शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

काय सांगू? काय लिहू?... सूर गोठले आणि शब्दही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 09:39 IST

सुरांच्या दुनियेतले एक युग समाप्त झाले. आम्ही लतायुगात जन्मलो, सुरांच्या सरस्वतीला प्रत्यक्ष पाहिले... ती स्वर्गातून आली होती, स्वर्गात निघून गेली! 

 विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आठवणींचा इतका मोठा ठेवा माझ्या मनाशी असूनही आज जणू शब्दच मूर्च्छित झाले आहेत. भावनांना शब्द देणे मुश्कील अशी ही वेळ! काय सांगू...? काय लिहू...? सारेच जणू थांबून, थिजून गेले आहे. 

ती सुरांची साक्षात सरस्वती होती. तरीही व्यक्ती म्हणून  अतीव निर्मळ! लतादिदींचा स्वभाव, त्यांचा स्नेह, त्यांचे सहज साधे व्यक्तिमत्त्व अनुभवताना सतत वाटे, या व्यक्तीच्या पायाशी वाकावे! त्यांचा आशीर्वाद आपल्या मस्तकी असावा. बिस्मिल्ला खान एकदा म्हणाले होते, ‘मी लताचे गाणे नेहमी यासाठी ऐकत आलो की वाटे, कधीतरी ही मुलगी बेसूर गाईल, कधीतरी तिच्या गळ्यातून एखादा स्वर निसटेल, चूक होईल; लेकिन ना! उनकी संगीत साधना पर कोई उंगली नही उठा सकता!’ - खरेच होते ते! लतादीदी तशाच होत्या.

८० च्या दशकात ख्यातनाम कवी सुरेश भट यांच्याबरोबर मी ‘प्रभुकुंज’ या लतादीदींच्या निवासस्थानी प्रथम गेलो. रक्षाबंधनासाठी आलेल्या भावाशी वागावे तशा स्नेहाने त्या माझ्याशी वागल्या. सुरेश भट यांना त्या भाऊ मानत असत. आमच्या पहिल्या भेटीतच त्यांनी अशी आपुलकी दाखवली की स्नेह जुळला, नंतर निमित्तानिमित्ताने ते नाते पक्के होत गेले. अधून मधून भेट होत राहिली.

२००५ साली एक दिवस त्यांचा फोन आला. मला म्हणाल्या, ‘नागपुरात आलेय, आपण भेटू शकतो का?’ त्यांचा साधेपणा, शालिनता आणि विनम्रतेने भारावून मी त्यांना म्हटले, ‘अवश्य, दीदी मी येतो आपल्याला भेटायला...’ त्या म्हणाल्या ‘मी नाही, आम्ही.’ मी म्हटले, ‘दीदी, मी समजलो नाही.’त्या म्हणाल्या, ‘एकटेच कसे येता? तुमच्या पत्नीलाही सोबत घेऊन या.’

नंतर कळले, माझी पत्नी ज्योत्स्नाने त्यांना आमंत्रण दिले होते. “आम्ही ‘जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमी’ सुरू केली आहे, आपण येऊन आशीर्वाद द्या” अशी विनंती ज्योत्स्नाने एका भेटीत केली होती. दीदी ते आमंत्रण विसरल्या नव्हत्या. आम्ही दोघे भेटायला गेलो. अत्यंत प्रेमाने त्या भेटल्या. स्नेहाचा वर्षाव! ज्योत्स्नाने त्यांना घरी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले. त्या म्हणाल्या, ‘जरा दुसऱ्या कामात आहे, पुन्हा कधीतरी येईन.’ तासभर आम्ही त्यांच्याबरोबर होतो. ज्योत्स्नाने घरून त्यांच्यासाठी काही खाण्याचे पदार्थ मागवले. त्यांना ते खूप आवडले. हसत म्हणाल्या, अहो, हे तर माझे  जेवणच झाले!... त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले ते निर्मळ हास्य मला अजून आठवते.

गौतम बजाज यांनी काढलेल्या विनोबा भावे यांच्या छायाचित्रांचे  एक देखणे पुस्तक आम्ही प्रकाशित केले होते.  त्याची एक प्रत दीदींना दिली, तेव्हा ते पुस्तक मस्तकी लावून त्या म्हणाल्या, ‘ही तर माझ्यासाठी  गीता माउली आहे!’

