महाश्रमदानाची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:11 AM2018-04-27T00:11:45+5:302018-04-27T00:11:45+5:30

अभिनेता आमिर खान याने दिलेल्या भेटीनंतर या गावातील नागरिकांमध्ये संचारलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता.

Maha Mahamadan Ki Kamayya | महाश्रमदानाची किमया

महाश्रमदानाची किमया

Next


काकडदरा वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातलं छोटसं पण टुमदार गाव. पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीने प्रकाशझोतात आलेलं. अभिनेता आमिर खान याने दिलेल्या भेटीनंतर या गावातील नागरिकांमध्ये संचारलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता. म्हणूनच तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे बक्षीस या गावाने पटकावले. यंदाही आमिर खान यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना श्रमदान आणि पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या वर्षीही चांगलीच रंगात आहे. वर्धा जिल्ह्यातील रानवाडी येथील बंडू धुर्वे या अंध व्यक्तीच्या कार्याने प्रभावित होऊन आमिर खान याने परवा पत्नी किरण राव यांच्यासह चक्क रानवाडी गाठले. आठ तास मुक्कामच केला नाही तर हातात फावडे आणि टोपले घेत श्रमदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातही चिमुकल्यांनी मोठ्यांचा आदर्श घेत वॉटर कप स्पर्धेत खारीचा वाटा उचलला आहे. त्याचीही दखल आमिरने घेतली. चिमुकल्यांना भेटून त्यांचे मनोबल वाढविले. शिवाय आपल्या वॉटर कप स्पर्धेच्या लघु चित्रपटातही त्याने या चिमुकल्यांना स्थान दिले. त्यामुळे बोरी महल या लहानशा गावाचे महत्त्वही आपसूकच वाढले आहे. पाणीटंचाईने गावा गावात हाहाकार माजविला असून त्यापासून सुटका म्हणजे आपले गाव पाणीदार करणे. त्यामुळे गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात महाश्रमदानात लागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तर अपुऱ्या पावसाने पाणीटंचाईत चांगलीच भर घातली आहे. याची चाहूल हिवाळ्यातच लागली होती. पैनगंगा नदी हिवाळ्यातच आटल्याने तिरावरील ५० गावात पाणीटंचाई निर्माण झाली. पुसद तालुक्यातील माळपठार भागातील ४० गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत आहे. यावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. पाण्याची सोय वेळीच केली नाही तर उद्याचे भवितव्य अंध:कारमय आहे, असा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे. हे आता चिमुकल्यांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे बोरी महल येथील विद्यार्थी आता स्वत:च रोपवाटिका तयार करतात. शोषखड्ड्यांसाठी श्रमदान करतात. बंधाºयाची आखणी करून देण्यात तर ते तरबेज झाले आहेत. ढाळीचे बांध व इतर बंधारे तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. गाव पाणीदार करण्याच्या दिशेने चिमुकल्यांनी उचललेले पाऊल निश्चितच अभिनंदनीय असून इतरांनीदेखील त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

Web Title: Maha Mahamadan Ki Kamayya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.