जाण वास्तवाची
By Admin | Updated: February 23, 2015 00:05 IST2015-02-23T00:05:27+5:302015-02-23T00:05:27+5:30
आज संगणक युगात बदलत्या वास्तवाची चाहूल घेण्याची क्षमता असलेलं मन हवं आहे. कठोर परिश्रम, दृढ आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य नियोजन

जाण वास्तवाची
डॉ. कुमुद गोसावी -
आज संगणक युगात बदलत्या वास्तवाची चाहूल घेण्याची क्षमता असलेलं मन हवं आहे. कठोर परिश्रम, दृढ आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य नियोजन नि त्यासोबत शांत, संयमी, विवेकी मन! ही यशाची ‘गुरुकिल्ली’ हाती देणारं अध्यात्म जाणून घ्यायला हवं!
रामायणातील एका प्रसंगी नल, नील, सुग्रीव, लक्ष्मण आदिंनी बिभीषणाला आसरा देऊ नये असं सांगितलं, तेव्हा प्रभू रामचंद्रानं त्या सर्वांसमक्ष हनुमंताला त्यासंबंधी विचारलं,
बिभीषणाची भगवद्भक्ती।
शुद्ध भावार्थी बिभीषण।
बिभीषणाच्या अंत:करणात अंशमात्र कपट नाही. तो शांत, धर्ममूर्ती आहे, त्याचं प्रभू रामचंद्रांवर नितांत प्रेम आहे. शिवाय तो रघुनाथाला अनन्यभावानं शरण आला आहे. त्याची कन्या ‘त्रिअरा’ अशोकवनात सीतेचा सांभाळ करीत आहे. यानं माझा वध होऊ दिला नाही. हनुमंतानं बिभीषणाच्या पवित्र अंत:करणाची अशी वास्तव जाणीव करून दिली! महाबली हनुमंत केवळ वास्तवदर्शीच नव्हते, तर श्रेष्ठ संगीततज्ज्ञही होते! कुंभकोणमला वीणावादन करणाऱ्या हनुमंताची मूर्ती आहे.
आम्ही आज संपत्ती वाढवली नि माणुसकी गमावली. एकदा प्रवासात समोर बसलेल्या मुलांनी पिझ्झा, बर्गर, केक आदि पदार्थांचा फडशा पाडला नि त्याचे रॅपर्स भिरकावून दिले! समोरच्या सीटवरील पाठीत वाकलेल्या आजी काठी टेकवत टेकवत आल्या नि कचरा गोळा करू लागल्या. एकीनं विचारलं, आजीबाई तुम्ही कशाला त्रास घेताय? रेल्वेत डस्टबिन असतात हे तुम्ही हसण्याच्या नादात विसरलात म्हणून ते गोळा करतेय. खिदळणारी मुले नरमली नि सॉरी आजीबाई, म्हणून मोकळी झाली!
विश्वविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथातील वास्तवदर्शी दृष्टांताचं लेणं म्हणजेच नक्षत्रांचं देणंच म्हणायला हवं!
का कमळावरी भ्रमर।
पाय ठेविती हळुवार।
कुचंबैल केसर।
ह्या शंका।।
ज्ञाने. १३.२४७।।
खरा ज्ञानी माणूस आपल्याकडून कोणाचीही हिंसा होऊ नये, अगदी कमळातील केसरदेखील कुचंबू नये-दुखाऊ नये, इतकं मनाचं हळुवारपण त्यानं जपावं यातच त्याच्यातील अतिशय नाजूक, तरल संवेदनांची ओळख होते.
अरे संसार संसार।
जसा तवा चुल्यावर।
आधी हाताला चटके।
तेव्हा मिळते भाकर।।
संत ज्ञानदेव माउलीच्या वास्तवदर्शी दृष्टांताप्रमाणे बहिणाबाई चौधरी यांच्या या संसारचित्रणातील हे लक्षवेधी वास्तवही असंच बोलकं आहे, नाही का?