शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सांस्कृतिक राष्ट्रवादाशी जोडलेली महात्मा गांधीजींची अहिंसा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 05:48 IST

राजसत्तेची हिंसा वैधानिक आणि प्रजेची मात्र बंड ठरते. हे ओळखून असलेल्या गांधीजींनी हिंसेचा प्रतिकार अहिंसेने करण्याचे नैतिक साहस जनतेत निर्माण केले!

कलराज मिश्र, राज्यपाल, राजस्थान

महात्मा गांधी यांना आपण सर्वजण राष्ट्रपिता संबोधतो. जेव्हा जेव्हा मी त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या संबोधनाचा सखोल विचार करतो तेव्हा देशाविषयीचे त्यांचे आदर्श, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची उदात्त दृष्टी या गोष्टी समोर येतात. गांधीजींनीच स्वातंत्र्य चळवळीला व्यापक बैठक प्राप्त करून दिली आणि भारतीय संस्कृती तसेच जीवनमूल्यांशी हे आंदोलन जोडले. एक देश म्हणून भारताचा विकास केवळ इथला भूभाग किंवा कुठल्याही राजकीय सत्तेमुळे झालेला नसून पाच हजार वर्षांपेक्षा जास्त जुन्या संस्कृतीमुळे झालेला आहे. एका मोठ्या भूप्रदेशावर भाषा, क्षेत्रीय परंपरांची विविधता असूनही आपली सांस्कृतिक मूल्ये निरंतर जिवंत राहिली. गांधीजींनी हेच सांस्कृतिक चैतन्य अहिंसा आणि नैतिक जीवनमूल्यांशी जोडले. हाच त्यांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करताना त्यांनी देशाला सांस्कृतिक स्तरावर एक केले. सांस्कृतिक एकता ही आपल्या देशाला राष्ट्रीय ओळख देणारी सभ्यतामूलक दृष्टी आहे, हाच खरा वास्तविक सांस्कृतिक राष्ट्रवाद ! यातच अनेकतेतून एकतेचे बीज अंकुरते. गांधीजींनी देशातल्या विविधतेतील ताकद ओळखून समानतेचे सूत्र धरून देशाला स्वातंत्र्य चळवळीत आणले. देशाला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांनी प्रत्येकाची भागीदारी नक्की केली. त्यांना स्वातंत्र्य केवळ इंग्रजांच्या गुलामीपासून मिळवायचे नव्हते; संपूर्ण देशात स्वराज्य स्थापन करण्यावर त्यांचा भर होता. म्हणूनच त्यांनी स्वदेशीच्या मार्गाने देश आणि त्याच्याशी जोडलेल्या वस्तू, संस्कृतीवर प्रेम करण्याची शिकवण दिली.

गांधीजींनी राजकारणाला  सृजन आणि सहनशीलतेशी जोडले. चरख्यावर सूत कातणे, विदेशी वस्तूंवर बहिष्कार यात दुसऱ्या पक्षाला विरोध नव्हता, तो सर्जनशीलतेचा आविष्कार होता. न्यायसंगत राजनीतीची गांधीजींची नाळ सांस्कृतिक राष्ट्रवादाशी जोडलेली होती. त्यामुळेच विरोधी पक्षांच्या गैर वागण्यावरून ते कधी क्रोधीत झाले नाहीत. उलट ते वागणे सहन करण्याची क्षमता विकसित करण्यावर त्यांनी जोर दिला. समाजात जाती, धर्म, संप्रदायाच्या नावाने भांडणे लावून हिंसेला प्रवृत्त करण्याचा मार्ग इंग्रज अवलंबत. त्याच्या आडून ते स्वातंत्र्य चळवळ करणाऱ्यांचे दमनही करत. पण गांधीजीनी चम्पारण सत्याग्रह करून स्वातंत्र्य चळवळीत वेगळ्या प्रकारे राजकीय प्रवेश केला. गांधींच्या नेतृत्वाखाली लोकांनी राजसत्तेविरुद्ध ना बंड केले ना हिंसा! नीळ आंदोलनात ब्रिटिश सरकारने गांधींना अटक केली तेव्हा १९१७मध्ये न्यायाधीशांसमोर त्यांनी केलेले निवेदन आजही मननीय आहे. ते म्हणाले होते, ‘मी कायदा तोडला आहे. त्याबद्दल आपण मला शिक्षा देऊ शकता; पण या देशात कोठेही जाण्याचा मला अधिकार आहे.’ निर्भयपणे अहिंसक मार्गाने आपले म्हणणे तर्कसंगतपणे मांडण्याची त्यांची ही शैली नंतर स्वातंत्र्य चळवळीचा मूलमंत्र झाली. तर्कनिष्ठ अहिंसक मांडणीमुळे इंग्रजांना चम्पारण आंदोलनात पडते घ्यावे लागले. ब्रिटिशांविरुद्ध अहिंसा एक प्रभावी शस्र झाले.

राजसत्तेची हिंसा वैधानिक आणि प्रजेची मात्र बंड मानली जाते.  बंडाला अनैतिक मानून चिरडणे काही कठीण नसते. त्यामुळेच पुष्कळदा बंडात अनैतिकता शिरते. परिणामी राजसत्तेला जनतेचे बंड चिरडण्याचा नैतिक अधिकार मिळतो. इंग्रजांनी नेहमी हेच केले. गांधी हे ओळखून होते. त्यांनी राजसत्तेच्या हिंसेचा प्रतिकार भारतीय संस्कृतीतल्या अहिंसेने करण्याचे नैतिक साहस जनतेत निर्माण केले. अहिंसेच्या त्यांच्या शस्रापुढे  सत्तेचे दमन मार्ग हात टेकत. गांधीजींनी अशा प्रकारे इंग्रजांना मानसिक दुर्बल करण्याचे काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली स्वातंत्र्याची लढाई म्हणूनच यशस्वी झाली. देशाच्या विविधतेतील एकता पाहून अंत्योदय, समानता आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा त्यांचा अहिंसक मार्ग समजून घेतला तरच त्यांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि न्यायसंगत राजनीतीची त्यांची गाढ समज लक्षात येऊ शकते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी