- किरण अग्रवाल

खरे तर हे विधान काहीसे अचंबित करणारे नक्कीच आहे, कारण मृत्यू म्हणजे अखेर वा आयुष्याची समाप्ती; तेव्हा मरणानंतर जगणे कसे शक्य आहे असा भाबडा प्रश्न यातून स्वाभाविकपणे उपस्थित व्हावा. पण, तो भाबडा अशासाठी की विज्ञानाने या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकालाच उपलब्ध करून दिले असून, आता मरणानंतरही जगणे शक्य झाले आहे. ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे’ या म्हणीत किंचितसा बदल करून या मृत्यूनंतरच्या जगण्याचा अनुभव घेता येणारा आहे. कुणाचीही कीर्ती ही त्याच्या सत्कार्याने पसरते. हे सत्कार्य अवयवदानाच्या रूपाने केले गेले तर ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असे म्हणता येईल. आज त्यासाठीच्याच सत्कार्याचा संकल्प सोडण्याची गरज आहे.मरण हे अटळ आहे, याबद्दल वाद असू नये. विज्ञानाने साधलेल्या प्रगतीच्या बळावर मरण लांबवता येत असले तरी ते टाळता येणे शक्य झालेले नाही. पण या विज्ञानाने एक वरदान मात्र नक्कीच मिळाले आहे ते म्हणजे, आपल्या मृत्यूनंतर देहदान किंवा अवयवदानाच्या माध्यमातून आपण मरणानंतरही या जगात राहू शकतो. दान केलेल्या डोळ्यांनी जग पाहू शकतो, हृदयाने समाजजीवनाची स्पंदने अनुभवू शकतो; इतरही अवयवांच्या माध्यमातून कीर्तिवंत होऊ शकतो. ही खरे तर अनुभूतीची किंवा अध्यात्माचीच प्रक्रिया म्हणायला हवी. अनुभूती ही विचारातून कृतीप्रवणतेकडे नेणारी, दिव्यतेच्या जवळ जाणारी प्रक्रिया असते. अध्यात्म म्हणजे तरी काय, आत्म्याच्या शुद्धीतून घडून येणाऱ्या सत्कार्याची अगर सत्कर्माची प्रेरणाच ना! तेच तर यासंदर्भात अपेक्षित आहे. त्यामुळे संवेदनशीलता जपणाऱ्या व जाणिवा प्रगल्भ असणाऱ्यांकडून याबाबत समाजमन घडवून त्यासाठीच्या मोहिमेला गती दिली जाणे गरजेचे आहे. देहदान किंवा अवयवदानाबाबत शासनस्तरावर भरकस प्रयत्न सुरू आहेतच, राज्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आकारास आल्यानंतर या प्रयत्नांना अधिक गती मिळालेली दिसत आहे व देशात महाराष्ट्रातील स्थिती त्यातल्या त्यात समाधानकारक म्हणता यावी अशी आहे हेदेखील खरे; परंतु अवयवदानाच्या मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून द्यायचे असेल तर समाजातील जाणत्या व समाजसेवी व्यक्तींनी तसेच संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे, कारण मरणानंतरच्या मोक्षप्राप्तीचा तोच खरा मार्ग म्हणता यावा इतके ते गरजेचे झाले आहे.भारताची १३५ कोटी लोकसंख्या बघता याबाबतीत आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर असलो तरी, अवयवदानाच्या बाबतीत आपण कमालीचे पिछाडीवर आहोत. दहा लाख लोकांमागे अवघे ०.०८ एवढेच हे प्रमाण आपल्याकडे आढळून येते. तेव्हा हे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वच पातळीवरून जनजागृती होणे व त्यासंदर्भातील शास्रीय किंवा वैद्यकीय माहिती प्रसृत करून जनतेत असणारे गैरसमज दूर केले जाणे गरजेचे आहे. आधुनिक वैद्यकशास्रामुळे अवघड वाटणाऱ्या शस्रक्रियादेखील आता सुलभ झाल्या असून, देहाची विटंबना किंवा विद्रूपीकरण न होताही अनेक अवयव हे दान केले जाऊ शकतात. या अवयवांच्या माध्यमातून अनेक गरजूंचे आयुष्य पुन्हा रुळावर येऊन ते चांगले जीवन जगू शकतात. पण यासाठी विदेशामध्ये जसा प्रतिसाद लाभताना दिसतो तसा आपल्याकडे अद्याप लाभताना दिसत नाही. आकडेवारीच द्यायची झाल्यास, उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रात २०१८ मध्ये मस्तिष्क स्तंभ मृत झालेल्या अवघ्या १३५ व्यक्तींकडून अवयवदान केले गेले. कार्निया अपारदर्शक झाल्याने भारतात दरवर्षी ३० लाख लोक अंध होतात, यातील ६० टक्के प्रमाण हे मुलांचे असते. नेत्रदानाचे प्रमाण वाढले तर इतकी मुले दात्यांच्या डोळ्यांनी जग पाहू शकतील. डोळे, हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत, त्वचा आदी अवयवदान केले जाऊ शकतात व त्यासाठी अवयव प्रत्यारोपण कायदादेखील पारित केला गेला आहे. तेव्हा गरज आहे ती समाजमन घडवून अवयवदान मोहिमेला गती देण्याची.रक्तदानाबाबत जागृती झाल्याने त्यासाठी जसा प्रतिसाद मिळतो तशीच जनजागृती अवयवदानाबाबत झाली तर अनेकांच्या आयुष्यात नवे बळ भरता येऊ शकेल. बऱ्याचदा असेही अनुभवास येते की, एखाद्या व्यक्तीकडून मृत्यूपश्चात अवयवदानाची इच्छा जाहीर केलेली असते; परंतु तशी वेळ आल्यावर कुटुंबीयांकडून रजामंदी होत नाही. अशा समयी समाजातील धुरिणांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे बनते. नेतृत्व करणारे सजग तर समाज सजग, अशादृष्टीने ही मोहीम पुढे नेता येणारी आहे. विशेषत: कोरोनाच्या संकटाने आयुष्य हे किती क्षणभंगुर आहे याची जाणीव अनेकांना होऊन गेली असावी. केव्हा काय होईल याचा भरोसा राहिलेला नाही. कोरोना टळला तरी मृत्यू काही कुणाला टळणार नाही, तेव्हा मृत्यूपश्चातही कीर्तिवंत राहायचे असेल तर सर्वांनीच यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आजच्या अवयवदान दिनाच्या निमित्ताने त्यासाठीचा संकल्प आपण सारे करूया, इतकेच या निमित्ताने...  

Web Title: Lets live after death by donating organs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.