 ज्योत्स्नाला म्हणाल्या, ‘जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमी स्थापन करून तुम्ही खूप चांगले काम केले आहे. बाबूजीना मी खूप पूर्वीपासून ओळखते.. नागपूरला १९५९ साली कॉंग्रेस अधिवेशन झाले तेंव्हापासूनचा आमचा परिचय! बाबूजींशी माझे नाते एन. के. पी. साळवे आणि दिलीपकुमार यांच्यामुळे अधिक मधुर झाले!’

१९९९ च्या नोव्हेंबरमध्ये लतादीदी राज्यसभेत नियुक्त होऊन संसदेत आल्या आणि आमच्या भेटी वाढल्या. सभागृहात सातत्याने हजर राहण्याचा प्रयत्न त्या करत. संसदेच्या अधिवेशन काळात मोकळा वेळ मिळाला, की आम्ही सेंट्रल हॉलमध्ये बसून कॉफी पीत असू. एक दिवस त्या मला म्हणाल्या, ‘तुमच्या खासदार निधीतून पुण्यातल्या मंगेशकर इस्पितळासाठी काही निधी द्याल का?’- ‘का नाही? अवश्य देईन’ असे मी म्हटले. त्या म्हणाल्या, ‘आपण लोकांचे देणे लागतो. आपण मला २५ लाख द्या, मी माझ्या फंडातून  आपल्याला २५ लाख देईन.’  मी तात्काळ म्हणालो, ‘दीदी, मी नात्यात व्यवहार करत नाही. आपण चांगल्या कामासाठी पैसे मागत आहात!’ -  स्मित करत त्या म्हणाल्या, ‘गरज असेल तेंव्हा जरूर मागा.’ मी तात्काळ त्यांना चेक पाठवला. नंतर मुंबईहून फोन करून मला म्हणाल्या, ‘भाऊ, धन्यवाद!’ 

सेंट्रल हॉलमध्ये बसलो असताना त्या एकदा म्हणाल्या, ‘काहो, संसदेत लोक इतके जोरजोरात भांडतात आणि इथे येऊन मजेत कॉफी पितात. असे आमच्या फिल्म इंडस्ट्रीत नसते. एखाद्याशी थोडा खटका उडाला तरी लोक एकमेकांचे तोंड पाहात नाहीत तिथे.’ 

- त्या महत्वाचे बोलत होत्या !  एके दिवशी मी त्यांना विचारले, ‘ऐ मेरे वतनके लोगो या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा किस्सा सांगा ना. सी. रामचंद्र आणि तुमच्यामध्ये बराच बेबनाव झाला होता. हे ध्वनिमुद्रण कसे झाले?’ लताजी म्हणाल्या, ‘यात आता कसले गुपित? सगळेच सगळ्यांना माहीत आहे. कवी प्रदीप यांनी गीत लिहिले आणि सी. रामचंद्र यांना ते म्हणाले, ‘या गाण्याला लताचाच आवाज मिळाला पाहिजे. तुमच्यातल्या वादाची मला कल्पना आहे, पण हे गीत आपण संगीतबद्ध केले आणि त्याला लताचा आवाज मिळाला तर ते अमर होईल.’ -  तसे झालेही!’

लतादीदी एक सुंदर अंगठी घालत. एकदा मी त्यांना विचारले, ‘ही खास अंगठी कोठून घेतलीत?’... त्या हसून म्हणाल्या, ‘तुमच्या नजरेला पडलीच म्हणायची शेवटी! अहो, ही बहारीनच्या राजाची भेट आहे!’

अशा किती गप्पागोष्टी! किती हास्यविनोद!! स्नेहाचे नाते कसे सजवावे, सांभाळावे हे त्या उत्तम जाणत होत्या. माझी पत्नी ज्योत्स्ना या जगातून गेली तेंव्हा फोन करून मोठ्या बहिणीने द्यावा तसा धीर त्यांनी मला दिला. दीदींचे जाणे माझ्यासाठी फार मोठे व्यक्तिगत नुकसान आहे. हा एका युगाचा अंत आहे... जे युग कदाचित पुन्हा परतून येणार नाही....दीदी, प्रणाम! 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरLokmatलोकमतVijay Dardaविजय दर्डा