संवादामुळे विसंवाद वाढणे आणि खुलेपणाचा वापर करून बंदिस्तता लादली जाणे हा जागतिकीकरणानंतरचा अंतर्विरोध आहे. जग बदलल्यानंतर माध्यमे बदलली. नव्या माध्यमांनी सर्वसामान्य माणसाला शक्ती दिली आहे, असे म्हटले जात होते. माध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे असेही बोलले जात होते. प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला. त्यामुळे प्रत्येकजण व्यक्त होऊ लागला. नव्या माध्यमांनी सर्वसामान्य माणसाला आवाज दिला खराच, पण त्याचा गैरवापर सामाजिक सलोख्याला वारंवार तडे देत आला आहे. उथळ विचारांच्या हातात माध्यमे गेली तर काय होऊ शकते, हे आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहात आहोत.
खोट्या बातम्या, अफवा आणि विखारी मजकूर हे आपले सर्वात मोठे शत्रू ठरत आहेत. सारासार विवेक नसलेली टाळकी धार्मिक, जातीय किंवा राजकीय मुद्द्यांवर नको त्या भाषेत व्यक्त होतात आणि समाजमनाला दुखावतात, अस्वस्थ करतात. पुण्याजवळच्या यवतमध्येही परवा नेमके हेच घडले. दौंड तालुक्यातील यवतमध्ये १ ऑगस्टला सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर तोडफोड, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनेने पुन्हा एकदा सामाजिक माध्यमांचा गैरवापर आणि त्यातून उद्भवणारी सामाजिक अस्थिरता आपल्याला दाखवली. हातातील माध्यमांचा गैरवापर करून दोन गट झुंजवण्याची मानसिकता अख्ख्या यवत गावाला धगधगत ठेवण्यास कारणीभूत ठरली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून लाठीमार, अश्रुधुराचा वापर आणि कडक कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही. लोकांच्या विचारांवर प्रभाव टाकणारे ते साधन आहे. फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप यासारख्या प्लॅटफॉर्म्सवरून लाखो लोक रोज व्यक्त होतात; परंतु या माध्यमांचा गैरवापर होतो तेव्हा त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतात. सोशल मीडियावरील एक आक्षेपार्ह पोस्टही जाती-समूहांमधील भेदाला आणि अविश्वासाला बळ देते. अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे फक्त एका आक्षेपार्ह पोस्टमुळे दंगली उसळल्या, हिंसाचाराच्या घटना घडल्या. जगभर अशा घटना घडलेल्या दिसतात. मात्र, अधिक चिंताजनक स्थिती आपल्याकडे आहे. आपली महाकाय लोकसंख्या हेही त्याचे एक कारण आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय, धार्मिक ध्रुवीकरण करून माणसांना एकमेकांपासून तोडण्याचे प्रयत्न अनेकदा झाले आहेत; परंतु आपला देश विविधतेतील एकतेच्या मूलभूत तत्त्वावर उभा आहे. अनेक धर्म, पंथ आणि भाषा असूनही भारत झेपावतो आहे, हीच तर ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे. धर्मावर उभा असणारा पाकिस्तान एकच धर्म असूनही दुभंगला. भारत मात्र सारे वैविध्य सोबत घेत दिमाखात झेपावला. भारताच्या या कल्पनेलाच नख लावण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा सावध व्हावे लागते. सोशल मीडियावरील नकारात्मकतेला तोंड देण्यासाठी सकारात्मक विचार, सामाजिक ऐक्य आणि जबाबदारीची भावना वाढण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनासह नागरिकांनाही पुढाकार घ्यावा लागेल. गाव पातळीवर काम करावे लागेल. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संवादाचे सेतू उभे करावे लागतील.
सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलची क्षमता वाढवावी लागेल. सामाजिक सलोख्याच्या मुळाशी असलेल्या सहिष्णुतेचे महत्त्व आपल्याला यवतमधील घटनेने पटवून दिले आहे. एका आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गट भिडावेत आणि त्यातून हिंसाचाराला तोंड फुटावे, हे आपल्या समाजात परस्परांबद्दल असलेल्या अविश्वासाचे उदाहरण आहे. हे रोखायचे असेल तर सजग राहावे लागेल. सामाजिक सलोखा टिकवायचा तर शिक्षण, संवाद आणि परस्परांबद्दल आदर महत्त्वाचा. आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांना अधिक दृढ करण्याची आज आवश्यकता आहे. सोशल मीडियाच्या गैरवापरावर नियंत्रण, सामाजिक सलोख्याला प्रोत्साहन आणि शिक्षणाच्या माध्यमातून जागरूकता यावर भर दिल्यास भविष्यात अशा घटना आपल्याला टाळता येतील. समाजाची सजगता आणि सारासार विवेक याशिवाय हे कठीण आहे.
एकात्मता, सहिष्णुता आणि शांतता हा आपला खरा वारसा आहे. सोशल मीडिया ही लोकांना जोडणारी शक्ती आहे, तोडणारी नव्हे. प्रत्येकाच्या मनात ही भावना रुजणे महत्त्वाचे. त्यासाठीचे काम फक्त पोलिसांनी करायचे नाही. ते शाळा-महाविद्यालयांनाही करायचे आहे. भारताची कल्पना सर्वदूर पोहोचवायची असेल, तर ‘विखार’ नव्हे, प्रेम ‘व्हायरल’ करावे लागेल!