मस्तवाल अण्वस्रधाऱ्यांची दांडगाई

By Admin | Published: April 26, 2017 11:21 PM2017-04-26T23:21:44+5:302017-04-26T23:21:44+5:30

सत्तेच्या सार्वभौम अडणीवर एखादा गुंड बसला असेल आणि त्याच्या हातात अण्वस्रांची सारी सूत्रे असतील तर त्याला सांभाळून

Mastval fireballs | मस्तवाल अण्वस्रधाऱ्यांची दांडगाई

मस्तवाल अण्वस्रधाऱ्यांची दांडगाई

googlenewsNext

सत्तेच्या सार्वभौम अडणीवर एखादा गुंड बसला असेल आणि त्याच्या हातात अण्वस्रांची सारी सूत्रे असतील तर त्याला सांभाळून, समजावून आणि गोंजारूनच इतरांना त्यांचे राजकारण चालवावे लागते. उ. कोरियाचा हुकूमशहा किम ईल सुंग हा असा अण्वस्रधारी गुंड आहे आणि तो केव्हा काय करील याचा अंदाज त्याच्या निकटवर्तीयांनाही बांधता येत नाही. साऱ्या अमेरिकेची राखरांगोळी करू अशी उद्दाम भाषा वापरणाऱ्या या सुंगने त्याच्याजवळ असलेली संहारक अण्वस्रे व ती वाहून नेणारी शक्तिशाली क्षेपणास्रे त्याच्या देशाच्या वार्षिक महोत्सवात जगाला नुकतीच दाखविली. द. कोरिया, जपान व पॅसिफिक महासागराच्या पूर्व सीमेवरील लहान देश त्यामुळे पार हतबुद्ध झाले आहेत. त्याला आवर घालायला अमेरिकेने आपल्या विमानवाहू अण्वस्त्रसज्ज नौका पॅसिफिक महासागरात उतरविल्या असल्या व त्यांच्यासोबत जपान आणि द. कोरियाचे नौसैनिक युद्धाच्या कवायती करीत असले तरी त्यांचे तसे करणे त्या बेभरवशाच्या हुकूमशहाला डिवचण्यासारखे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे एका वेळी उ. कोरियाचा बंदोबस्त स्वबळावर करण्याची भाषा बोलतात आणि दुसऱ्याच क्षणी त्याला आवरायला चीन सरकारची मदत घेऊ असे म्हणतात. सुंग हा आपल्या जनतेला अर्धपोटी व नेमून दिलेल्या वस्रांवर जगायला लावणारा आणि देशाची सारी संपत्ती युद्धप्रयत्नांवर एकवटणारा माथेफिरू राज्यकर्ता आहे. त्यांच्या सत्तेवर टीका करणाऱ्या बापांच्या मुलांना कैदेत डांबणारा तो हुकूमशहा आहे. आपल्या हाताने आपल्या सेनापतीवर, तो त्याचा चुलता असतानाही गोळ्या घालण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. अलीकडेच त्याने आपल्या पत्नीवरही गोळ्या झाडल्याची वदंता माध्यमात आहे. अशा माणसाला धमकावणे वा चिथावणे जेवढे धोक्याचे तेवढेच त्याला मोकळे ठेवणे हेही संकट जिवंत राखण्यासारखे आहे. सुंगशी चीनची मैत्री आहे. त्याच्या देशाचा ७५ टक्क्यांएवढा व्यापारच चीनशी आहे. त्याच बळावर त्याने त्याच्यावर लादलेल्या आर्थिक व इतर निर्बंधांना तोंड दिले आहे. मात्र चीनला त्याच्या राजकीय उद्दामपणाशी फारसे देणे-घेणे नाही. अमेरिका व इतर पाश्चात्त्य देश यांना धाकात ठेवण्यासाठी उ. कोरियाचे दांडके हाताशी असणे त्यालाही लाभाचे वाटते. रशिया या साऱ्या प्रकारापासून दूर आहे. दरम्यान अमेरिकेने सिरियात मोठा बॉम्ब टाकल्याची घटना उ. कोरियाने गंभीरपणे घेतली आहे. असा हल्ला अमेरिका आपल्यावरही करू शकेल या भीतीने तो उद्या काय करील याची चिंता अमेरिकेलाही आहे. ‘मनात आणले तर काही क्षणात आम्ही उ.