मल्ल्याने केलेले अर्थव्यवस्थेचे वस्त्रहरण

By Admin | Updated: May 2, 2016 02:16 IST2016-05-02T02:16:51+5:302016-05-02T02:16:51+5:30

देश आणि राष्ट्रीय बँका यांची हजारो कोटींनी फसवणूक करून फरार झालेल्या खासदार विजय मल्ल्या या गुलछबू धनवंताला देशात परत आणण्याची सरकार व त्याचे परराष्ट्र मंत्रालय यांची

Malleya's Economy of the Economy | मल्ल्याने केलेले अर्थव्यवस्थेचे वस्त्रहरण

मल्ल्याने केलेले अर्थव्यवस्थेचे वस्त्रहरण

देश आणि राष्ट्रीय बँका यांची हजारो कोटींनी फसवणूक करून फरार झालेल्या खासदार विजय मल्ल्या या गुलछबू धनवंताला देशात परत आणण्याची सरकार व त्याचे परराष्ट्र मंत्रालय यांची नाटके आता सुरू झाली आहेत. प्रथम मल्ल्याचे पारपत्र (पासपोर्ट) जप्त करण्याचे, पुढे तो रद्द करण्याचे व नंतर त्याला भारतात परत पाठविण्याची ब्रिटिश सरकारला विनंती करण्याचे या नाटकाचे आरंभीचे अंक पार पडले. आता भारत व ब्रिटन यांच्या परराष्ट्र सचिवांची त्यासाठी बैठक बोलविण्याचा पुढचा अंक सुरू व्हायचा आहे. मल्ल्या हा देशाला दारू पाजून धनवंत बनलेला लबाड खासदार आहे. आपल्या लाडावलेल्या चिरंजीवाच्या वाढदिवशी त्याला किंगफिशर (खंड्या) या नावाची अत्याधुनिक सोयींनी सजलेल्या विमानांची कंपनी भेट देण्याएवढा पैसा त्याने मिळविला. युनायटेड ब्रिअरीज या नावाची देशाची सर्वात मोठी दारू गाळणारी यंत्रणा त्याच्या मालकीची आहे. झालेच तर या शौकिन माणसाने दरदिवशी आपली ताजी छायाचित्रे देशाला दाखवून आपण जगभरच्या आघाडीच्या किती नट्यांसोबत आणि मॉडेल्ससोबत खुलेपणी राहतो हेही देशाला सांगितले आहे. आयपीएल नावाच्या आता वादग्रस्त ठरलेल्या क्रिकेट सामन्यांच्या गर्दीत बड्या उद्योगपतींच्या बायकांच्या मानांवर फुंकर घालून त्यांना तो गारवा देत असलेली चमत्कारिक छायाचित्रेही दूरचित्रवाणीसह अनेक नियतकालिकांनी देशाला दाखविली आहेत. या मल्ल्याने बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडविल्याची बाब बँकांसह सरकारलाही गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाऊक आहे. या कर्जाखेरीज त्याच्या अन्य कर्जांच्या बुडवेगिरीबाबतची सारी माहिती तिच्या कागदपत्रांसह सरकारदरबारी दाखल आहे. या कर्जांच्या वसुलीसाठी त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाई आर्थिक संचालनालयाने (ईडी) काही महिन्यांपूर्वीच सुरू केली. त्याच्या गोव्यातील आलिशान बंगल्यातून अत्यंत महागड्या २६ मोटारगाड्या जप्त करून नेत असल्याची चित्रे देशाने सोशल नेटवर्कवरही पाहिली आहेत. कर्जाच्या वसुलीची व त्यासाठी करावयाच्या जप्तीची कारवाई एकीकडे सुरू असताना व मल्ल्या हा स्वेच्छेने कर्जबुडवेपणा (विलफुल डिफॉल्टर) करणार असल्याचे उघड दिसत असताना या सरकारने त्याच्यावर ठेवावी तशी नजर ठेवली नाही. त्याचे पारपत्र स्थगित वा रद्द करण्याची किंवा