मलिद्याच्या नादात रस्ते खड्ड्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:36 AM2018-07-18T00:36:59+5:302018-07-18T00:37:03+5:30

विदर्भात गत आठवड्यात बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस झाला. नागपूर वगळता इतरत्र पावसात फारसा जोर नव्हता; मात्र तरीदेखील विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

Maladaya nadata in the potholes! | मलिद्याच्या नादात रस्ते खड्ड्यात!

मलिद्याच्या नादात रस्ते खड्ड्यात!

विदर्भात गत आठवड्यात बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस झाला. नागपूर वगळता इतरत्र पावसात फारसा जोर नव्हता; मात्र तरीदेखील विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अकोला, नागपूर व चंद्रपूर या शहरांमधील रस्त्यांची तर पार वाट लागली आहे. शुक्रवारी चंद्रपुरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. अकोल्यात गतवर्षी डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची पुरती दैना झाली आहे. एवढेच नव्हे, तर दर्जेदार व टिकाऊ रस्ते तयार करण्याच्या नावाखाली बनविण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यांवर वर्षभराच्या आतच खड्डे व भेगा पडल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आयुक्तांना नोटीस बजावल्या आहेत. कमी अधिक फरकाने संपूर्ण देशातच हे चित्र दिसते. गतवर्षी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे भारतात दररोज सरासरी ३० जण प्राणास मुकतात! बरे, रस्त्यांवरील खड्डे ही काही नव्याने निर्माण झालेली समस्या नव्हे. वर्षानुवर्षांपासून आम्ही तेच रडगाणे रडत आहोत. जे राजकीय पक्ष विरोधात असतात, ते त्यासाठी सत्ताधाºयांवर आगपाखड करतात, काही तरी नावीण्यपूर्ण आंदोलन करण्याचा आव आणतात आणि सत्तेत आले, की कंत्राटदारांकडून मलिदा ओरपतात! रस्ते बांधणीसाठी ‘रॉकेट सायन्स’ची गरज नसते. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या अभावामुळे आमचे रस्ते दर्जेदार होत नाहीत, असे अजिबात नाही; पण आमचे भ्रष्टाचाराचे तंत्रच एवढे जबरदस्त आहे, की ते इतर सर्व तंत्रांवर मात करते! भ्रष्टाचारामुळे रस्ते बांधणीत योग्य त्या दर्जाचे साहित्य वापरल्या जात नाही. विशेषत: डांबरी रस्त्यांसाठी आवश्यक त्या प्रमाणात व आवश्यक दर्जाचे डांबर वापरल्या जात नाही आणि त्यामुळे वर्ष-दोन वर्षातच रस्त्याची वाट लागते, हे खरेच आहे; पण सोबतच रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे, हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. कोणत्याही सछिद्र पदार्थात शिरणे आणि एकमेकांना चिकटलेल्या वस्तूंना वेगळे करणे, हा पाण्याचा गुणधर्म आहे. डांबराने एकमेकांना चिकटलेल्या छोट्या दगडांपासून (गिट्टी) रस्ता बनलेला असतो. जेव्हा रस्त्यावर पाणी साचते, तेव्हा वाहनांच्या चाकांच्या दबावामुळे ते पाणी रस्त्याच्या अंतर्भागात शिरते आणि गिट्टी व डांबरामधील बंध मोकळा करते. परिणामी रस्त्यावर भेगा पडतात आणि त्या वाढत जाऊन शेवटी त्यांचे जीवघेण्या खड्ड्यात रूपांतर होते. केवळ रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करून, ती बंद होणार नाही याची काळजी घेतली तरी, रस्त्यांच्या आयुष्यात लक्षणीय वाढ होऊ शकते; मात्र तसे झाल्यास कंत्राटदार, अधिकारी आणि राजकीय नेत्यांना दरवर्षी मलिदा कसा ओरपायला मिळेल?

Web Title: Maladaya nadata in the potholes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.