शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
3
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
4
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
5
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
6
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
7
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
8
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
9
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
10
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
11
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
12
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
13
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
14
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
15
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
16
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
17
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
18
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
19
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
20
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: तिसऱ्या महायुद्धाची नांदी? नागरी लक्ष्यांवरील हल्ल्यांच्या तीव्रतेत वाढ धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:16 IST

रशिया-युक्रेन संघर्षात दोन्ही बाजूंना मोठे नुकसान, नागरिकांचे स्थलांतर वाढतेय

गत तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता वाढल्याने, सध्या संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या धास्तीने चिंताक्रांत झाले आहे. उभय देशांद्वारा लष्करी आणि नागरी लक्ष्यांवरील हल्ल्यांची तीव्रता आधीच्या तुलनेत खूप वाढली आहे. मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या प्रारंभी युक्रेनी सैन्याने रशियाच्या वायुतळांवर ड्रोनच्या साहाय्याने जबर हल्ले केले. त्यामध्ये सामरिक बॉम्बर्ससाठी वापरल्या जाणाऱ्या तळांचाही समावेश होता. या हल्ल्यात रशियाची तब्बल ४० लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत. या हल्ल्यासाठी युक्रेनने ज्याप्रकारे गनिमी काव्याचा अवलंब केला, त्यामुळे रशियासह संपूर्ण जग अवाक् झाले आहे. या हल्ल्याला ‘रशियाज ट्रोजन हॉर्स मूमेंट’ म्हटले जात आहे. रशियाची गुप्तचर संस्था अत्यंत पाताळयंत्री समजली जाते.

स्वतः रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन कधीकाळी ‘केजीबी’ या तत्कालीन रशियन गुप्तचर संस्थेचे प्रमुख होते. युक्रेनने कंटेनरमधून थेट रशियाच्या अंतर्गत भागात ड्रोन नेऊन केलेल्या हल्ल्याने रशियाची जी नाचक्की झाली आहे, त्यामुळे पुतीन प्रचंड संतापले आहेत. त्या संतापातून रशियाने युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढवली आहे. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हेदेखील माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे हा संघर्ष जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने तर घेऊन जाणार नाही ना, अशी आशंका व्यक्त होऊ लागली आहे. युक्रेनच्या ड्रोन  हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांत किमान १४०० युक्रेनी सैनिक ठार केल्याचा दावा रशियाने केला आहे. त्याआधी, रशियाने युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर हल्ल्यांची संख्या वाढवली होती. विशेषतः १३ एप्रिल २०२५ रोजी सुमी येथे इसकंदर-एम क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात किमान ३५ नागरिक ठार, तर १२९ जखमी झाले होते. त्यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश होता. गेल्या काही महिन्यांमध्ये या संघर्षाने केवळ लष्करीच नव्हे, तर भू-राजकीय, आर्थिक, तांत्रिक आणि मानवी मूल्यांच्या पातळीवरही गंभीर वळण घेतले आहे.

या संघर्षात दोन्ही बाजूंना मोठे नुकसान झाले असून, नागरिकांचे  स्थलांतर वाढत आहे. तत्पूर्वी, अमेरिकेने एप्रिल २०२५ मध्ये युक्रेनला ८ अब्ज डॉलर्सच्या नव्या मदतीची घोषणा केली होती. त्यामध्ये अचूक हल्ले करणारे ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि युद्धजन्य माहिती विश्लेषण तंत्रज्ञानाचा समावेश होता. नाटो देशांनीही युक्रेनच्या हवाई संरक्षणासाठी ‘पॅट्रियॉट सिस्टम्स’चा पुरवठा वाढवण्याचे ठरवले आहे. उत्तरादाखल रशियाने अमेरिका व नाटोवर अप्रत्यक्ष युद्ध चालवण्याचा आरोप करत, युरोपियन सीमांवर सैन्याची तैनाती वाढवली आहे. रशियाने बेलारूसमधून उत्तर युक्रेनकडे लष्करी हालचाली सुरू केल्या असून, कीवजवळील काही भागांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेंको हे पुतिन यांचे निकटवर्तीय असल्याने, ही घडामोड संभाव्य दुसऱ्या आघाडीचा संकेत मानला जात आहे. दुसरीकडे युक्रेनमध्ये झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर आता अंतर्गत दबाव वाढला आहे.

युद्धामुळे युरोपियन युनियनने रशियन तेल व नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व आणखी कमी केले आहे. त्याचा फायदा कतार, नॉर्वे आणि अमेरिकेसारख्या देशांना होत आहे. दुसरीकडे, रशियाने भारत व चीनला खनिज तेलाची निर्यात वाढवत जी-७ देशांच्या निर्बंधांना ठेंगा दाखवला आहे. भारत तर रशियाकडून शस्त्रास्त्रेही विकत घेत आहे. त्यामुळे अमेरिका चिडली असून अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी यासंदर्भात भारताला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन संघर्षाची व्याप्ती वाढू लागली की काय, अशी शंका घ्यायला जागा निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा विस्तार आणि त्यातील नित्य बदलणारी रणनीती ही केवळ दोन देशांच्या सीमांपुरती मर्यादित नाही. जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था, ऊर्जा राजकारण आणि मानवाधिकार या सर्वच क्षेत्रांवर याचा मोठा परिणाम होत आहे.

सध्या तरी या संघर्षाचा शेवट नजरेच्या टप्प्यात दिसत नाही. ताज्या संघर्षानंतर, तुर्कीची राजधानी इस्तंबूल येथील नियोजित रशिया-युक्रेन शांतता वाटाघाटी अवघ्या तासाभराच्या आत आटोपत्या घेण्यात आल्या. कोणीही माघार घ्यायला तयार नाही, हाच त्याचा अर्थ! या संघर्षात प्रत्यक्ष सहभागी असलेले रशिया व युक्रेन, तसेच हितसंबंध गुंतलेले युरोपियन देश आणि अमेरिकेच्या नेतृत्वाला लवकरात लवकर उपरती होवो आणि संघर्ष संपुष्टात येवो, अशी इच्छा प्रकट करण्यापलीकडे उर्वरित जगाच्या हाती काही नाही!

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध