सागरी मार्गाचा नांगर
By Admin | Updated: June 12, 2015 23:40 IST2015-06-12T23:40:39+5:302015-06-12T23:40:39+5:30
सख्य कितीही असले तरी हवामानाप्रमाणे बदलणाऱ्या राजकारणात राजकीय नेते कमालीचे दक्ष झाले आहेत. जनतेला आकर्षित करणाऱ्या योजना आपल्या पक्षाकडे असाव्या

सागरी मार्गाचा नांगर
रघुनाथ पांडे -
सख्य कितीही असले तरी हवामानाप्रमाणे बदलणाऱ्या राजकारणात राजकीय नेते कमालीचे दक्ष झाले आहेत. जनतेला आकर्षित करणाऱ्या योजना आपल्या पक्षाकडे असाव्या म्हणून निवडणुका जिंकण्यासाठी अनेकदा पत्ते पिसावे लागतात. सोन्याची कोंबडी असलेल्या मुंबई महापालिकेच्या दोन वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीची तयारी भाजपाने दणक्यात सुरू केली. विधानसभा निवडणुकीत भाजपाला मुंबईत मिळालेले यश टिकवून ठेवण्यासह त्याचे प्रतिबिंब महापालिकेच्या निवडणुकीत उमटावे यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्याचेच प्रत्यंतर म्हणजे, मूळ शिवसेनेचा असलेला मुंबई सागरी मार्गाचा नांगर भाजपाच्या किनारपट्टीवर अडकविण्यात फडणवीस यशस्वी झाले.
आपला मुद्दा कोणी हिसकावला तर एरवी शिवसेना जशास तसे उत्तर देई, पण दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांचेच व्हीजन डॉक्युमेंट भाजपाने हायजॅक करूनही फार खळखळ नसल्याने शिवसेना नरमल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. फडणवीसांनी मातोश्री जिंकली की मातोश्री फडणवीसांवर खूष आहे, याचा शोध घेतला जातो आहे. ‘राज्यात युतीचे सरकार आहे. मुंबई व राज्याचा विकास करणाऱ्या या निर्णयामुळे झालेल्या आनंदावर विरजण घालू नका’, असे मुत्सद्दीपणाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले खरे, पण निवडणुकीच्या पुढ्यात हा मुद्दा लक्षणीय व श्रेयाचाही ठरेल. तसे पाहता शिवसेनेच्या बाजुचा हा एकच विषय भाजपाने मोडून काढला असे नाही, तर शिवसेना सत्तेत आल्यानंतर अनेक मुद्दे फडणवीसांनी अलगद किनारी लावले आहेत. स्वकीय ज्येष्ठ मंत्र्यांसह शिवसेनेच्या काही मंत्र्यांची बोलती त्यांनी बंद केली, जैतापूरचा तापता विषय थंड केला. अर्थात त्यांच्याबद्दल सारे चांगलेच बोलतात असेही नाही. त्यांना ते अपेक्षितही नसेल. मात्र दिल्लीची भक्कम साथ असल्याने ते पक्ष व सत्तेतील आव्हाने सहज मोडून काढत आहेत. दिल्लीला महाराष्ट्रात जागोजागी भाजपाची सत्ता हवी असल्याने वाट्टेल ते करा असेच संकेत आहेत. मग मित्राच्या हाती असलेली मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी पक्ष म्हणून भाजपाने ही अगदी उघडपणे चाल खेळली. भाजपाने जाहीर मोहोर उमटविलेला सागरी मार्ग सेनेच्या राजकारणासाठी अत्यंत मोलाचा आहे. फडणवीस थेट मुख्यमंत्री झाले, मात्र प्रदेशाध्यक्ष असताना सत्तेकडे जाणारे अनेक बारकावे शोधले. त्याचा वापर आता सुरू आहे. मुंबईतील वाहतूक सुलभ करण्याचा मुद्दा त्यातीलच आहे. सी-प्लेन उडवणे असो, की ३६ किलोमीटर अंतराचा हा सागरी मार्ग बांधणे असो, सारे मुंबईत पक्ष मजबुतीसाठी. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ असलेला सागरी मार्ग शिवसेनेच्या जबड्यातून फडणवीस यांनी सहज ओढला व सारे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन ते मोकळेही झाले! मुळात मुंबई महापालिकेने केंद्राकडे चार वर्षापूर्वी पाठवलेला प्रस्ताव धूळ खात पडून होता. काँग्रेसनेही तो आपला भासवून निवडणुकीचा मुद्दा करण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर वेस्टर्न एक्स्प्रे्रेस हायवेवरील सहार एलीवेटेड सारखा हा पूल असावा असा एक फाटा फुटला व मुद्दा पुन्हा बासनात गेला.
फडणवीसांनी पंतप्रधानांना श्रेय दिल्याने शिवसेनेची पुढची भूमिका स्पष्ट होईल. सध्या तरी भाजपाने वेळ मारून नेली आहे. शिवसेनेला सोबत घेऊन मुंबई महापालिका गाठायची असे कोल्हापूर अधिवेशनात भाजपाने ठरविले, तरी वेळेवरची खुस्पटे काही कमी नसतील. शिवसेना ‘टायमींग’ साधेल असे शिवसेनेला ओळखून असलेले दिल्लीतील ‘भाजपाई’ सांगतात. साडेपाच किलोमीटरचा सागरी सेतू तीन वर्षांत होणार होता, त्याला दहा वर्षे लागली. ३६ किलोमीटरचा हा सागरी मार्ग तीन वर्षांत पूर्ण करण्याचा इरादा आहे. पण दहा वर्र्षेे व दोन निवडणुका हा मार्ग घेईल. वांद्रे-वरळी सागरी सेतूची संकल्पना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती. नितीन गडकरींनी ती प्रत्यक्षात आणली. सागरी मार्गाची संकल्पना उद्धव ठाकरेंची आहे. फडणवीस ती प्रत्यक्षात यावी यासाठी पराकाष्ठा करीत आहेत. राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. इथेही तेच घडते आहे.‘सीलिंक’मुळे पुलकरी असे बिरूद लागलेल्या गडकरींची जागा सागरी मार्गामुळे फडणवीस घेतील का, असे दिल्लीत बोलले जाते. संहिता जुनीच आहे. नेपथ्यही जुनेच. बदलली ती पात्रे आणि थोडेफार राजकारण..