प्रत्येकाच्या आयुष्याशी पावसाचे नाते जिव्हाळ्याचे असते. शेतकऱ्याच्या शिवारात उगवणाऱ्या पिकाशी, शहरातील पाण्याच्या नळाशी, धरणातील पाण्याशी, गावकुसातील तलावाशी आणि अगदी अर्थव्यवस्थेच्या चक्राशी पाऊस थेट जोडलेला असतो. म्हणूनच, पाऊस पडतो की नाही, किती पडतो, कुठे जास्त- कुठे कमी पडतो, यावरून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य वा काळजीचे सावट उमटत असते. यंदा तर एक महिना आधीच पावसाचे आगमन झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला होता. दक्षिण-पश्चिम मान्सून महाराष्ट्रात यावर्षी अपेक्षेपेक्षा काहीसा आगाऊ आला. मुंबईत २६ मे रोजीच पावसाची हजेरी लागली, जी साधारण १६ दिवस आधीची होती. जून महिन्यात राज्यभर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पुण्यात तर २६७.५ मिमी पावसाची नोंद झाली : गेल्या १२ वर्षांत जून महिन्यातील सर्वाधिक पाऊस!
जुलैच्या पहिल्या अर्ध्या भागातही पावसाची लय टिकून होती. तथापि, जुलैच्या उत्तरार्धात पावसाचा खंड पडला आणि अनेक भागांमध्ये कोरडी परिस्थिती निर्माण झाली. अर्धा ऑगस्ट संपला तरी आभाळाचा रुसवा न निघाल्याने सगळेच काळजीत होते. परंतु, निसर्गालाच शेवटी दया आली आणि अरबी समुद्रसपाटीला समांतर असा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला. विदर्भ-मराठवाड्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. तर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने जणू आभाळच फाटले! गेल्या तीन-चार दिवसांत वार्षिक सरासरी ओलांडणारा मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे दाणादाण उडाली आहे. अरबी समुद्राला आलेली भरती आणि धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईच्या काळजातून वाहणाऱ्या मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कुर्ला परिसरातील अनेक घरांत पाणी शिरले.
रेल्वेमार्ग पाण्यात बुडल्याने या महानगराची लाइफलाइन उपनगरीय रेल्वेसेवा ठप्प झाली. खासगी कार्यालये आणि शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे तेवढे हाल झाले नाहीत. मात्र दैनंदिन जीवन व्यवहारावर परिणाम झाला. विदर्भ-मराठवाड्यात तर या पावसाने अक्षरश: कहर केला. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने मोठी जीवितहानी झाली. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेकडो पशुधन आणि अठरा जण दगावल्याचे वृत्त आहे. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास चौदा लाख हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आहे. यंदाचा पाऊस सरासरीहून थोडा अधिक असेल असा अंदाज हवामान खात्याने एप्रिल महिन्यात वर्तविला होता. मात्र हा अधिकचा पाऊस कधी, कोणत्या महिन्यात पडेल हे काही सांगितले नव्हते. आपल्याकडे मृग नक्षत्रानंतर खरिपाची पेरणी सुरू होते. पण मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे या नक्षत्राच्या अगोदरच शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली. मे-जूनमध्ये पडलेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली. पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला, पण पावसाने मध्येच दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांनी माना टाकल्या होत्या.
गणेशोत्सवाच्या काळात पावसाचे पुनरागमन होईल असा अंदाज वर्तविण्यात येत असतानाच अचानक ढगांचे नेपथ्य बदलले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. अवघ्या अठ्ठेचाळीस तासात जवळपास सर्वच धरणांचे दरवाजे उघडावे लागले. कर्नाटक आणि तेलंगणा या शेजारी राज्यांतील धरणाच्या बॅकवॉटरमुळे सीमेलगतच्या गावांत पाणी शिरले. नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना या पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला. राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणेला पाचारण करावे लागले. एनडीआरएफच्या जवानांनी आपले जीव धोक्यात घालून अनेक जणांचे प्राण वाचविले. मुंबईत पोलिसांनी जिवाचे रान करून अनेकांना मदतीचा हात दिला. परवापर्यंत पावसाच्या थेंबाथेंबासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेल्यांच्या पापण्यांना या पावसाने पूर आणला. आपण नक्षत्रांचे पंचांग उघडून बसलेलो असताना पावसाने आपला लहरीपणा पुन्हा एकदा सिद्ध केला.
उन्हाळ्यात केलेले बंड, जुलै-ऑगस्टमधील खंड आणि आता उदंड! एकीकडे आपण निसर्गाचा विध्वंस करणार आणि दुसरीकडे आपल्या वेळापत्रकाप्रमाणे पाऊस पडावा, ही अपेक्षाच मुळात व्यर्थ. वीस मिलीमीटर पाऊस झाला तरी शहरं का तुंबतात, याचा कधी आपण विचार करणार आहोत की नाही? नैसर्गिकरीत्या पाण्याचा निचरा करणाऱ्या ओढे, नदी-नाल्यांवर अतिक्रमण केल्यानंतर हीच परिस्थिती ओढवणार. पावसाचा गुन्हा एवढाच की, तो ओलंसुकं असा भेदभाव न करता सगळ्यांना सारखाच तडाखा देतो. मापात पाप करत नाही!