मनाचिये गुंथी - सुधारकांचा महाराष्ट्र
By Admin | Updated: May 4, 2017 00:18 IST2017-05-04T00:18:49+5:302017-05-04T00:18:49+5:30
महाराष्ट्राला संतपरंपरा लाभली. लोकपरंपरा लाभली तशीच सुधारकांचीही परंपरा लाभली. बाळशास्री जांभेकरांपासून सुरू झालेली

मनाचिये गुंथी - सुधारकांचा महाराष्ट्र
महाराष्ट्राला संतपरंपरा लाभली. लोकपरंपरा लाभली तशीच सुधारकांचीही परंपरा लाभली. बाळशास्री जांभेकरांपासून सुरू झालेली सुधारकांची मालिका तर्कनिष्ठ बुद्धिवादी विचारांचा प्रवाह पुढे पुढे नेत होती. लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे, रा.गो. भांडारकर, स्वा. सावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर बुद्धिवादी विचारवंत म्हणून गोपाळ गणेश आगरकरांचे नावही अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आचार्य अत्र्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र ही महान व्यक्तींची जन्मभूमी व अभंग उक्तीची स्फूर्तिभूमी आहे. महाराष्ट्र ही अमर पराक्रमाची रणभूमी आहे आणि अलौकिक त्यागाची आणि सेवेची यज्ञभूमी आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या भूमीच्या सुपुत्रांनी वेळोवेळी बंडाचे निशाण उभारून बुद्धिप्रामाण्यवाद मांडला. महाराष्ट्राची बंडखोरांची परंपरा आगरकरांनी वैचारिक क्षेत्रापर्यंत आणून ठेवली. ‘लोकहितवादींची शतपत्रे’ म्हणजे बुद्धिवादी विचारातून घडलेले एक वैचारिक प्रबोधनपर्व म्हणावे लागेल. मुंबईत भाऊ महाजन यांनी सुरू केलेल्या प्रभाकर या साप्ताहिकात १८४८पासून त्यांनी देशबांधवांना उद्देशून शंभर पत्रे लिहिली. त्यात त्यांनी समाजाच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक अशा अनेक अंगांचे मूलभूत परीक्षण केले. संपत्तीनिरपेक्ष आणि जातीनिरपेक्ष बंधुभाव व समानता यांनी ओथंबलेली राष्ट्रवादाची कल्पना त्यांनी मांडली आणि बालविवाहास प्रतिबंध, विधवा विवाह, स्त्रीशिक्षण, जातीनिर्बंधास विरोध, पुनर्विवाह, व्यक्तिस्वातंत्र्य या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. ज्या काळात मार्क्सचा सिद्धांत रुजला नव्हता त्या काळात लोकहितवादींनी गरिबांची, श्रमजीविकांची, दलितांची बाजू घेऊन त्यांच्या प्रतिष्ठेला मोठेपणा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सन १८९६मध्ये भरलेल्या सामाजिक परिषदेमध्ये न्या. रानडे यांनी म्हटले आहे की, मानवाला पूर्णत्व प्राप्त करून देणे हेच सुधारणेचे प्रयोजन आहे. जन्मनिष्ठेपेक्षा गुणनिष्ठेची जोपासना केली पाहिजे, अंधदैववादाऐवजी मानवाची प्रतिष्ठा वाढायला हवी. सामाजिकी- करणाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या न्या. रानडे यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. ‘जग हे परिवर्तनशील आहे आणि बदलणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मानवाने आपले विचार, आचार आणि जीवनपद्धती परिस्थितीनुसार बदलली पाहिजेत, असे सांगून आगरकरांनी ‘सुधारक’ या वृत्तपत्रातून निखळ, बुद्धिवाद प्रथम महाराष्ट्राला शिकवला. म. फुले यांनी ‘दीनबंधू’ आणि ‘सत्यशोधक’, जांभेकरांचे ‘दर्पण’, लोकहितवादींची ‘शतपत्रे’, आगरकरांचे ‘सुधारक,’ म.फुलेंचे ‘दीनबंधू’, डॉ. आंबेडकरांचे ‘समाजचिंतन’ हे ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची नवसंहिताच होय. महाराष्ट्राला पुरोगामी करण्यात सुधारकांचे विचार आणि साहित्य खरे कारणीभूत ठरले आहे. सुधारकांच्या विचारांपासून दुरावणे हाच महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा पराभव म्हणावा लागेल. डॉ. - रामचंद्र देखणे -