शारुकसाठी थेटरात फटाके फोडणारे ‘मालेगाव के सुपरमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 12:02 AM2021-02-25T00:02:33+5:302021-02-25T00:02:46+5:30

शारुक आणि सल्लूभाईच्या स्वागताप्रीत्यर्थ भर थेटरात पोरांनी फटाके फोडले.. त्यांच्या रक्तातच ही पिक्चरची सुई टोचलेली आहे त्याचं काय करावं?

'Malegaon K Superman' setting off firecrackers for Shah Rukh Khan | शारुकसाठी थेटरात फटाके फोडणारे ‘मालेगाव के सुपरमॅन’

शारुकसाठी थेटरात फटाके फोडणारे ‘मालेगाव के सुपरमॅन’

googlenewsNext

- समीर मराठे

‘तेरी माँ की XX’.... म्हणत व्हिलनची पडद्यावर एंट्री झाली  की पिटातल्या प्रेक्षकांतून अख्ख्या थिएटरमध्ये ऐकू जाईल अशी फुल्याफुल्यांची कचकचीत शिवी हासडली जायची. त्यानंतर अशा असंख्य फुल्या थिएटरात घुमायच्या, नंतर हास्याचा गडगडाट व्हायचा आणि थिएटर पुन्हा थोड्या वेळासाठी शांत व्हायचं. याच्या उलट हिरोची एंट्री झाली रे झाली की अ‌ख्ख्या थिएटरात शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट. डान्स हा तर इथल्या लोकांचा प्राण. शोले चित्रपटातल्यासारखा हेमामालिनीचा दिलखेखक डान्स सुरू झाला की लगेच अख्ख्या थिएटरात पैशांचा, चिल्लरचा पाऊस! इंटरवलमध्ये पुन्हा ही चिल्लर गोळा करण्यासाठी गर्दी व्हायची!

कितीही बंडल, देमार पिक्चर (मालेगावात चित्रपटाला ‘पिक्चर’ असंच म्हणतात !) कुठल्याही थिएटरात लागला तरी पहिल्या आठवड्यात चिक्कार गर्दी. देमार चित्रपटांना तर जास्तच. ब्लॅकनंच तिकीट घ्यायचं कारण  थिएटरवालेच ब्लॅकवाल्यांना तिकिटं विकायचे. जी काही थोडीफार तिकिटं खिडकीवर विकली जायची तिथे इतर नेहमीच्या ब्लॅकवाल्यांची गर्दी. कोणी कितीही लवकर रांगेत जाऊन उभा राहिला तरी हे नेहमीचे ब्लॅकवाले तिकीट खिडकी सुरू झाली रे झाली, की लगेच शर्ट काढून जाळीच्या वरुन गर्दीत उड्या मारणार. मिळतील तेवढी तिकिटं घेणार आणि ब्लॅक करणार! त्यामुळे तिकीट खिडकीवर पोलिसांचा लाठीमार हे दृष्यही नेहमीचंच.

मालेगावच्या ‘पिक्चर’वेडाचं हे सर्वसाधारण चित्र.  आता हे पुन्हा आठवण्याचं कारण म्हणजे लॉकडाऊननंतर चित्रपटगृहं सुरू होताच मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात शाहररूख-सलमान खानचा ‘करण अर्जुन’ हा जुनाच पिक्चर नुकताच परत दाखवण्यात आला. त्यावेळी दोन्ही खानांच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये एकच जल्लोष केला आणि थिएटरमध्येच फटाकेही फोडले!  हे कृत्य करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांविरुद्ध (खरंतर हे फॅन्स  ‘शारुक’-‘सल्लूभाई’चे) पोलिसांनी आता गुन्हे दाखल केले आहेत. अर्थात हे वाचून बाहेरच्यांना धक्का बसू शकतो, पण मालेगावला हे  प्रकार नवे नाहीत. त्यामागचं खरं कारण आहे, ते म्हणजे इथल्या लोकांचं चित्रपट प्रेम! ते बाकी कुणाला समजणं कठीण  असं फक्कड, दिलकश! ते समजून घेतलं तर त्यांच्या या बेजबाबदार कृत्याचं कारणही समजून येईल.
मालेगाव अनेक कारणांनी महाराष्ट्रात प्रसिद्ध . दंगलीचं शहर, यंत्रमागांचं, कामगारांचं शहर..  हिंदू-मुस्लिमांमधला तणाव या शहराला नवा नाही. पण या तणावापलीकडचा एक धर्म या अख्ख्या शहराला आहे - पिक्चर! 

प्रत्येकाला चित्रपटाची प्रचंड हौस. त्यातही ‘पहला दिन पहला शो’चं तुफान वेड.  सर्वांत पहिल्यांदा थिएटरात घुसण्यासाठी जाम चेंगराचेंगरी. कारण तिकिटांवर नंबरच नसायचे. जो पहिल्यांदा खुर्चीवर बसेल त्याची जागा. तीन-चार जण किंवा एकत्र कुटुंबानं पहिल्या आठवड्यात चित्रपटाला जाण्याची तर सोयच नाही. कारण कोणाला या कोपऱ्यात, तर कोणाला त्या कोपऱ्यात जागा मिळणार. बनियनवाले जे सर्वांत आधी थिएटरात घुसायचे ते खुर्च्यांची अख्खी लाइन बळकवायचे. एकानं एका टोकाला उभं राहायचं आणि दुसऱ्यानं दुसऱ्या टोकाला. मधे कोणालाच एंट्री नाही! - साधारण पंचवीस वर्षांपूर्वीचं मालेगावचं हे चित्र. त्यात अजूनही फारसा बदल झालेला नाही.
पूर्वी मुंबईबरोबरच किंवा इतर शहरांच्या बऱ्याच आधी नवे पिक्चर मालेगावात यायचे.

थिएटरमालकही त्याची जाहिरात करायचे - ‘मुंबई रिलीज के साथ!’ त्यामुळे इतर शहरांतले लोकही खास सिनेमा पाहण्यासाठी मालेगावला सहकुटुंब यायचे. मालेगावात जर चित्रपट यशस्वी झाला, तर आख्ख्या महाराष्ट्रात तो गल्ला खेचणार, हे गणित पक्कं होतं! इथल्या पिक्चर-प्रेमींनी ‘मॉलीवूड’ नावाची अख्खी चित्रपट इंडस्ट्रीच उभी केली आहे.  यातले सगळे तारे, सितारे हे प्रत्यक्षात अंधारं आयुष्य वाट्याला आलेले मजूर आणि कामगार! वेगवेगळ्या आयडिया लढवून अत्यंत स्वस्तात आणि फावल्या वेळात, प्रसंगी आपल्या घरच्या वस्तू विकून, फुकटात काम करून ही इंडस्ट्री त्यांनी विकसित केली. गाजलेल्या हिंदी चित्रपटांचं विडंबन हा या इंडस्ट्रीचा पहिला हातखंडा फॉर्म्युला होता!

 ‘मालेगाव के शोले, ‘मालेगाव के करण अर्जुुन’, ‘मालेगाव का डॉन’, ‘मालेगाव का लगान’, ‘मालेगाव की शान’, ‘मालेगाव का सुपरमॅन’.. असे आणि इतरही अनेक चित्रपट येथे निर्माण झाले. आता आंतररराष्ट्रीय पातळीवरही माॅलीवूडची दखल घेतली जात आहे. मालेगावातल्या पोरांनी लॉकडाऊनचा उपास सोडताना शाहरूख आणि सल्लूभाईच्या स्वागताप्रित्यर्थ भर थेटरात फटाके फोडले.. त्यांना कायदा काय ती शिक्षा करेल, पण त्यांच्या रक्तातच ही पिक्चरची सुई टोचलेली आहे त्याचं काय करावं ?  इथल्या कामगारांचा, मजुरांचा तोच एक जगण्याचा सहारा आणि प्राण आहे! पिक्चर पाह्यला बसले, की काही वेळ का होईना, ते स्वत:ला ‘सुपरमॅन’ समजतात!

Web Title: 'Malegaon K Superman' setting off firecrackers for Shah Rukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.