हरवलेली रसिकता
By Admin | Updated: October 20, 2016 06:11 IST2016-10-20T06:11:10+5:302016-10-20T06:11:10+5:30
आपली कल्पकता, विचार आणि कौशल्य यांचा उपयोग करून माणूस निसर्गातील सौंदर्याला आपल्यात आणून आपल्या कलाकृती घडवीत असतो.

हरवलेली रसिकता
आपली कल्पकता, विचार आणि कौशल्य यांचा उपयोग करून माणूस निसर्गातील सौंदर्याला आपल्यात आणून आपल्या कलाकृती घडवीत असतो. माणूस हा सौंदर्याचा आस्वादही घेऊ शकतो आणि कलेच्या आविष्कारातून सौंदर्याची निर्मितीही करू शकतो. त्यातून काव्य, नाटक, संगीत, चित्र जन्म घेते. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित कलांचा निर्भेळ आस्वाद घेण्याची वृत्ती म्हणजे रसिकता होय. सौंदर्य हे निर्मितीने जेवढे फुलते त्यापेक्षाही रसिकतेच्या आस्वादाने अधिक खुलते.
रसिकत्व ही परमेश्वराने मानवाला दिलेली एक मोठी देणगीच आहे. थोडे वर्तमान स्थितीकडे पाहिल्यास लक्षात येईल, की आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत आणि सारखे धावत सुटलेल्या स्पर्धेच्या युगात आपण ही रसिकता हरवून बसलो आहोत. ज्ञानदेवांनी एक सुंदर दृष्टान्त दिला आहे.
वाघेवीण नादु। नेही कवणाही सादु।
का अपुष्पी मकरंदु।न लभे जैसा।।
फुलांचा सुगंध दरवळायला लागला की, आपोआप भ्रमर जमा होऊ लागतात. वाद्ये लावली आहेत, गाण्याची सुंदर मैफल रंगत आहे, गाण्याचे स्वर दूरवर पसरले आहेत, स्वरांचा अभिषेक होतो आहे, गाण्यातला प्रत्येक शब्द स्वरांनी नटला आहे, पण त्याचा आनंद घेण्यासाठी रसिकतेचा मात्र अभाव आहे. अशा सुरेल संगीताच्या मैफलीला रसिकांची म्हणावी तशी उपस्थिती लाभली नाही तर? फुलांच्या सुगंधासाठी भ्रमराला आवतण द्यावे लागत नाही. इथे बऱ्याच वेळा मैफलीसाठी माणसे जमवावी लागतात. कित्येक वेळा व्याख्यानमालेत श्रोत्यांअभावी वक्त्याला थांबावे लागते. उत्तम वक्ता असला तरी श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याशिवाय भाषण रंगणार नाही. मग चांगल्या वक्त्याला आणावे की नाही या विवंचनेत सापडणारे संयोजक आपणास नेहमी पहायला मिळतात. रसिकतेने ऐकणारा श्रोता लाभणार नसेल तर वक्त्याचा विचारसंवाद इथेच थांबेल.
रंगभूमीवरील उत्तम उत्तम नाटकेही रसिकांच्या अभावी कमी कमी होत आहेत. ‘माझ्या कानावर चहूबाजुंनी चांगले विचार पडोत’ असे म्हणणारी श्रवण संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. ‘वेळ नाही काय करावे’ हे कारण त्यासाठी पुढे केले जात आहे. जीवन जगताना ज्यातून आनंद मिळवायचा ती आनंदाची शिदोरीच आपणापासून दुरावत चालली आहे. तर दुसरीकडे प्रदूषण, ताण-तणाव, समस्या, कलह, जीवघेण्या स्पर्धा यांच्यामागे धावता धावता जगणेही क्लेशदायी होऊन बसले आहे. कोणत्याही प्राप्त स्थितीत जीवनाचा आनंद घेण्यासाठी काही वेळ बाजूला ठेवायलाच हवा. रसिकतेची अनुभूती हाच आनंद आहे. हरवलेली रसिकता हेच दु:ख होय. काकासाहेब कालेलकरांनी म्हटले होते. जगातील खरे दु:ख हे निर्धनता नसून निरसता आहे.
-डॉ. रामचंद्र देखणे