ते जप्त करण्याची कारवाई करावी असेही सरकारला वाटले नाही. त्याच्यावरील कर्जाच्या वसुलीसाठी राष्ट्रीय बँका जेव्हा सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या तेव्हा हा मल्ल्या दहा दिवसांपूर्वीच देश सोडून इंग्लंडला गेल्याचे न्यायालयात सांगण्याची नामुष्की सरकारी यंत्रणांवर आली. न्यायालयात या संबंधीचा खटला दाखल होण्याच्या दहा दिवस अगोदरच हा मल्ल्या खासदार या नात्याने त्याला मिळालेल्या राजकीय पारपत्राच्या बळावर जेट हवाई सेवेच्या आंतरराष्ट्रीय विमानाने रवाना झाल्याचे न्यायालयात सरकारच्या वतीने सांगण्यात आले. देश सोडून विदेश गाठतानाही मल्ल्याचा गुलछबूपणा कायम राहिला. आपल्यासोबत त्याने एका अज्ञात महिलेलाही इंग्लंडला नेले. ज्या जेट कंपनीच्या विमानातून हा मल्ल्या पहिल्या वर्गाच्या तिकिटावर प्रवास करीत होता ती कंपनी सरकारला व विशेषत: सरकारच्या भाजपा या पक्षाच्या अनेक नेत्यांना नुसती ठाऊकच नाही तर जवळची वाटणारीही आहे. ज्या कर्जबुडव्यावर आर्थिक संचालनालयाने जप्तीची कारवाई सुरू केली आहे तो इसम आपल्या विमानातून असा कोणताही गाजावाजा न करता देश सोडून फरार होत आहे ही गोष्ट सरकारच्या निदर्शनाला आणून देण्याबाबत ही जेट कंपनीही कुठे जागरूक दिसली नाही. किंबहुना मल्ल्याच्या पलायनाला या कंपनीने व तिच्या पाठीराख्यांनी अप्रत्यक्षपणे मदतच केली असे देशाला दिसले आहे. ज्या इसमाविरुद्ध तुम्ही आमच्या न्यायालयात कर्जवसुलीसाठी आला आहात त्याचा ठावठिकाणा ठाऊक करून घेण्याचा साधा प्रयत्नही तुम्ही कसा केला नाही, हा कोणालाही विचारावासा वाटावा असा प्रश्न न्यायालयानेही त्या बँकांना आणि आर्थिक संचालनालयाला विचारू नये ही बाब तर या फसवेगिरीचे गौडबंगाल अधिकच गडद करणारी आहे. एवढे सारे झाल्यानंतर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाला-आमचा मल्ल्या परत करा हो- असे टाहो फोडून विनवावे याएवढा राष्ट्रीय दैवदुर्विलास आणि राष्ट्रीय फसवेपणा दुसरा कोणताही नाही. चोराला आपल्या डोळ्यादेखत चोरी करून निघून जाऊ द्यायचे आणि मागाहून पोलीस ठाण्याचे दरवाजे ठोठावायचे याएवढा गाढवपणा दुसरा नाही. लहानमोठ्या कर्जांसाठी मध्यमवर्गातील माणसाचे प्राण कंठाशी आणणाऱ्या आणि शेतकऱ्यांना तर थेट आत्महत्त्या करायला लावणाऱ्या आपल्या बँकांच्या वसुली यंत्रणा या मल्ल्याबाबत एवढ्या दयावान आणि उदार राहिल्या असतील तर या यंत्रणाच संशयास्पद आहेत असे म्हटले पाहिजे. बँकांच्या अधिकाऱ्यांना सामान्य माणसांच्या पैशाबाबत तसेही फारसे काही वाटत नाही. अन्यथा १.४० लक्ष कोटी रुपयांची देशातील धनवंतांनी घेतलेली कर्जे त्यांनी माफ केली नसती. त्या तुलनेत मल्ल्याची फसवणूक ९ हजार कोटींची म्हणजे बरीच लहान आहे असेच म्हटले पाहिजे.

Web Title: Malleya's Economy of the Economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.