भूतकाळाकडे दौडत निघालेले मार्क्सवादी
By Admin | Updated: April 24, 2015 23:55 IST2015-04-24T23:55:12+5:302015-04-24T23:55:12+5:30
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील तुलनेने तरुण असलेले आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकतानाच डाव्या राजकारणात तावून सुलाखून निघालेले ६२ वर्षीय सीताराम येचुरी विशाखापट्ट्णम

भूतकाळाकडे दौडत निघालेले मार्क्सवादी
बलबीर पुंज
(राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील तुलनेने तरुण असलेले आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकतानाच डाव्या राजकारणात तावून सुलाखून निघालेले ६२ वर्षीय सीताराम येचुरी विशाखापट्ट्णम येथे पार पडलेल्या पक्षाच्या २१व्या राष्ट्रीय बैठकीत सरचिटणीस म्हणून निवडले गेले आणि पक्ष एकदाचा प्रकाश करातांच्या कचाट्यातून मोकळा झाला. निवड झाल्या झाल्या येचुरी यांनी मोदींचा मुक्त व्यापाराचा आणि जातीयवादाचा अश्वमेध विळा आणि हातोडा यांच्या साह्याने रोखण्याची दणदणीत घोषणा केली आणि समर्थकांकरवी प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद प्राप्त करून घेतला. अर्थात त्यांनी बोलल्याप्रमाणे तसा प्रयत्न करून पाहायला काहीच हरकत नाही. पक्षाच्या याच बैठकीत असेही सांगितले गेले की, हीच बैठक आता पक्षाचे आणि देशाचेही भवितव्य ठरविणारी असेल.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष स्वत:ला जणू जॉर्ज आॅर्वेलियन कथेमधल्या मोठ्या भावासारखा समजत असल्याने तो नेहमीच बरोबर असतो. पक्षाच्या खासदारांची संख्या २००५ मध्ये ४३ होती, ती २००९ मध्ये १५ वर आली आणि २०१४ साली ती ९ वर येऊन ठेपली. तरी हे म्हणणार, आमचे बळ म्हणजे निवडून आलेल्या खासदारांची संख्या नव्हे, तर आमच्या पाठीमागे उभे असलेले शेतकरी, कामगार, तरुण आणि विद्यार्थी हेच होय. ९०च्या दशकाच्या मध्यात हरकिशनसिंग सुरजित यांच्या हातात जेव्हा या पक्षाची सूत्रे होती तेव्हा पक्ष खरोखरी किंगमेकरच्या भूमिकेत होता. पण आता परिस्थिती अगदी विरुद्ध आहे. पश्चिम बंगाल आणि केरळात पूर्वी ते प्रभावशाली होते पण आता तिथेही ते नाकारले गेले आहेत. ज्या आंध्र प्रदेश विधानसभेत एकेकाळी पक्षाचे सुंदरय्या आणि रवि नारायण रेड्डींसारखे महान आणि क्रांतिकारी नेते होते, तिथे आता पक्षाचे अस्तित्वशून्य आहे. महाराष्ट्रातसुद्धा डांग्यांच्यानंतर पक्षाची स्थिती दयनीय आहे. पंजाबात सुरजित यांच्यानंतर कुणीच नाही. ओडीशातून प्रशांत पटनायक सोडले तर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि गुजरातेत पक्षाचे अस्तित्व नसल्यासारखेच आहे. तामिळनाडूत पक्ष जयललितांच्या कृपेवर अवलंबून आहे आणि तसाच तो पुढेही राहील.
भूतकाळाची तुलना वर्तमान आणि भविष्याशी होऊ शकत नाही. पण आता प्रकाश करातांची जागा मधुरभाषी, सुविद्य आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून उदयास आलेल्या येचुरींनी घेतली आहे, तेव्हा पक्षाला चांगले भविष्य नक्कीच आहे. भाजपारूपी राक्षसाला ते आडवे पाडतील या त्यांच्या दाव्याकडे मात्र दुर्लक्ष केलेलेच बरे. १९८९ साली राजीव गांधींकडून राजीनामा मिळवून आणि निवडणुकांची घोषणा करवून घेण्याच्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भाजपासोबत होता. या दोन्ही पक्षांनी व्ही.पी.सिंग सरकारला त्याच्या शेवटापर्यंत सत्तेत ठेवले. ९०च्या दशकात मात्र भाजपाची सरशी झाली आणि मार्क्सवादी मागे पडले. त्यामुळे येचुरी आणि त्यांच्या पक्षातले नेते पक्षाच्या पुनर्बांधणीत यशस्वी होतील का?
