समजेल, आचरणात आणता येईल अशा विचारांची जादू!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:17 AM2021-10-19T05:17:48+5:302021-10-19T05:18:14+5:30

वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मदिनी आज, ‘मनुष्य गौरव दिन ’ साजरा होतो आहे, त्यानिमित्ताने...

The magic of thoughts that can be understood and put into practice! | समजेल, आचरणात आणता येईल अशा विचारांची जादू!

समजेल, आचरणात आणता येईल अशा विचारांची जादू!

Next

- आमोद दातार (स्वाध्याय परिवार) aamod.datar@gmail.com

वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले. दादा आपल्या या भारतभूमीतील तत्त्वचिंतक तर, होतेच परंतु  त्याहीपेक्षा काकणभर अधिक अगत्याचे हे की, दादा एक कृतिशूर प्रयोगवीर तत्त्वचिंतक होते.

तत्त्वचिंतक असणे हे एखाद्याला तैलबुद्धीचे वरदान असेल आणि विद्याप्राप्तीसाठी अपरंपार कष्ट उपसण्याची तयारी असेल तर, शक्य होईलही, परंतु तत्त्वज्ञान जेव्हा स्वतः पचवायचे तर असतेच परंतु समाजातील शेवटच्या माणसापर्यंत जाऊन ते अंशमात्र का होईना आचरणात आणावायचे असते, तिथे विचारकांची कसोटी आणि वेगळेपण असते. दादांचे लख्ख वेगळेपण हे, की ते प्रकांड बुद्धिशाली पंडित तर होतेच पण, त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी त्याला समजेल, रुचेल आणि पचेल अशा भाषेत तत्त्वज्ञान सांगितले. विचार सांगितले इतकेच नव्हे तर, प्रथम ते आचरणात आणून मग सांगितले. 

‘आधी केले, मग सांगितले’ असे आपल्याकडे म्हटले जाते, पण, दादा इतके वेगळे  की, त्यांनी स्वतः अपार कष्ट करूनही स्वतःहून कधी त्याबद्दल सांगितले  नाही. इतकेसे काही केले तर, त्याचा डंका पिटणारे जिथे आज उदंड आहेत, एका छोट्याशा गावात काहीतरी छोटासा बदल घडवून आणला तर, लोक काय डोक्यावर घेतात, पणदादांनी अक्षरशः हजारो गावात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे, पण, त्याची प्रसिद्धी नसल्याने ते आपल्याला समजत पण नाही आणि खरेही वाटत नाही. 

दादांना प्रकांड बुद्धिशाली पंडित म्हणावे, तर स्वतःचे मोठेपण सोडून हजारो गावात लाखो लोकांना प्रेमाने भेटणारा, विचार देणारा, निरपेक्ष संबंध बांधणारा शास्त्री पंडित या उभ्या देशाने दुसरा पाहिलेला नाही. अन्य कुठल्या शास्त्रीबुवाने व्याख्याने, प्रवचने करायची सोडून आसेतुहिमाचल फिरून आपले कपडे धुळीने माखून घेतले आहेत?, कुठला व्युत्पन्न पंडित जो ब्रह्मसूत्र, शांकरभाष्य, उपनिषदे याबरोबरच कान्ट, ॲरिस्टॉटल, हेगेल, मार्क्स अशा उदंड विषयांवर अधिकारवाणीने बोलू शकतो, त्याने सामान्य खेड्यातील शेतकऱ्याशी प्रेमाने संबंध बांधले आहेत?, दादांनी ते केले म्हणून त्यांना कुठल्या चौकटीत बसवायचे हेच समजत नाही. 

भगवंत केवळ अकाशात नाही, मंदिरात नाही, तर माणसा-माणसाच्या हृदयात आहे. माणसातल्या या ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा संदेश दादांनी दिला. 
दादा नेहमी म्हणत की, भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे तर, भक्ती म्हणजे मी त्या भगवंतापासून विभक्त नाही ही पक्की समजूत. त्याच्या हृदयस्थ असल्यामुळे माझे अस्तित्व आहे ही भावपूर्ण समजूत भक्तीत नसेल तर, केवळ फुले, हार, सजावट, प्रसाद हे सर्व उपचारात्मक कर्मकांड अपूर्ण आहे. त्या ईश्वराने जसे माझ्यावर नि:स्वार्थ, निरपेक्ष प्रेम केले तसे करण्याचा छोटासा प्रयत्न मी केला पाहिजे अशी ‘कृतिप्रवण’ करणारी एक निश्चित विचारधारा लाखो लोकांमध्ये निर्माण करण्यामध्ये पांडुरंगशास्त्री यशस्वी झाले.

