शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

परिश्रमाच्या क्षमतांचे सीमोल्लंघन घडवूया...

By किरण अग्रवाल | Published: October 14, 2021 5:02 PM

Editors view : अडचणींच्या खाचखळग्यातून मार्ग काढून यशाचे उद्दिष्ट गाठले जाते तेव्हाच त्याचा आनंद वेगळा व अवर्णनीय ठरतो.

- किरण अग्रवाल

 

रोजीरोटीच्या झगड्यात जगणे जगताना मनुष्याला अनेक संकटे, समस्या वा विवंचनांचा सामना करावा लागतो, हे खरे; परंतु त्यावर मात करून जो पुढे जातो तोच सिकंदर ठरत असतो. मर्यादांच्या सीमा वाट अडवू पाहतात; परंतु त्या उल्लंघून जाण्यातच खरा पुरुषार्थ असतो. ते कसोटीचे वा धाडसाचे जरी असले तरी त्यातूनच आपल्या क्षमता सिद्ध होतात. अडचणींच्या खाचखळग्यातून मार्ग काढून यशाचे उद्दिष्ट गाठले जाते तेव्हाच त्याचा आनंद वेगळा व अवर्णनीय ठरतो. सद्य:स्थितीही संकटांनी आणि अडचणींनी भरलेली व घेरलेली आहे. मात्र, त्यावर मात करून पुढे जायचे तर संधी व क्षमतांच्या कक्षा रुंदावण्याचे सीमोल्लंघन करणे गरजेचे ठरावे. यंदाची विजयादशमी साजरी करताना हेच लक्षात घ्यायला हवे.

 

विजयादशमीच्या सीमोल्लंघनाला ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ आहेत. शत्रूवर पराक्रमाने विजय प्राप्त करून विजयाची गुढी उंचावण्याचा, उभारण्याचा हा दिवस अगर सण आहे. शस्त्रांची, शमीची तसेच सरस्वतीची पूजा करून तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना या दिनी करण्याचा प्रघात आहे. महिषासुरमर्दिनी दुर्गेपासून ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्याशी संबंधित अनेक दाखले व आख्यायिका या सणाशी संबंधित आहेत. थोडक्यात संकटांचे निर्दालन व समस्यांचे सीमोल्लंघन करून विजयाचा जय जयकार करण्याचा हा दिवस, त्यामुळे आजच्या संदर्भानेही मना मनांवर आलेली निराशेची धूळ झटकून यश, कीर्ती, उत्साह, ऊर्जेची गुढी उभारूया.

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने सार्वत्रिक पातळीवर हबकलेपण ओढवले आहे. व्यक्तिगत आरोग्य असो, की आर्थिक व्यवस्था; प्रत्येकालाच कोरोनाचा फटका बसला आहे. काही उद्योग व्यवसायांना या संकटातही भरभराटीचा योग लाभला हा भाग वेगळा; परंतु आरोग्याच्या संदर्भाने विचार करता कोणीही यापासून बचावू शकलेला नाही. कमी अधिक प्रमाणात, स्वतःच्या अगर आप्तांच्या निमित्ताने प्रत्येकालाच या संकटाची झळ सोसावी लागली आहे. परिणामी, समाजमन दुःखी आहे. कोरोनाच्या लाटांमधून काहीसे बाहेर पडत नाही तोच निसर्गाच्या थपडा खाव्या लागल्या. शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीच्या पूरपाण्याने हिरावून नेला. कोरोनाने काळीज चर्र झाले होते, आता अतिवृष्टीने डोळ्यात पाणी साठले आहे; पण याही स्थितीत संकटांच्या छाताडावर पाय रोवून सारेजण नव्या आयुष्याच्या लढाईला सिद्ध झाले आहेत. समस्यांना न डगमगता, ‘हम होंगे कामयाब’ची जिद्द ठेवून पुढच्या प्रवासाला लागले आहेत, ही समाधानाचीच बाब म्हणता यावी.

संकटांनी ओढवलेली निराशा, निरुत्साह आता ओसरत असून आशेच्या पणत्या त्यासंबंधीचा अंधकार दूर करण्याचा व त्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत. शेअर मार्केटने विक्रमी पल्ला गाठला आहे. गेलेल्या नोकऱ्या परतू लागल्या असून उद्योगांच्या बंद पडलेल्या चिमण्याही आता धुरळू लागल्या आहेत. विकासाची रांगोळी रेखाटण्यासाठी सरकार, मग ते केंद्रातील असो की राज्यातील; आपापल्या पातळीने प्रयत्न करीत असून ढासळलेली अर्थव्यवस्थाही पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. सारे चलन वलनच गतिमान व ऊर्जावान होत आहे. हे एकप्रकारे निराशेच्या सीमा ओलांडून आशेच्या प्रांतात मार्गस्थ होत असलेले समाजमनाचे सीमोल्लंघनच आहे. यंदाच्या विजयादशमीला याच मानसिकतेला बळ देत संकटांवर विजयाची गुढी उभारूया. ‘दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा’, असे आपण म्हणतोच; तर चला संकटालाही संधी मानून आपले धाडस, कल्पना व परिश्रमाच्या क्षमतांचेही सीमोल्लंघन घडवूया. आशादायी मनाने हिरव्याकंच पानांनी व उल्हासदायी रंगाच्या झेंडू फुलांनी आनंदाचे तोरण बांधूया...