१९९१ साली जगाने साम्यवादाची पितृभूमी समजल्या जाणाऱ्या सोविएत युनियनचे अध:पतन बघितले आहे. आजच्या घडीला आशियातला कुठलाही कम्युनिस्ट नेता हा मॉस्कोत नकोसा असतो. ९०च्या दशकात कम्युनिस्ट चीनने विदेशी भांडवल आमंत्रित करून दुकाने थाटली तर भारतातल्या कम्युनिस्टांनी विदेशी भांडवलाचा आणि अमेरिकी साम्राज्यवादाचा धिक्कार केला. जवळपास तीन दशके अमेरिकेच्या सैन्यासोबत संघर्ष केलेल्या व्हिएतनाममधील कम्युनिस्टांनी आता अमेरिकेसमोर गुडघे टेकले आहेत. ९०च्या दशकातच काँग्रेसने नेहरुंचा समाजवाद टाकून देण्यास सुरुवात करून टप्प्याटप्प्याने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्या एकाच दशकात सतत टंचाईत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे रूपांतर बऱ्याच क्षेत्रातल्या प्रगतीमध्ये झाले. त्यानंतरच्या दशकात अन्नधान्य उत्पादन २०० दशलक्ष टनाच्या पलीकडे गेले आणि अतिरिक्त धान्य ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला. शिवाय दुधासाठी कुपन, चारचाकी गाडी व स्कूटर यांच्यासाठी असलेले कोट्याचे दिवसदेखील संपले. तरीसुद्धा मार्क्सवादी त्यांच्या जुन्या अर्थविषयक व्याख्यांना चिकटून बसले आहेत. जुन्या सवयीप्रमाणे ते साम्राज्यवादी अमेरिकेला दोष देत आणि भारतीय तरुणांना फक्त कोकच नव्हे तर इतर गोष्टींपासूनही परावृत्त करण्याचे प्रयत्न करीत आहेत. आज एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के असलेल्या भारतीय तरुणांच्या इच्छा-आकांक्षाचे मूल्यमापन करण्यात ते साफ अयशस्वी
झाले आहेत. या ६५ टक्क्यातले बरेचसे १९९०नंतर जन्माला आले आहेत व त्यांना डांगे, सुंदरय्या,
ई.एम.एस. नंबुद्रीपाद, ज्योती बसू ही नावेही ठाऊक नाहीत.
विशाखापटणम येथील सभेतसुद्धा येचुरींनी अमेरिकी साम्राज्यवादाचा धिक्कार केला आणि सरकारच्या धोरणाला व विदेशी भांडवलाच्या निमंत्रणाला साम्राज्यवादी कट असे म्हटले. येचुरींनी खरे तर नवी दिल्लीतल्या अमेरिकन सेंटरला एकदा भेट द्यायला हवी. तिथे केव्हाही गेले तरी शेकडो तरुण मुलेमुली पुस्तकांमध्ये गढलेले दिसतात. खुर्च्या व्यापलेल्या असतील तर ते फरशीवरच बसतात. या सर्व तरुणांना अमेरिकेतल्या विद्यापीठात शिकण्याचे ध्येय आहे, कारण हे तरुण इच्छा-आकांक्षांनी भारले गेलेले आहेत. येचुरींनी त्यांच्या समोर जाऊन साम्राज्यवादी कारस्थान किंवा भांडवलशाहीच्या अंताचा मार्क्सच्या सिद्धांताविषयी बोलावे, त्यांना तिथे एकही श्रोता मिळणार नाही.
आज देशात जेव्हा आय.आय.टी.मधून शिकलेले बरेच युवक मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करीत आहेत आणि खासगी भांडवलदारसुद्धा त्यांच्या व्यवसायात लाखो अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करायची जोखीम पत्करत आहेत, तेव्हा येचुरी यांना त्यांच्यात कोणती संगती आढळून येते? इंटरनेटपासून दूर राहूनही स्वत:ला प्रगतिशील म्हणवून घेणाऱ्या भारतीय कम्युनिस्टांची वाटचाल खरे तर वेगाने भूतकाळाकडे होत चालली आहे. त्यांच्यात बदल घडवून आणण्याचे काम येचुरी करू शकतील?