शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 07:48 IST

पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशीच अजित पवारांनी ‘गमावले’ होते, त्यातले पुष्कळ परत कमावले! शरद पवारांनी मात्र (पुन्हा एकदा) सगळे गमावलेले आहे. पण त्यांचे राजकारण ‘संपवणे’ सोपे कसे असेल?

संजय आवटेसंपादक, लोकमत, पुणे

यशवंतराव चव्हाणांची आज पुण्यतिथी. बाकी सारेजण विसरले तरी, शरद पवार कसे विसरतील? यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी शरद पवार आज आदरांजली अर्पण करताहेत. यशवंतराव गेले, त्याला आज बरोबर चार दशके होत आहेत. या चाळीस वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. ‘कृष्णेकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’, अशा भावनेने शरद पवार आज तिथे जातील, तेव्हा त्यांच्यासमोर केवढा मोठा पट उभा राहिलेला असेल! १९६७ मध्ये शरद पवारांनी बारामतीतून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली, तेव्हा ‘या २७ वर्षांच्या पोराला उमेदवारी नको’, म्हणून अनेक ज्येष्ठांनी विरोध केला. यशवंतराव म्हणाले, “होऊन होऊन काय होईल! फार तर एक जागा जाईल. जाऊ द्या. पण, या पोराला आपल्याला बळ द्यायचं आहे!” शरद पवार आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. पक्ष बदलले, चिन्ह बदलले. पण, बारामतीत पवारांचीच ‘पावर’ राहिली. 

शरद पवार त्यानंतर अवघ्या दहा वर्षांत मुख्यमंत्री झाले आणि मग पुढे दहा-बारा वर्षांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले. कमालीची महत्त्वाकांक्षा आणि मुत्सद्देगिरीच्या बळावर पवारांनी देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला. संख्याबळाचा विचार करता पवार फार चमकदार कामगिरी करू शकले असे नाही. मात्र, पवारांना वगळून राजकारणाचा विचारही करता येणार नाही, असे स्थान त्यांनी तयार केले. शीर्षस्थ नेतृत्वाला आव्हान देताना अनेक धोके पत्करले. ते धोके एवढे मोठे होते की, ‘पवार संपले...’ असा गजर दर काही वर्षांनी होत असे. मात्र, त्यातून तावून सुलाखून पवार उभे राहिले आणि नव्या तेजाने तळपत राहिले. इंदिरा गांधी असोत की सोनिया, पवारांनी दिल्लीला कायम आव्हान दिले. त्याचे फायदे त्यांना मिळाले. आणि त्याची मोठी किंमतही त्यांनी चुकवली.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या राजकारणाचा पट बदलला. अनेकांची वाताहत झाली. पवार मात्र ‘कधी दोस्ती, कधी कुस्ती’ असा गनिमी कावा करत आपले ‘स्वराज्य’ सांभाळत राहिले. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मात्र सारे गमावलेल्या पवारांना थेट मैदानात उतरावे लागले. या युद्धात त्यांनी निर्णायक विजय मिळवला खरा; पण, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीचे संदर्भच बदललेले होते. २०१९च्या विधानसभा युद्धात आणि त्यानंतरच्या तहात देवेंद्र फडणवीसांना चारीमुंड्या चीत करत पवारांनी आपली जादू सिद्ध केली. त्यापाठोपाठ झालेल्या चकमकीही पवारांनी जिंकल्या. यावेळी मात्र फडणवीसांनी मांड ठोकली. फडणवीसांकडे क्षमता आहेच. शिवाय सत्ता आहे, यंत्रणा आहे, संसाधने आहेत आणि वयही आहे. हे सारे प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या पवारांना आजवरच्या सर्वात वाईट पराभवाला तोंड द्यावे लागले.  लोकसभेला लोकांनी हातात घेतलेली निवडणूक विधानसभेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वतःच्या हातात घेतली, हे त्यांच्या अपयशाचे खरे कारण! लोकसभेला तयार झालेले ‘नॅरेटिव्ह’ एवढ्या लवकर धूसर व्हावे आणि आघाडीला अशा मानहानिकारक पराभवाला तोंड द्यावे लागणे धक्कादायक आहे.

