खालावली प्रचाराची पातळी

By Admin | Updated: May 8, 2014 21:20 IST2014-05-08T21:20:25+5:302014-05-08T21:20:25+5:30

पुढच्या आठवड्यात १६व्या लोकसभेच्या निवडणुका आटोपलेल्या असतील. १६ मे रोजी मतमोजणी आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येतील. निकालाचा अंदाज घेणे अवघड आहे.

Low level promotional level | खालावली प्रचाराची पातळी

खालावली प्रचाराची पातळी

>गौरीशंकर राजहंस - 
 
पुढच्या आठवड्यात १६व्या लोकसभेच्या निवडणुका   आटोपलेल्या असतील. १६ मे रोजी मतमोजणी आहे.  दुपारपर्यंत निकाल हाती येतील. निकालाचा अंदाज घेणे अवघड आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे पारडे जड आहे यात शंका नाही. या निवडणुकीत प्रचाराची पातळी खूप खाली आल्याचे देशाने पाहिले. मोदी आणि त्यांच्या विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सार्‍यांनीच पातळी सोडली. हा केबल टीव्हीचा जमाना आहे. देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात घडलेली 
घटना काही क्षणांत सारे जग पाहू शकते. परदेशात स्थायिक झालेले मूळचे भारतीय तर मोठय़ा उत्सुकतेने या निवडणुकीकडे पाहत आहेत. पण प्रचाराच्या मोहिमेत ज्या पद्धतीने अपशब्द वापरण्यात आले, व्यक्तिगत आरोप झाले ते  लोकांना आवडले नाहीत. ‘इकॉनॉमिस्ट’ नावाचे लंडनचे एक जगप्रसिद्ध नियतकालिक आहे. या नियतकालिकाने आपल्या ताज्या अंकात लिहिले आहे की, ‘‘भारतीय राजकारण्यांनी ज्या पद्धतीने एकमेकांना उंदीर, खाटिक, पाकिस्तानी एजंट, राक्षस आणि नाही नाही ते म्हटले त्यामुळे जगभर भारताच्या प्रतिमेला धक्का पोचला आहे.’’  मोदी आणि त्यांच्या विरोधकांनी व्यक्तिगत आरोपांच्या सार्‍या र्मयादा ओलांडल्या.  
काही महिन्यांपूर्वी अरविंद केजरीवाल नावाचा एक तरुण हातात झेंडा घेऊन निघाला. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत  त्याने दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनाच केवळ हरवले नाही तर २८ जागाही जिंकल्या. लोकांनी त्याला शक्ती दिली; 
कारण महागाई, भ्रष्टाचार, बेकारी या समस्यांनी लोक त्रासले होते. पण आपल्या स्वभावाने केजरीवाल यांनी मार खाल्ला. 
काही महिन्यांतच दिल्लीची गादी सोडून त्यांना पळावे लागले. मोदीच नव्हे, त्यांच्याऐवजी कुण्याही व्यक्तीने झेंडा उचलला 
असता, तर लोकांनी त्याचा जयजयकार सुरू केला असता. लोकांना सारे पसंत आहे; पण मोदींची व्यक्तिगत टीका आवडली नाही. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिमा स्वच्छ आहे; पण मोदी ममता बॅनर्जी यांच्यावरही चिडले. हा माणूस प्रत्येकालाच हाणतो, असा सामान्य लोकांचा समज झाला आहे. त्या दृष्टीने मोदी लोकांच्या नजरेतून थोडे उतरले आहेत. कोलकात्याच्या पहिल्या सभेत मोदींनी ममता सरकारची स्तुती केली होती. ‘ममता बंगालमध्ये आणि मोदी दिल्लीत’ असा नारा त्यांनी दिला होता. पण ममता बॅनर्जी यांनी मोदींना झिडकारले. सांप्रदायिकतेचा डाग लागलेल्या व्यक्तीशी आपण तडजोड करू शकत नाही, असे ममता म्हणताच उखडलेल्या मोदींनी दाíजलिंगमध्ये गोरखालँडची मागणी 
केली. ‘बांगलादेशी घुसखोरांना ममता ओवाळते. आपले सरकार सार्‍या घुसखोरांना पिटाळून लावील’ असेही मोदी गर्जले. 
या दोघांमधले मीमी-तूतू अजूनही थांबलेले नाही. ममताने त्यांची चित्रे भ्रष्ट मार्गाने विकली, असाही आरोप मोदींनी केला. 
मी ममता बॅनर्जींना जवळून ओळखतो. आठव्या लोकसभेत सुनील दत्त, ममता आणि मी असे तिघे एकाच बाकावर 
बसायचो. आमच्या मागे अमिताभ बच्चन बसत. समोर मीरा कुमार बसायच्या. सभागृहातला एक प्रसंग सांगतो. त्या दिवशी महिलांवरील वाढत्या अत्याचारावर चर्चा सुरू होती. हरियाणाच्या एका बलाढय़ नेत्याच्या सुनेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती.  कम्युनिस्ट पक्षाचे स्वर्गीय इंद्रजित गुप्ता यांनी लांबलचक भाषण केले. पण म्हणाले, हा राज्य सरकारचा विषय आहे. इथे लोकसभेत त्याची चर्चा होऊ शकत नाही. ममता यांचा संताप अनावर झाला. त्यांनी आपल्या पर्समधून दोन बांगड्या काढल्या आणि त्या गुप्ता यांच्या हातात देऊन म्हणाल्या, ‘बांगड्या घालून घरी बसा.’  पंतप्रधान राजीव गांधी सभागृहात उपस्थित होते. सारे पाहत राहिले.  सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. जेवणाच्या सुटीत इंद्रजित गुप्ता मला येऊन भेटले. गुप्ता मला म्हणाले, ‘ममता बॅनर्जींना समजवा. अशा प्रकारे त्या माझा अपमान करू शकत नाहीत. प्रेस गॅलरीत सार्‍या प्रमुख वृत्तपत्रांचे प्रतिनिधी बसले आहेत. विदेशातील पत्रकारही आहेत. उद्या बंगालसह देशाच्या सार्‍या वृत्तपत्रांमध्ये बातमी छापून येईल की, ‘इंद्रजित गुप्तांना ममता बॅनर्जींनी बांगड्या घातल्या.’ मी ममता बॅनर्जी यांना समजावले. तुम्ही असे करायला नको होते, असे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘माझ्याकडून चूक झाली;  पण महिलांवर होणारे अत्याचार मी सहन करू शकत नाही.’ मी ममता बॅनर्जी यांच्या घरीही गेलो आहे. मुख्यमंत्री असतानाही त्या अतिशय साध्या पद्धतीने जगतात. साधी सुती साडी नेसतात. पायात साधी स्लिपर असते. अशा व्यक्तीवर पैसा खाल्ल्याचा आरोप करणे योग्य नाही. 
मोदींचे चुकलेच. मोदींनी प्रियंका गांधी यांच्याशीही वाद घालायला नको होता. त्यांनी देशाच्या मोठय़ा मोठय़ा मुद्यांवर बोलले पाहिजे. सध्या आपला देश कठीण काळातून जात आहे. भारत दुबळा व्हावा अशी चीन, पाकिस्तान या शेजारी देशांची इच्छा आहे. अशा प्रसंगी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे. 
(लेखक माजी खासदार आहेत).

Web Title: Low level promotional level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.