नेतृत्वाची सूत्रे राहुलकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:25 AM2017-12-06T03:25:41+5:302017-12-06T03:25:56+5:30

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व पर्यायाने देशाच्या नेतृत्वाची सूत्रे आज हाती घ्यावी ही बाब जेवढी अपेक्षित आणि आवश्यक तेवढीच स्वागतार्ह आहे.

Leadership formula Rahul | नेतृत्वाची सूत्रे राहुलकडे

नेतृत्वाची सूत्रे राहुलकडे

Next

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व पर्यायाने देशाच्या नेतृत्वाची सूत्रे आज हाती घ्यावी ही बाब जेवढी अपेक्षित आणि आवश्यक तेवढीच स्वागतार्ह आहे. लोकशाही सुरक्षित राखायची तर पंतप्रधानांच्या पदाला पर्यायी ठरू शकेल असा उमेदवार विरोधी पक्षांजवळ असणे गरजेचे आहे. राहुल गांधी (व डॉ. मनमोहन सिंग) यांचा अपवाद वगळता मोदींना तोंड देऊन त्यांना बचावाच्या पवित्र्यात आणू शकेल असा दुसरा नेता आज देशात नाही. नितीशकुमारांपासून शरद पवारांपर्यंतचे आणि अमरिंदरसिंगापासून ममता - मुलायमांपर्यंतचे नेते जुने, अनुभवी व मोठे असले तरी त्यांना राष्टÑीय प्रतिमा कधी लाभली नाही व यापुढेही ती लाभण्याची शक्यता नाही. राहुल गांधींनी स्वत:ला प्रादेशिक प्रश्नांशी जुळवून ठेवले असले तरी आपली प्रतिमा त्यांनी नेहमीच राष्टÑीय राखली. त्यांच्या टीकेचा व हल्ल्यांचा रोख ‘अमित शहा’ हाही कधी नव्हता. तो सरळ नरेंद्र मोदींवर होता. त्यांच्या सरकारवर ‘सुटाबुटाचे सरकार’ म्हणून त्यांनी संसदेत जो हल्ला चढविला त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही आणि दुसºया कोणा प्रादेशिक पुढाºयावर निशाणाही साधला नाही. वास्तविक त्यांनी मनात आणले असते तर राजीव गांधींच्या स्फोटक मृत्यूनंतरच पक्षाचे सर्वोच्च पद त्यांच्याकडे आले असते. पण ज्येष्ठांचा मान राखत व आपल्याजवळ अनुभवांची मोठी जंत्री जमवीत त्यांनी ते पद त्यांच्या मातेकडे, सोनिया गांधींकडे दिले. सोनियाजींनी ते तब्बल १९ वर्षे सांभाळल्यानंतर राहुल गांधींची त्यावर आता सन्मानाने निवड होत आहे. दरम्यानचा काळ राहुल गांधींसाठी सोपा राहिला नव्हता. दरदिवशी व दरक्षणी त्यांची अतिशय कठोर व काटेरी परीक्षा होत राहिली. त्यांची अवहेलना, टवाळी आणि टिंगल करण्याची कोणतीही संधी भाजपाच्या अतिशय चिल्लर पुढाºयांनीही कधी सोडली नाही. घराणेशाहीचा आरोप पुन्हा होताच. त्या घराण्याचा त्याग त्यांच्या टीकाकारांनी कधी मनावर घेतला नाही. त्यांना ‘पप्पू’ म्हटले गेले. त्यांच्यावर अननुभवाचा आरोप केला गेला आणि मोदींच्या तुलनेत ते काहीच नसल्याचे सांगितले गेले. या काळात त्यांच्या वाट्याला पंजाब आणि कर्नाटकचे विजय सोडले तर पराभवही फार आले. मात्र या सबंध काळात राहुल गांधी कधी खचल्याचे वा थांबल्याचे दिसले नाहीत. त्यांचा आत्मविश्वास व लढाऊबाणा दिवसेंदिवस वाढत गेल्याचाच जनतेला दिसला आणि आता तर त्यांनी गुजरातच्या निवडणुकीत मोदी आणि शहा यांना त्यांच्या पक्षासह जेरीलाच आणले आहे. २२ वर्षे गुजरातमध्ये राज्य केलेल्या भाजपाला राहुल गांधींच्या धडाक्यामुळे पूर्ण विजय मिळेल की नाही याविषयीचीच शंका राजकीय वर्तुळात आता व्यक्त होत आहे. हार्दिक पटेलसह त्या राज्यातील अनेक तरुण नेत्यांना सोबत घेण्यात त्यांनी जी राजकीय चतुराई व प्रगतीपण दाखविले त्यामुळे तर त्यांच्या टीकाकारांची तोंडेच बंद झाली आहेत. अन्य नेते संघ व भाजपावर टीका करताना हातचे राखताना दिसतात. ते मोदींवर टीका करीत नाहीत. राहुल गांधींचा निशाणा मात्र त्या साºयांवर असतो. तो त्यांच्या धर्मांध राजकारणावर, मोदींच्या अर्थकारणावर आणि संघ परिवाराने देशात माजविलेल्या धार्मिक दुहीवर असतो. हा परिवार देशात एकात्मता आणणार नाही. त्यात तो दुहीची बीजे पेरील ही गोष्ट ते पुराव्यानिशी सांगतात. त्या आक्रमक वृत्तीत त्यांनी आपल्या पक्षातील इतर नेत्यांनाही आता मागे टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे व त्या पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे नेतृत्व त्यांच्या हाती आता येणे आवश्यकही झाले आहे. त्यांचे नेतृत्व तरुणाईलाही आवडणारे आहे आणि ते देशाला विज्ञान, तंत्रज्ञान व आधुनिकतेच्या दिशेने नेणारेही राहणार आहे.

Web Title: Leadership formula Rahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.