खदखदता पंजाब
By Admin | Updated: October 28, 2015 21:31 IST2015-10-28T21:31:21+5:302015-10-28T21:31:21+5:30
गोवंश, गोमांस, गाय अशा मुद्यांवरून देशात सध्या अस्थिरतेचे व अशांततेचे वातावरण पसरवले जात असतानाच देशाच्या सीमेवरील पंजाब हे राज्य खलिस्तान चळवळीनंतर प्रथमच धर्मयुद्धाच्या खाईत ढकलले

खदखदता पंजाब
गोवंश, गोमांस, गाय अशा मुद्यांवरून देशात सध्या अस्थिरतेचे व अशांततेचे वातावरण पसरवले जात असतानाच देशाच्या सीमेवरील पंजाब हे राज्य खलिस्तान चळवळीनंतर प्रथमच धर्मयुद्धाच्या खाईत ढकलले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सत्तेसाठीच्या विधिनिषेधशून्य राजकारणामुळे खलिस्तानी दहशतवाद फोफावला आणि त्याला पायबंद घालताना देशाला मोठी किंमत मोजावी लागली होती. पंजाबात गेले चार महिने जे घडते आहे, त्याचे स्वरूप अशाच प्रकारच्या धार्मिक तेढीचे आहे आणि देशासाठी त्याचे भीषण परिणाम होऊ शकतात. पंजाबातल्या काही खेड्यातील भिंतीवर जूनच्या पहिल्या आठवड्यात गुरू ग्रंथसाहेबांविषयी काही मजकूर लिहिला गेलेला प्रथम आढळला. नंतर हे लोण इतरत्र पसरत गेले. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लगेचच कुरापतखोरांना जेरबंद केले असते, तर नंतर जो धार्मिक वाद उसळला, तो उद्भवलाच नसता. पण अकाली-भाजपा सरकार बेफिकीर राहिले. मग सप्टेंबरच्या अखेरीस काही गावात गुरू ग्रंथसाहेबांची पाने फाडून फेकून दिलेली आढळली. त्यावरून गदारोळ माजला. शीख जत्थे निघू लागले. तलवारी घेतलेले निहंग पंथाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरले. राज्यातील मुख्य रस्ते अडवण्यास सुरूवात झाली. मग पोलिसांना कारवाई करणे भाग पडले आणि पोलिसांवर गोळीबार करण्याची पाळी आली. त्यात दोन तरूण मारले गेले. तेव्हापासून पंधरवडाभर पंजाब खदखदत आहे. आता या साऱ्या प्रकरणाला धार्मिक वळण मिळाले आहे, ते शीख ज्यांना निषिद्ध मानतात, त्या इतर पंथांपैकी एक असलेल्या ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीम सिंह याला अकाल तख्ताने माफ करण्याचा निर्णय घेतल्याने. या बाबाने गुरू गोविंदसिंह यांच्याप्रमाणे वेष परिधान केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याच्या या कृतीमुळे ‘धर्मद्रोह’ झाला असा अकाल तख्तचा दावा होता. मात्र अलीकडेच तख्तने त्याला माफ केले; कारण २०१७ साली पंजाबात विधानसभा निवडणुका आहेत आणि राज्याचा जो माळवा भाग आहे, तेथे या बाबाचे अगणीत भक्त आहेत. त्यांची मते गेल्या विधानसभा निवडणुकीत अकाली दलाच्या दृष्टीने निर्णायक ठरली होती. त्याआधीच्या निवडणुकीत २००७ साली हा बाबा काँग्रसने जवळ केला होता. तेव्हा अकाली दलाचा बालेकिल्ला असलेल्या माळवा भागात काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. गेल्या वर्षी झालेल्या हरयाणा निवडणुकीतही भाजपाला या बाबाने पाठबळ दिले होते. त्यामुळेच २०१७ च्या निवडणुकीसाठी हा बाबा आपल्या मागे असावा, ही अकाली दलाची गरज आहे. पण हा बाबा व त्याचा ‘डेरा सच्चा सौदा’ हा पंथ शिखांच्या दृष्टीने निषिद्ध आहे. येथेच अकाली दलाचे जे पंथीय राजकारण आहे, त्याचा संबंध पोचतो. भारतासह जगातील सर्व गुरूद्वारे ‘शीख गुरूद्वारा प्रबंधक समिती’च्या नियंत्रणाखाली येतात. या समितीवर पंजाबचे मुख्यमंत्री असलेले अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांच्या गटाचे प्रभुत्व आहे. हेच बादल खलिस्तान चळवळीच्या वेळी मुख्यमंत्री होते आणि ही चळवळ फोफावून तिचे दहशतवादात रूपांतर घडवून आणण्याची पाकला जी संधी मिळाली, त्यात या प्रबंधक समितीतील बादल व त्यांच्या विरोधातील गट यांच्यातील धार्मिक तेढही कारणीभूत होती. आजही तेच घडत आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरासह शिखांची जी जगातील पाच पवित्र स्थाने आहेत, त्यातील प्रमुख पुजाऱ्यांची नेमणूक प्रबंधक समिती करते. याच पाच प्रमुख पुजाऱ्यांनी एकत्र येऊन बाबा राम रहीम सिंह याला ‘धर्मद्रोहा’च्या आरोपातून माफ केले. आता या निर्णयाला शीख पंथातील ‘पंज प्यारे’ (गुरूंच्या मर्जीतील पाच भक्त) यांनी आक्षेप घेतला आहे. प्रबंधक समतिीने या पाच प्रमुख पुजाऱ्यांना हटवावे, अशी मागणी या ‘पंज प्यारे’ यांनी केली आहे. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून या पाच पुजाऱ्यांनी ‘पंज प्यारे’ यांनाच बरखास्त केले आहे. पण ते पाच जण हटायला तयार नाहीत. आम्ही ‘गुरूंच्या मर्जीतील भक्त’ आहोत, तेव्हा आम्हाला हटवण्याचा कोणालाच अधिकार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. हा वाद विकोपाला जात असतानाच पुन्हा एकदा रविवारी एका गावात गुरू ग्रंथसाहेबांची पाने फाडण्याचा प्रकार झाला आणि तेथे पोचलेल्या प्रबंधक समितीमधील बादल गटाच्या सदस्याला जमावाने बेदम मारहाण केली. हे सारे प्रकरण मुद्दाम पेटवण्यात आले आहे आणि त्यामागे पद्धतशीरपणे रचलेला कट आहे, हे वेगळे सांगायलाच नको. मताच्या राजकारणासाठी शीख पंथातील धार्मिक तेढीची फोडणी या प्रकरणाला दिली गेली आहे. या साऱ्या प्रकरणाला वेळीच पायबंद घातला गेला नाही, तर एका टप्प्यावर पुन्हा एकदा खलिस्तानी भस्मासूर बाटलीतून बाहेर काढण्याची संधी पाकला मिळेल. आजही पंजाबात या प्रवृत्ती आहेत, तशाच त्या पाकसह इतर पाश्चिमात्य देशातही आहेत. म्हणूनच मध्यंतरी सुवर्ण मंदीर कारवाईत सहभागी झालेल्या जनरल ब्रार यांच्यावर लंडन येथे हल्ला करण्यात आला होता. मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन देशहिताला प्राधान्य देऊन जर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला गेला नाही, तर भारतापुढे मोठे संकट वाढून ठेवले जाणार आहे, हे निश्चित.