वर्तमानात जगू या
By Admin | Updated: August 7, 2016 01:51 IST2016-08-07T01:51:42+5:302016-08-07T01:51:42+5:30
जीवनाबद्दलची आपली दृष्टी जेव्हा आनंदी असेल, सुखद असेल, तेव्हाच आपले जीवन खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल. यासाठी वर्तमान काळात जगायला शिकणे हा एक उत्तम मार्ग आहे.

वर्तमानात जगू या
- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर
जीवनाबद्दलची आपली दृष्टी जेव्हा आनंदी असेल, सुखद असेल, तेव्हाच आपले जीवन खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल. यासाठी वर्तमान काळात जगायला शिकणे हा एक उत्तम मार्ग आहे. वर्तमानात जगायचे म्हणजे काय? तर ज्या क्षणी आपल्या आयुष्यात जे काही घडत असते, त्यावर लक्ष केंद्रित करून त्याचा पूर्ण अनुभव घ्यायचा. त्या क्षणीच त्या क्षणाचे मोल अनुभवयचे. कारण आपले लक्ष जेव्हा वर्तमान स्थितीतील घटनांपासून वा अनुभवापासून दूर जाते व भूतकाळातच घोटाळायला लागते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण परावलंबी आयुष्य जगतो. काही नवनूतन काही वेगळे जगायचा प्रयत्न करण्यापेक्षा भूतकाळातले तेच जीवन आजही आपण वर्तमानकाळात जगतो. त्याच- त्याच चुका आपण आजही पुन्हा-पुन्हा करतो. तेच-तेच रडगाणे आपण आजही पुन्हा गात राहतो. आता जे घडतेय, त्या अनुभवापासून दूर राहत भूतकाळातच गुरफटत राहतो. मग जीवन कसे रटाळ झाले आहे, म्हणून चिडत राहतो. जीवनात आपल्याला सुख कधीच कसे मिळाले नाही, म्हणून त्रासून जातो. खऱ्या अर्थाने वर्तमानपत्रात जगणे म्हणजे आपण ज्या-ज्या गोष्टी त्या-त्या क्षणी करत असतो, त्यात मनापासून गुंतायचे. आपण करत असलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टीत समरस व्हायचे. त्या क्षणी त्या क्षणात आपण असतो, तेव्हा आपली एकाग्रता वाढते. लक्ष एका गोष्टीवर केंद्रित करणे सोपे होते. यामुळे हाती घेतलेले कार्य आपण चलाखीने व सक्षमतेने करतो. वर्तमानात जगताना येणारा अनुभव हा आपल्या मनाशी ट्युन झालेला असतो. कारण तो जसा आहे, तसाच आपण अनुभवत असतो. त्यात भ्रामकता नसते, कल्पित भाग नसतो, भविष्याची स्वप्न नसतात, फक्त त्या क्षणाचे सत्य असते. जे घडते, ते समोर असते आणि तसेच जीवनानुभवात मुरत जाते.
काही वेळा आपण एखादे पुस्तक वाचताना इतके गुंततो की, आजूबाजूचे सारे विसरतो. एखादा सुंदर चित्रपट पाहता-पाहता आपण किती रमतो, आपल्या सुंदर छंदाचा आनंद घेताना वेळेच भानही आपल्याला राहात नाही, हे सारे आनंदाचे क्षण जाणिवेच्या रंध्रारंध्रात शब्दातीत असतो. तो अनुभव फक्त त्याच्या अस्तित्वाबरोबर जगत असतो. स्वत:ला त्या क्षणात झोकून देत, जगण्याचा अनुभव म्हणजे वर्तमानात जगणे. वर्तमानाचा क्षण क्षणिक असतो. तो गतकाळात घेऊनही जातो आणि पुढे काय होणार, हे कुणाला माहीत, पण त्या क्षणाला जाणीवपूर्वक आपल्या संवेदनांनी धरून ठेवायचे ही एक अनुभूती आहे. ती चेतनेबरोबर आपण जगत आहोत,
अशाच अनेक प्रकारच्या संधी आपल्या हातातून क्षणाक्षणाला निसटत असतात. कारण आपण सुखाचे ते क्षण त्या क्षणी जगायला विसरतो. अनेक घटनांचा, प्रक्रियेचा अर्थ लावायचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा हे क्षण आपल्या हातातून निसटतात. जेव्हा त्या क्षणात आपण जगतो, तेव्हा आपल्याजवळ अवतीभोवती आनंद येतो. त्या क्षणी तो अनुभव आपल्याला प्रिय असेल तर तो एक सुंदर अनुभूती देतो आणि अप्रिय असेल, तर आपल्याला शिकण्याची संधी देतो. कारण आपण स्वत:चे एक विश्व त्या क्षणातून निर्माण करतो. ते विश्व फक्त त्या क्षणासाठीच आणि क्षणापुरते असते. अर्थात, याचा अर्थ असा नाही की, आपण भविष्याचे नियोजन करायचे नाही किंवा भूतकाळात काही शिकायचे नाही. हे सगळे करायचेच, पण वर्तमानातले क्षण मात्र पूर्ण जगायचे.
काही अनुभव अतिशय वेगळे ठरतात. सूर्यास्त झालेला असतो. सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसत असते. अशा वेळी सूर्याच्या रूपाकडे पाहात त्या किरणांची लालीतील आनंद अनुभवतो. त्या क्षणी जर आपले लक्ष कुठल्या तरी किचकट गोष्टीत गुंतले असेल, तर सूर्यास्ताचा तो निर्मळ आनंद आपल्याला घेता येईल का? म्हणजेच त्या क्षणी घडणारे ते क्षण सूर्यास्तासारखे जिवंत असतात. आपल्या साऱ्या संवेदना मग त्या वातावरणाशी जुळतात. अनेक गतविचारांच्या किंवा भविष्यकाळाच्या विचारात न भटकता केवळ साऱ्या संवेदनांतून आयुष्य जसे आहे, तसे अनुभवणे ही खरे तर एक अत्यंत सुंदर आणि ताजीतवानी अशी अनुभूती आहे. अशी अनुभूती दीर्घ काळ घेता येईल असे नाही, पण विचारांच्या पलीकडे जाऊन साऱ्या संवेदना एकवटून वर्तमानातले क्षण जगणे ही एक जीवन कला आहे.