शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Maharashtra Election 2019 : दुष्काळी मराठवाड्यात बंडखोरीचे अमाप पीक !

By सुधीर महाजन | Updated: October 14, 2019 18:25 IST

शिवसेनेला बालेकिल्ल्यातच आव्हान

ठळक मुद्देशिवसेनेला बालेकिल्ल्यातच आव्हानअशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला परळीतील लढतीकडे राज्याचे लक्ष

- सुधीर महाजन 

मराठवाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे ती राजकीय प्रयोगशाळा आहे. विरोधाभास असा की, निजामशाहीच्या मानसिकतेत असूनही मराठवाड्याइतके राजकीय प्रयोग राज्यात इतरत्र कोठेच झाले नाहीत. पु.लो.द.चा प्रयोग संपल्यानंतर ८० च्या दशकात शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसचा प्रयोग येथेच केला. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईबाहेर शिवसेना नेताना ती प्रथम मराठवाड्यातच आणली. खरे तर त्यांनी हा प्रयोग कोकणात केला नाही? प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीचा पहिला प्रयोग किनवटमध्ये भीमराव केरामांच्या रूपात होता. सामाजिक प्रयोगाचा विचार केला, तर समतेच्या लढ्यात मैलाचा दगड ठरलेले ‘नामांतर आंदोलन’ जसे मराठवाड्याचे तसे आरक्षणाच्या मुद्यावर गाजलेल्या ‘मराठा आंदोलनांची’ सुरुवातही येथूनच झाली. यावेळी युती असल्याने आपला आकडा वाढवण्याची संधी दोन्ही पक्षांना नाही. राज्यभर युतीचीच हवा गरम असताना जास्तीत जास्त जागा खिशात घालण्याची तयारी चालली असताना युतीलाच बंडखोरीच्या लष्करी अळीने पोखरले आहे. या दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. हे भाजपची पक्ष शिस्त संपल्याचे, तसेच सेनेचा धाक उरला नसल्याचे संकेत मानायचे का, असा प्रश्न आहे. या आडून दुसरा मुद्दा पुढे येतो म्हणजे, एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी नव्हे, तर हे पायात पाय घालण्याचे राजकारण खेळले गेले नसणार? राजकारणात कोणतीच शक्यता नाकारता येत नाही. 

नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे शहर महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी बंडखोरी केली. गेल्या निवडणुकीत ते हेमंत पाटलांच्या विरोधात फार कमी मतांनी पराभूत झाले होते. आता या कंदकुर्तेंना भाजपमधूनच उघडउघड रसद मिळते. आमदारपुत्रच प्रचारात सहभागी होतात यावरून सगळे लक्षात येते. हदगावमध्ये नागेश पाटील आष्टीकर या सेनेच्या उमेदवाराविरुद्ध सेनेच्याच बाबूराव कदमांनी बंडखोरी केली. लोहा मतदारसंघात तर ही हाणामारी अधिक गडद झाली. भाजप आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा हा परंपरागत मतदारसंघ. ते शिवसेनेतून भाजपमध्ये आले म्हणून या मतदारसंघासाठी भाजपने आग्रह धरला होता. सेनेने तो सोडला नाही. तेथे चिखलीकरांनी सेनेचे मुक्तेश्वर धोंडगेच्या विरोधात आपले मेहुणे आणि माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदेंना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उभे केले.