स्वाध्यायाचे काम करणाऱ्या कृतिशीलाची भूमिका फक्त भक्ताचीच आहे. केवळ भगवद्संबंधानेच व त्या दैवी भ्रातृभावाच्या नात्यानेच आम्ही आमची भक्ती म्हणून कृती करतो. हजारो स्वाध्यायी गावातून व्यसने हद्दपार झाली, तंटे मिटले, भेदाभेद मिटले ; ते काही मोर्चे काढून, आंदोलने करून अथवा दमदाटीने नव्हे तर, केवळ हृदयस्थ भगवंताच्या जाणीवेतूनच. दादांनी कधीच व्यसनमुक्ती किंवा तंटामुक्ती आंदोलन केले नाही. त्यांनी फक्त सांगितले की, देव तुझ्याबरोबर आहे तेव्हा दुराचार करताना, व्यसन करताना हा विचार कर की, त्याला काय वाटेल?,  दादांनी अक्षरशः लाखो लोकांमधील चेतना जागवली. केवळ चेतनाच जागवली असे नाही तर, व्यक्ती परिवर्तन व पर्यायाने समाज परिवर्तन घडून येण्यासाठी हृदयस्थ भगवंताच्या विचारातून उभी झालेली भक्ती हाच रस्ता आहे हे, ठामपणे प्रतिपादित केले. 

अशा विचारधारेवर जगणारा, दैवी भ्रातृभाव जपणारा, हजारो गावात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारा एक वैकल्पिक समाज (Alternative Society) पांडुरंगशास्त्री आपल्या उण्यापुऱ्या ८३ वर्षांच्या आयुष्यात उभा करू शकले हे विशेष उल्लेखनीय. ईश्वरनिष्ठा, कृतज्ञता, बंधुभाव, तेजस्विता, नम्रता, आत्मगौरव, परसन्मान यासारखे सद‌्गुण दृढ करण्यासाठी दादांनी स्वाध्यायींना अनेक अध्यात्मिक प्रकल्प आणि प्रयोग दिले. 
शेकडो गावात दादांचे योगेश्वर कृषी, मत्स्यगंधा, वृक्षमंदिर, श्रीदर्शनम् यांसारखे अनेक प्रयोग डौलाने उभे आहेत. दादांचे प्रयोग वैश्विक आहेत कारण ते माणसावर केलेले आहेत, काम पण वैश्विक आहे.
 
समाजात अशी सामान्य समजूत आहे की, दादांनी अगदी उपेक्षित अशा कोळी, आगरी, आदिवासी यांच्या जीवनातच आमूलाग्र परिवर्तन आणले, किंबहुना स्वाध्याय कार्य त्यांच्यासाठीच आहे असे अनेकांना वाटते. पण, दादांचे काम हे अखिल मानवजातीकरता, सर्वच माणसांकरता आहे. मग, तो सागरपुत्र असो, आगरी असो किंवा अगदी सुशिक्षित बुद्धिमान डॉक्टर्स, इंजिनिअर्स असोत. कारण शेवटी विचारांतून जीवनात एक दृष्टिकोन मिळवणे आणि त्या मार्गावर राहून आपल्या वृत्ती, कृती, वर्तन यात अपेक्षित परिवर्तन घडवून आणणे हे जितके सागरपुत्रांना आवश्यक आहे तितकेच अगदी उच्चविद्याविभूषित व्यक्तीलापण आवश्यक आहेच. 

आजच्या या पवित्र मनुष्य गौरव दिनी, ज्या महापुरुषाने लाखो लोकांची जीवने आमूलाग्र परिवर्तित केली त्या पांडुरंगशास्त्री आठवले या कृतिशूर तत्त्वचिंतकाला भावपूर्ण वंदन !!
 

Web Title: The magic of thoughts that can be understood and put into practice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.