माथेरानकरांचे गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 23:28 IST2017-02-08T23:28:43+5:302017-02-08T23:28:43+5:30
माथेरान म्हणजे मुंबई नव्हे, कुणीही आले आणि जमिनी घेऊन हवे तसे मालक वा बिल्डर झाले. हव्या तशा झोपड्या बांधल्या आणि झोपड्यांचे इमले करून पुन्हा बिल्डरला देऊन टॉवर उभे केले

माथेरानकरांचे गाऱ्हाणे
माथेरान म्हणजे मुंबई नव्हे, कुणीही आले आणि जमिनी घेऊन हवे तसे मालक वा बिल्डर झाले. हव्या तशा झोपड्या बांधल्या आणि झोपड्यांचे इमले करून पुन्हा बिल्डरला देऊन टॉवर उभे केले. हे सगळे मुंबईसारख्या मायानगरीत शक्य आहे. कारण मायानगरीच ती, तिथे कोण कुणाला रोखणार? पण मुंबईच्याच बाजूला असे एक निवांत गाव असावे जिथे कुणी निसर्गावर अतिक्र मण करू नये, जिथे निसर्ग जिवंत राहावा असा तब्बल १५० ते १६५ वर्षांपूर्वी इंग्रजांनी प्रयत्न केला. १८५० साली मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फीस्टन्स यांनी मुंबईच्या बाजूला थंड हवेचे ठिकाण असावे म्हणून माथेरानला हिल स्टेशनचा दर्जा दिला.
१९०७ साली आदमजी पिरभॉय यांनी २० किमी लांबीच्या माथेरान लाईट वेट रेल्वेची उभारणी केली. त्याचवेळी इंग्रज सरकारने या पठारावरील जवळपास ५०० एकर जागा मुंबईच्या धनिक बंगलेवाल्यांना दिली, तर उरलेली केवळ ५४ एकर जागा स्थानिक गावकऱ्यांना राहण्यासाठी दिली. तसे पाहिले तर हा शुद्ध अन्याय आहे. पण पैशाने सगळे विकत घेता येते हे धनिकांनी इंग्रजांच्या काळातही दाखवून दिले. बंगलेवाले केवळ विकेण्डला या हिल स्टेशनवर येतात, तर गावकरी पर्यटकांना सेवा-सुविधा पुरवणारे व्यवसाय चालवून आपले पोट भरतात. देश स्वतंत्र झाला तेव्हा माथेरानची लोकसंख्या ७०० ते ८०० एवढी होती. आज ६५ वर्षांत ती ४३८८ इतकी वाढली आहे.
लोकसंख्या वेगाने वाढतेय, येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील वाढत आहे, पण जमीन मात्र इंचभरही वाढत नाही. उलट हवामान बदलाच्या परिणामांमुळे पर्यावरणाचे नियम मात्र जाचक होत चाललेत. माथेरानवर जमीन वाढू शकत नाही ही स्पष्ट बाब आहे, आणि माथेरान हे पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील ठिकाण आहे. त्यामुळे या पठारावर किती लोकांनी राहायचे, किती बांधकाम करायचे तसेच किती झाडे तोडायची या प्रत्येक गोष्टीला काही बंधने आहेत. फक्त विषय एवढाच आहे की, स्थानिक महसूल, वन आणि नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी पैसेवाल्यांना आणि पोट भरणाऱ्या स्थानिकांना एकच नियम लावायला हवा एवढीच अपेक्षा आहे.
सध्यातरी माथेरानकरांचे म्हणणे एवढेच आहे की, आम्ही सरकारने दिलेल्या जमिनीवर बांधलेल्या आमच्या घराच्या वर केवळ एकच मजला बांधकाम चढवले आहे, ते हरित लवाद का पाडतेय? बांधकाम पाडायचे हादेखील पर्यावरणाचा एक प्रकारचा ऱ्हासच नाही का? मात्र ही गोष्ट ना पर्यावरणवाल्यांच्या लक्षात येते, ना दिल्लीत बसलेल्या हरित लवादाच्या. तोफेची सलामी द्यायची एवढे सगळ्यांना कळते; पण तोफेच्या तोंडाला येणाऱ्यांचे काय याचा विचार मात्र कोणीच करत नाही, हीच माथेरानकरांची खंत आहे...