर सारल्याशिवाय माणसाला खरं आत्मरूपही दिसू शकत नाही.
निजवृत्ती काढी सर्व ‘माया’ तोडी ।
इंद्रिया सवडी लपू नको । ।
असं संत ज्ञानदेव माउलीने अत्यंत आत्मीय भावानं आपल्याला सांगून ठेवलं आहे. तेव्हा आपणच आपल्या वृत्ती माया-मोहपाशात अडकू न देता इंद्रियजन्य विकारांवर जय मिळवून ताब्यात ठेवल्यास आपलाच अवघा जीवन व्यवहार चैतन्यानंदाची स्फुल्लिंग चेतवतच पुढं पुढं होत राहणार, आयुष्याचं सोनं होणार! हा विश्वास ज्ञानदेव माउलीने दिला आहे.