कोरिया हा देश नकाशातून नाहीसा करू’ असे एकेकाळी हिलरी क्लिंटन म्हणाल्या होत्या. अणुयुद्धाची नेमकी भीती हीच आहे. अस्र सुटेपर्यंतच त्याची काळजी करता येते. ते एकदा सुटले की मग फक्त त्याचे परिणामच पहावे लागतात. त्यामुळे अण्वस्रांचा मारा प्रथम कोण करतो हेच महत्त्वाचे ठरते. उ. कोरियाने असे करू नये आणि अमेरिकेनेही त्याचा अवलंब करू नये असे जगभरचे युद्धशास्त्राचे जाणकार सध्या म्हणत आहेत. मात्र सुंग यांची दंडेली वाढत आहे आणि ट्रम्प यांना स्वत:ची लोकप्रियता सांभाळायला वा राखायला काहीतरी करायचे आहे. त्यामुळे हे दोन्ही देश व परिणामी सारे जगच युद्धाच्या तोंडावर उभे झाले आहे. चीनचे अध्यक्ष झी शिपिंग अमेरिकेशी गोड बोलतात. मात्र ते सुंगवर दबाव आणताना कुठेही दिसत नाहीत. दोघांनाही एका भीतीच्या छायेत ठेवण्याचे त्यांचे राजकारण त्यांच्या लाभाचेही आहे. चीनला अमेरिकेकडून अनेक गोष्टी पदरात पाडून घ्यायच्या आहेत. त्याला ‘एक चीन’चा नारा सिद्ध करायचा आहे. अरुणाचल हा भारताचा प्रदेश ताब्यात घ्यायचा आहे. जपानला जरबेत ठेवायचे आहे आणि जपानच्या अनेक बेटांवर ताबा सांगायचा आहे. जपानच्या शेजारी त्याने समुद्रात बांधलेला कृत्रिम लष्करी तळही त्याला जगाकडून मान्य करून घ्यायचा आहे. त्यासाठी त्याला सुंगच्या दंडेलीचा उपयोग करता आला तर तो करून घ्यायचा आहे. चीनचा रेल्वेमार्ग पाक व इराणमार्गे थेट अ‍ॅटलांटिकपर्यंत नेण्याच्या त्याच्या योजनेलाही पाश्चात्त्य देशांची मान्यता त्याला घ्यायची आहे. परिणामी तो अमेरिकेशी बोलणी करतो आणि सुंगला दटावण्याचे कामही तो करीत नाही. ही स्थिती अत्यंत संशयास्पद व धोक्याची आहे. जगात कोणत्याही क्षणी अणुयुद्ध सुरू होईल असे सांगणारी ही बाब आहे. सुंग ऐकणाऱ्यातला नाही म्हणून जगभरच्या राजनयिकांनी अमेरिकेलाच जरा ‘आस्ते कदम’ चालण्याचा व सुंगला अंगावर येऊ देणारी स्थिती कमी करण्याचा सल्ला देणे चालविले आहे. अमेरिका ही लोकशाही आहे. ती हे ऐकेल असे साऱ्यांना वाटते. सुंगची हुकूमशाही आणि त्याचा मस्तवालपणा यांचा कोणालाही भरवसा वाटत नाही. प्रतिस्पर्धी ज्ञात असेल व त्याच्या बळाची माहिती असेल तर त्याच्याशी लढणे सोपे असते. सुंगच्या बळाची खरी माहिती कोणालाच नाही. त्याच्या गर्जना हवेतल्या आहेत की जमिनीवरच्या हेही कोणाला ठामपणे ठाऊक नाही. काहींच्या मते त्याची अण्वस्रे युद्धसज्ज आहेत. त्याने ती समुद्राच्या तळाशीही ठेवली आहेत. त्यामुळे त्याच्या खऱ्या ताकदीचा अंदाज आल्याखेरीज त्याला युद्धात खेचणे हाही आत्मघातकी खेळ होईल. त्याच्या वल्गना खऱ्याच असतील तर मात्र त्याचे सामर्थ्य आणखी वाढू देणे हे उद्याच्या आत्मघाताला दिलेले आमंत्रण ठरेल.

Web Title: Mastval fireballs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.