लढणारा सदाभाऊ विधान परिषदेत!

By Admin | Updated: June 2, 2016 01:59 IST2016-06-02T01:59:13+5:302016-06-02T01:59:13+5:30

कोल्हापूर महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात मरळनाथपूर एक छोटंसं गाव! जिरायत शेतीच होते या गावात! उसाचे प्रमाण नगण्य आहे. छोटंसं गाव असल्याने

The Legislative Legislative Legislator! | लढणारा सदाभाऊ विधान परिषदेत!

लढणारा सदाभाऊ विधान परिषदेत!

पुणे - कोल्हापूर महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात मरळनाथपूर एक छोटंसं गाव! जिरायत शेतीच होते या गावात! उसाचे प्रमाण नगण्य आहे. छोटंसं गाव असल्याने तालुक्याचा राजकारणातही दबदबा नाही. मात्र, गावचा सुपुत्र सदाभाऊ खोत या पठ्ठ्याने मरळनाथपूरचं नाव सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर ठळकपणे नोंदविले आहे. आता तो आमदार होणार आहे. उसाची शेती कमी असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा लढाऊ नेता झाला आहे. सुरुवातीच्या काळी शरद जोशी यांच्या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करण्यात आघाडीवरचा हा युवक कार्यकर्ता होता. शेतकऱ्यांच्या भाषेत शेतीचे अर्थशास्त्र मांडण्याची उत्तम हातोटी आहे. चांगले वाचन असल्याने इतिहासाचे दाखले देत उदाहरणांची उत्तम पेरणी भाषणात करतो. शिवाय जोडीला धाडसी स्वभाव आहे.
शरद जोशी यांच्याशी राजकीय मतभेद होऊन राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. याच संघटनेबरोबर राहण्याचा निर्णय सदाभाऊ यांनीही घेतला. तेव्हापासून पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची जोडी साखर कारखानदारांना ‘सळो की पळो’ करून सोडू लागली. आॅक्टोबरचा महिना आला, उसाचा गळीत हंगाम सुरू होणार म्हणताच या सदाभाऊंच्या गावोगावच्या सभांनाही गर्दी लोटायची. कोणताही राजकारणी किंवा साखर कारखानदार कितीही मोठा असू दे, आपल्या भाषणात दे दणादण टीका करण्यात तो आघाडीवर असायचा. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील घराघरांत सदाभाऊ खोत यांचे नाव पोहोचले. गत लोकसभा निवडणुकीत याच जोरावर सदाभाऊ खोत याने माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा केली. मात्र, शरद पवार यांनी सार्वत्रिक निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतल्याने विजयसिंह मोहिते-पाटील विरुद्ध सदाभाऊ खोत अशी लढत झाली. सदाभाऊ केवळ २६ हजार मतांनी पराभूत झाला. दररोज सकाळी बाहेर पडणारा आणि रात्री उशिरा अनेक गावांचा दौरा करून घरी परतणारा, अशी त्याची ख्याती आहे. त्याच्या रूपाने शेतकरी चळवळीतून आलेला आणखी एक कार्यकर्ता आमदार होणार आहे. मात्र, तो सत्ताधारी पक्षाच्या पाठबळाने झालेला आमदार असणार आहे. यापूर्वीही शरद जोशी, वामनराव चटप, सरोज काशीकर, पाशा पटेल, माधवराव बोरस्ते, अनिल गोटे, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, आदी नेत्यांनी निवडणुका लढविल्या. शिवाय यापैकी अनेकजणांनी संसदेत किंवा विधिमंडळात प्रतिनिधित्व केले आहे. यापैकी बहुतांश जणांनी विरोधी बाकावरून काम केले आहे. सदाभाऊ खोत सत्ताधारी बाकावर काम करणार आहेत. वामनराव चटप, अनिल गोटे, पाशा पटेल किंवा राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न अनेकवेळा मांडले आहेत. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडून अनेक प्रश्नांवर निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. हीच शेतकरी चळवळीची परंपरा सदाभाऊ खोत यांना पार पाडावी लागणार आहे. पाशा पटेल निवृत्त झाले. वामनराव चटप किंवा सरोज काशीकर आता निवडून येत नाहीत. राजू शेट्टी लोकसभेवर गेले आहेत. अनिल गोटे यांनी शेतकरी आंदोलनाशी फारकत घेतली आहे. अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र मांडणारा एक लढावू कार्यकर्ता आमदार होत आहे. त्याचा आनंद असतानाच अपेक्षाही वाढल्या आहेत. कदाचित घटक पक्षांना न्याय देण्यासाठी सदाभाऊ खोत यांना पहिल्याच दणक्यात लाल दिवाही मिळेल. मात्र, त्यांनी भाजपच्या शेती-शेतकरी विषयीच्या धोरणाबाबतही आवाज उठवावा हीच अपेक्षा!
- वसंत भोसले

Web Title: The Legislative Legislative Legislator!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.