लोकमत 'वसंतोत्सव'... अलौकिक स्वरांचे किमयागार वसंत देसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 06:47 PM2018-03-06T18:47:07+5:302018-03-06T18:47:07+5:30

संगीत, सामूहिक गान, पार्श्वगायन, अभिनय, दिग्दर्शन अशी कलाप्रांताची मुशाफिरी करून आपल्या कलेतून देशसेवा करणारे चतुरस्र संगीतकार वसंत देसाई!

Lokmat 'Vasantotsav' ... Supernatural Vocal Vasant Desai | लोकमत 'वसंतोत्सव'... अलौकिक स्वरांचे किमयागार वसंत देसाई

लोकमत 'वसंतोत्सव'... अलौकिक स्वरांचे किमयागार वसंत देसाई

Next

- रवींद्र वासुदेव गाडगीळ
संगीत, सामूहिक गान, पार्श्वगायन, अभिनय, दिग्दर्शन अशी कलाप्रांताची मुशाफिरी करून आपल्या कलेतून देशसेवा करणारे चतुरस्र संगीतकार वसंत देसाई!

वसंतराव देसाई या नावाने एक अलौकिक स्वरांचे किमयागार होऊन गेले. त्यांची आठवण होताच, प्रसन्न चेहऱ्याचे, तेजस्वी, स्नेहल डोळ्याचे, भारदस्त अन पिळदार देहयष्टीचे, हातात मोगऱ्याचा गजरा बांधलेले एक सदाबहार व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते. निरनिराळ्या सिनेगीतांना व नाट्यगीतांना तसेच महाकवी माडगूळकरांच्या (ग.दि. मा. ह्यांच्या) राष्ट्रप्रेम आणि वीर रसाने ओथंबलेल्या गीतांना त्यांनी दिलेल्या चाली कानात घुमू लागतात. मग साकार होत जाते, लक्षावधींच्या विराट मेळाव्यात 'एक सूर, एक तालात' गायलेल्या समूह गीतांद्वारे बालकांना व पालकांना मंत्रमुग्ध करून टाकणारा स्वरसम्राट वसंतराव देसाई. त्यांनी संगीताच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची चिंगारी नसानसातून प्रवाहित करून देशसेवा केली. या असामान्य संगीतकाराचे जीवनचरित्र श्री. मधु पोतदार ह्यांनी सुंदर व सहज सुलभ अशा शब्दात संपादन केली आहे. त्याला तशीच प्रभावी अशी वसंत रावांचे ज्येष्ठ मित्र मा. मधुकरराव चौधरी, माजी विधानसभा अध्यक्ष, माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य ह्यांनी लिहिली आहे. (मूळ ग्रंथ वाचावाच!)

त्यांचा जीवनपट - ९ जून १९१२ रोजी जन्म. सोनवडे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. १९२९मध्ये प्रभात फिल्म कंपनीसाठी योगदान. १९३२ 'अयोध्येचा राजा' ह्या पहिल्या बोलपटात पार्श्वगायक. १९४० 'संत ज्ञानेश्वर' ह्या चित्रपटाला स्वतंत्रपणे पार्श्वसंगीत. १९४२ मध्ये मुंबईत, दादर शिवाजी पार्कला 'परिमल' मध्ये राहावयास आले. 'शोभा' चित्रपटास संगीत दिले. १९५० मध्ये पं. नेहरूंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर दीड लाख बालकांच्या मेळाव्यात एका सुरात 'जन-गण-मन' गाऊन घेतले. त्याच वर्षी 'आशा' बंगल्यात वास्तव्य. १९५३ 'झाँसीकी रानी' चित्रपटासाठी परदेशी दौरा. १९६० 'पंडितराज जगन्नाथ' संगीत नाटकाला पहिल्यांदा संगीत. १९६३ शिवाजी पार्क वर 'हम एक है' कार्यक्रमात अडीच लाख बालकांकडून एका सुरात 'जिंकू किंवा मरू' हे समूहगान गाऊन घेतले. १९७० पेडर रोड वरील 'केम्ब्रिज कोर्ट' मध्ये राहावयास आले. १९७२ मुंबई दूरदर्शनची 'वसंत संगीत' सुरावटीने सुरुवात. १९७३ 'एक सूर एक ताल' च्या निमित्ताने साऱ्या महाराष्ट्राचा तीनदा दौरा. १९७५ केम्ब्रिज कोर्टच्या लिफ्टमध्ये अडकून अपघाती निधन.

मानसन्मान : अनेक उत्कृष्ट संगीत पारितोषिके-दादासाहेब फाळके अवॉर्ड, चित्रपट संगीत दिग्दर्शक असोसिएशनचे अध्यक्षपद, भारत सरकारतर्फे पदमश्री, मराठी अ.भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (१९७३), विधान परिषदेचे नियुक्त सदस्य.

चित्रपट भूमिका : 'खुनी खंजीर', ' एक सैनिक', 'माया मछिंद्र', 'अमृत मंथन', 'धर्मात्मा', संत तुकाराम', 'कुंकू', 'माझा मुलगा', 'माणूस', 'संत ज्ञानेश्वर', 'शेजारी' इ. अनेक चित्रपट.

गायलेली गाणी : 'अयोध्येचा राजा', 'अमृतमंथन', 'धर्मात्मा', 'अमर ज्योती', 'वहा', 'संत ज्ञानेश्वर', 'संत सखू', 'शकुंतला', 'अरबत पे अपना डेरा' इ. अनेक हिंदी चित्रपट.

'अयोध्येचा राजा', 'सिंहगड', 'अमृतकुंभ', 'धर्मात्मा', 'संत तुकाराम', 'शेजारी', 'संत सखू' इ. मराठी चित्रपट.

चित्रपट संगीत (१९४२-१९७५) : हिंदी चित्रपट : 'शोभा', 'आँख कि शरम', 'मौज', 'शकुंतला', 'अरबत पे अपना डेरा', 'डॉ.कोटणींस कि अमर कहानी', 'जीवनयात्रा', 'सुभद्रा', 'अंधो कि कहानी', 'उद्धार', 'दहेज', 'हिंदुस्थान हमारा', 'शिषमहल', 'जीवनतारा', 'हैदराबाद कि नाजनीम', 'आनंदभुवन', 'धुवा', 'झाँसी कि रानी', 'झनक झनक पायल बाजे', 'तुफान और दिया', 'दो आँखे बारा हाथ', 'दो फुल', 'मौसी', 'अर्धांगिनी', 'दो बहने', ' गुंज उठी शहनाई', 'सम्राट पृथ्वीराज चौहान', 'स्कुलमास्तर', 'प्यार की प्यास', 'संपूर्ण रामायण', 'राहुल', 'यादे', 'अमर ज्योती', 'भरत मिलन', 'लडकी सह्याद्री की', 'रामराज्य', 'आशीर्वाद', 'गुड्डी', 'अचानक', 'ग्रहण', 'जय राधे कृष्ण', 'रानी और लाल परी', 'शक', 'संत ज्ञानेश्वर', 'छाया'...अबब केवढी ही संपत्ती सूर-तालांची! प्रत्यक्ष ऐकणारे व बघणारे किती भाग्यवान! असू दे, आपण आपले हे 'वसंत वीणेचे झंकार' आपल्या कानी पुढील वर्षानुवर्षे रेंगाळत ठेवूया आणि हा स्वर सुगंध आपल्या स्मृतीच्या कुपीत आत दडवून ठेवूया.

(क्रमशः)
ravigadgil12@gmail.com

Web Title: Lokmat 'Vasantotsav' ... Supernatural Vocal Vasant Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.