बंडखोरीची ही साथ परभणीतही पसरली. या जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघात भाजपचे मोहन फड यांच्या विरोधात सेनेचे जगदीश शिंदे यांनी बंडखोरी केली. फड हे गेल्यावेळी सेनेच्या मीराताई रेंगे यांचा पराभव करून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी पुढे सेनेत प्रवेश केला; परंतु सेनेचे खा. बंडू जाधवांशी मतभेद झाल्याने ते भाजपवासी झाले आणि त्यांच्यासाठी भाजपनेही ही जागा मागून घेतली. शेजारच्या गंगाखेडमध्ये शिवसेनेचे विशाल कदम आणि रा.स.प.चे रत्नाकर गुट्टे यांची लढत आहे. गंमत म्हणजे हे दोन्ही युतीमधील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना, तर जिंतूरमध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकरांविरुद्ध शिवसेनेचे राम खराबे यांनी बंडखोरी केली. बंडखोरीची ही लागण शेजारच्या हिंगोलीमध्येही झाली. वसमतमध्ये सेनेचे जयप्रकाश मुंदडा यांच्या विरोधात अपक्ष अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी बंडखोरी केली. जाधव हे भाजपचे आहेत. कळमनुरीमध्ये काँग्रेसचे संतोष तारफे यांच्या विरोधात अजित मगर हे वंचित आघाडीकडून मैदानात उतरले. या दोन्ही मतदारसंघांमध्ये वंचितने अडचण निर्माण केल्याचे चित्र आहे. 

लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली. तेथे काँग्रेसचे बसवराज पाटील असले तरी जि.प.चे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी पवारांच्या विरोधात बंडखोरी केली, तर उस्मानाबादेत सेनेच्या कैलास पाटलांच्या विरोधात सेनेचेच अजित पिंगळे उतरले, तर परंडामध्ये सेनेच्या तानाजी सावंतांना त्यांच्याच पक्षाच्या सुरेश कांबळेंनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन विरोध केला. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये शिवसेनेचे विजयसिंह पंडित यांच्या विरोधात त्यांचेच काका बदामराव पंडितांनी बंडखोरी केली. बदामराव हे शिवसेनेचे माजी मंत्री आणि दोन वेळा अपक्ष आमदार होते. 

औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी बंडखोरी केली, तर सिल्लोडमध्ये शिवसेनेचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली. सत्तारांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध होता आणि मतदारसंघही भाजपचा होता; पण तो सेनेला दिला. त्यामुळे भाजप बंडखोर नेते काँग्रेसचे प्रभाकर पालोदकरांच्या पाठीमागे उभे राहिले आणि पालोदकरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. बंडोबांचा हा त्रास सत्ताधारी सेना-भाजप यांनाच मोठ्या प्रमाणावर दिसतो. यावरून सत्ताधारी पक्षातील खदखद बाहेर आली आहे आणि पक्षशिस्त, धाक, दरारा यांना फारसे कोणी घाबरलेले नाही.

दिग्गजांचे भवितव्य पणालाग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ही लढत राज्यात लक्षवेधी समजली जाते. याशिवाय जालन्यात रोहयो राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल. फुलंब्रीतून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे, तर सिल्लोडमध्ये सेनेचे अब्दुल सत्तार आणि अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर या लढती लक्षवेधक ठरतील. तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भोकरमधून लढत आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे अनुक्रमे लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघातून लढत आहेत. 

प्रचारात मुद्दे हरवले

पाच वर्षांपासून सततचा दुष्काळ हा मोठा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने जगण्याचेच प्रश्न मोठे आहेत. मात्र निवडणूक प्रचारात या मुद्याचा कुठेच उल्लेख होत नाही. सत्ताधारी पक्षाचे नेते ‘कलम ३७०’ वरच बोलत आहेत.

पीक विमा हा एक प्रश्न आहे. पीक विमा वाटपात घोटाळा झाला. मिळालेली मदत समन्याय पद्धतीने मिळाली नाही. प्रत्येक जिल्ह्यासाठी निकष बदलले. शिवाय सर्वांनाच विम्याचा लाभ मिळाला नाही.

अपुऱ्या पावसामुळे एक जायकवाडी वगळता मराठवाड्यातील सर्व जलसाठे कोरडे आहेत. ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे. युती सरकारने टँकरमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केली होती. मात्र, पाच वर्ष सरले तरी एकही टँकर बंद झालेला नाही. यंदा चारा छावण्या सुरू करण्यासही विलंब झाला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Marathwadaमराठवाडाvidhan sabhaविधानसभा