निवडणूक व्यवस्थापन नावाच्या गोष्टीकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केले. लोकसभेत ‘क्राउडपूलर’ ठरलेल्या उद्धव ठाकरेंना त्या वातावरणाचा फायदा तेव्हाही घेता आला नव्हता, ते विधानसभेत अपयशी ठरणार, हे स्वाभाविकच होते. फक्त आक्रमक भाषणे ठोकून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी गणितेही करावी लागतात, हे उद्धव विसरले. तर, शरद पवार फक्त गणितेच करत बसले! मग लाडकी बहीण एकवटली. जातीय समीकरणे हाताबाहेर गेली. मतांचे विभाजन झाले. निवडणूक व्यवस्थापनात सत्ताधारी भारी पडले आणि महाविकास आघाडीसोबत पवारांचाही पराभव झाला.

या निकालाचे सगळ्यात मोठे लाभार्थी अजित पवार ठरले आहेत! विजयानंतरच्या  संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवारांचे सुटकेचे निःश्वास स्पष्टपणे ऐकू येत होते. गुलाबी जॅकेट असो की, ‘मेकओव्हर’चा प्रयत्न असो, थट्टा आणि टवाळीला त्यांना तोंड द्यावे लागले. ज्यांना सोडून ते गेले, ते तर त्यांच्या विरोधात होतेच. शिवाय, ज्यांच्याकडे गेले, त्यांनाही ते नको होते. अजित पवारांसोबत जे गेले, त्यांच्या मनातही आपण चूक केली, अशीच पाल चुकचुकत होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने हादरून गेलेले अजित पवार नव्या उमेदीने या रिंगणात उतरले आणि विजयी झाले. 

अजित पवारांना राजकारणात आणले ते शरद पवारांनीच. १९९१ मध्ये अजित खासदार आणि मग आमदार झाले. तो काळ शरद पवारांच्या राष्ट्रीय राजकारणातील आकांक्षांचा होता. सुप्रिया कॉलेजात होत्या. त्यामुळे आपसूकच बारामतीसह राज्याची धुरा अजित पवारांकडे आली. शरद पवारांनीच अजित पवारांकडे आपला वारसा दिला हे खरे, पण तरीही ‘शरद पवार विरुद्ध अजित पवार’ असा सामना सुरू झालाच. आधी शीतयुद्ध असलेला हा सामना अगदी थेटपणे सुरू झाला, तो २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटेच्या शपथविधीने अजित पवारांनी काकांना आव्हान दिले तेव्हा काकांनी ते परतवून लावत त्यांना शरण येण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र विचारपूर्वक निर्णय घेऊन अजित पवारांनी दंड थोपटले. लोकसभा निवडणुकीत बारामतीत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. मात्र संयमाने संघर्ष करत त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपली ताकद २३ नोव्हेंबरलाच सिद्ध केली. एक वर्तुळ पूर्ण झाले.

आज अजित पवार ६५ वर्षांचे आहेत. तुलनेने त्यांच्याकडे वय आहे. अनुभव आणि आवाका आहे. आगामी काळात ‘पूर्ण’ पक्षावर निर्विवाद पकड मिळवण्याची संधी त्यांना अधिक आहे. अजित पवार ज्यांच्यासोबत गेले आहेत, ते त्यांचा फक्त वापर करतात की अजित पवारच ही संधी वापरून महाराष्ट्राचे अव्वल नेते बनतात, हे भविष्याच्या पोटात दडले आहे. शरद पवारांनी मात्र (पुन्हा एकदा) सगळे गमावलेले आहे. अतिरेकी महत्त्वाकांक्षांमुळे अनेकदा त्यांनी स्वतःच्या राजकारणाची फरफट करून घेतली हे खरे, पण आपले अव्वल स्थान कायम ठेवले. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अथवा बीसीसीआय-आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार असतात. कारण, राजकारणाच्या सर्वांगीण स्वरूपाचे भान त्यांना आहे. हे भान त्यांना दिले यशवंतरावांनी. मात्र दिल्लीशी झुंजताना यशवंतरावांचा झालेला पराभव आणि नंतरचा त्यांचा विजनवास यातूनही पवार बरेच काही शिकले आहेत. “कर्करोग झाल्यानंतर खुद्द डॉक्टर मला म्हणाले होते, तुमच्याकडे आता कमी दिवस शिल्लक आहेत”, अशी आठवण सांगून पवार म्हणतात - “असे भाकीत करणारे ते डॉक्टर गेले, मी मात्र आहे.” - हे शरद पवार आहेत! पवारांचे राजकारण म्हणजे महत्त्वाकांक्षा आणि मुत्सद्देगिरी तर आहेच, पण ‘माझ्या राजकारणाला गांधी-नेहरूंचे, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे अधिष्ठान आहे’, असे म्हणणाऱ्या पवारांचे राजकारण संपवणे सोपे कसे असेल? 

sanjay.awate@lokmat.com

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाYashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाण