मनाचिये गुंथी - कर्मही पूजा हैं।
By Admin | Updated: May 3, 2017 00:25 IST2017-05-03T00:18:58+5:302017-05-03T00:25:18+5:30
माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो. जीवन रोज त्याला नवा पाठ देत असते. फक्त कान आणि डोळे उघडे ठेवून वावरले म्हणजे झाले

मनाचिये गुंथी - कर्मही पूजा हैं।
माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो. जीवन रोज त्याला नवा पाठ देत असते. फक्त कान आणि डोळे उघडे ठेवून वावरले म्हणजे झाले. कालचीच गोष्ट ‘विमनस्कपणे स्वपदे उचलित, रस्त्यातुनी मी होतो हिंडत.’ केशवसुतांच्या तुतारी कवितेतील ही ओळ. विमनस्कपणा, चिंता, नैराश्य आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी डोकावते. त्याला साधेसे निमित्तही पुरे होते. या विचारतंद्रीत असताना पुढ्यातील ट्रकवर लक्ष्य गेले. सुंदर अक्षरात लिहिले होते ‘कर्म ही पूजा हैं’ हे वाचून विमनस्कपणा कुठच्या कुठे पळाला. सकाळपासून रात्री अंथरुणाला पाय लागेपर्यंतचे सर्व कर्म हे सत्कर्मच झाले पाहिजे. भगवंताची वेगळी पूजा नको. ‘पत्रं पुष्पं, फलं तोयम्् यो मे भक्त्या प्रयच्छति’ ईश्वराला लागतो भक्तिभाव, हे तर गीतेतील तत्त्वज्ञान, भगवंताच्या मुखातून अवतरलेले. ट्रकवरचे साधेसे वाक्य; पण जीवनाला दिशा देऊन गेले. ज्याला हा विचार ट्रकवर लिहावासा वाटला तो कोणी तरी मोठा साधक असला पाहिजे असे वाटून गेले.
नाही तर ट्रकच्या मागे ‘आई बाबांचा आशीर्वाद, श्रद्धा और सबुरी’ अशी वाक्ये आढळतात. हेसुद्धा वाचायला बरे वाटते, भले आपले मन अश्रद्ध असो. बहुतांशी ट्रकमागे ‘बुरे नजरवाले तेरा मुंह काला’ असे वाक्य हमखास आढळते. आम्ही कशाला हो याच्या ट्रककडे वाईट नजरेने पाहणार? ट्रकवाला मात्र आमचे तोंड काळे म्हणायला तयार. एका ट्रकच्या मागे ‘श्रद्धा ही जीवन हैं’ असे लिहिले होते. मला आपले वेदांतील श्रद्धासूक्त आठवले ‘‘श्रद्धयाग्नि: समिध्यते। श्रद्धया विंदते हवि: श्रद्धा भगस्यय मूर्धनि। वचसा वेदयामसि’’ ट्रकवाल्याला विचारले हे वाक्य कुठून सुचले? तो म्हणाला, अच्छा लगा, इसलिए लिखा. हम तो मुसलमान हैं। मला तर शॉकच बसला. त्याच्यात मला संत सजन कसाईचे दर्शन घडले.
एका ट्रकच्या मागे लिहिले होते ‘जिना यहा, मरना यहा.’ तो ड्रायव्हर होता खेड्यातील. त्याच्या डोक्यावर टोपी होती, कपाळी गंध होते. त्याला सहजच म्हटले अरे ! एखादी ओवी, अभंग लिहायचा की. तसा तो म्हणाला, यात काय वाईट आहे. इथेच जगायचं आणि इथेच मरायचं. लई भारी तत्त्वज्ञान मांडलंय बघा. संतांचेच सांगणे त्यात हाय. एकदा तर पंढरीच्या वारीला जाताना ‘ग्यानबा तुकाराम’ न म्हणता ‘जिना यहा, मरना यहा’ असे म्हणतच पायी वारी केली. तो वारकरी आहे कळल्यावर ‘राम राम’ म्हणत त्याच्यापुढे हात जोडले.
सांगायचे तात्पर्य जीवनात पदोपदी शिकायला मिळते. अहो ! वेडी माणसेसुद्धा जीवनावरती सुंदर भाष्य करतात, जे शहाण्याला समजतही नाही. हे लिहीत असतानाच दारापुढे एक ट्रक येऊन थांबला. कुतूहलापोटी धावत जाऊन ट्रकच्या मागे पाहिले- लिहिले होते ‘खेल किस्मत का’ हे मात्र खरे !
- डॉ. गोविंद काळे