मनाचिये गुंथी - ब्रह्मांडाची सुव्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2017 06:06 IST2017-05-02T06:06:18+5:302017-05-02T06:06:18+5:30
पुरातन काळापासून ब्रह्मांड हा विषय अत्यंत उत्सुकतेचा राहिलेला आहे. या उत्सुकतेमुळेच या संबंधात सखोल शोध झालेले आहेत

मनाचिये गुंथी - ब्रह्मांडाची सुव्यवस्था
पुरातन काळापासून ब्रह्मांड हा विषय अत्यंत उत्सुकतेचा राहिलेला आहे. या उत्सुकतेमुळेच या संबंधात सखोल शोध झालेले आहेत. खगोलशास्त्र याच शोधाची निर्मिती आहे. प्राचीन काळापासून जगातील अनेक देशांमध्ये यावर मोठे महत्त्वपूर्ण शोध लागलेले आहेत. प्राचीन भारत वर्षात या संबंधात वैज्ञानिक व सखोल संशोधन करणारे अनेक दिग्गज रहस्यवादी निर्माण झालेले आहेत. वेदातील अनेक मंत्रांत या ब्रह्मांडाची चर्चा आलेली आहे. नासदीय सुक्तात शून्यातून ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, या संबंधात फारच सखोल चर्चा आलेली आहे. बिग बैंग या सिद्धांताप्रमाणे या सुक्तामध्येसुद्धा स्फोटाद्वारे या सृष्टीची निर्मिती झालेली आहे, असे प्रतिपादित केलेले आहे. आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य यासारख्या सुप्रसिद्ध विद्वानांनी खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून ब्रह्यांडाची फारच मोठी विस्तुत व्याख्या केलेली आहे. आधुनिक खगोलशास्त्र अत्यंत प्रगत आहे. त्यातील अनेक सूक्ष्म व अत्यंत प्रभावशाली उपकरणांद्वारे ब्रह्मांडाच्या संबंधात अत्यंत बहुमूल्य ज्ञान उपलब्ध झालेले आहे. याव्यतिरिक्त आकाशात सोडलेल्या उपग्रहाद्वारेसुद्धा अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त झालेल्या आहेत. ब्रह्मांडाच्या संबंधात पुरातन व अलीकडील उपलब्ध माहितीनुसार पूर्ण ब्रह्मांडाची व्यवस्था ही एका तालासुरानुसार चालते. प्रत्येक ब्रह्मांडीय पिंडाचे आपले स्वत:चे एक केंद्र आहे. त्या केंद्राच्या भोवताली ब्रह्मांडीय पिंडाचे आपले मंडळ आहे. जसे आकाशात अब्जावधी पिंड आहेत ते अत्यंत लयबद्ध तऱ्हेने परस्पराशी संबंध व तारतम्य राखत आहेत. उदा. आमच्या सूर्यमंडळातील ग्रह व उपग्रह हे अत्यंत व्यवस्थित तऱ्हेने आपल्या केंद्रावर स्थित आहेत. आमच्या भारतीय तत्त्वज्ञानींनी जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडामध्ये असल्याचे प्रतिपादित केलेले आहेत.
‘यत् पिण्डे तत् ब्रह्माण्डे’
ब्रह्मांड विशालतम असून, पिंड लघुतम आहे. परंतु ब्रह्मांडातील संपूर्ण व्यवस्था या पिंडामध्येसुद्धा आहे. याचे कारण हे आहे की, योगी आपल्या चेतनेद्वारे ध्यान-धारणेने अंतर्मुख होऊन आपल्या पिंडाच्या आत त्या विशालतम ब्रह्मांडाचे दर्शन आपल्या सूक्ष्म दृष्टीने करतो. श्रीमद्भगवतगीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अशीच सूक्ष्म दृष्टी देऊन विश्वरूप दर्शन घडविले.
‘दिव्य ददामि ते चक्षु:’
या सूक्ष्म दृष्टीलाच दिव्यदृष्टी असेसुद्धा संबोधले जाते. जेव्हा आम्ही आपले विचार, वाणी व कर्म यामध्ये सुव्यवस्था राखतो, तेव्हा आम्ही आपल्या व्यक्तित्वाची परिपूर्णता प्राप्त करतो. या सुव्यवस्थेचे खंडण होेणे म्हणजेच रोग व अकाली मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे. ज्ञान, कर्म व भक्ती हे आमचे पिंड सुव्यवस्थेत राखण्याचे मार्ग आहेत.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय