खेडोपाडी काँग्रेस पोहोचवणारे देशभक्त केशवराव जेधे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 05:03 AM2021-04-21T05:03:22+5:302021-04-21T05:03:33+5:30

आज देशभक्त केशवराव जेधे यांची १२५ वी जयंती, त्यानिमित्ताने झंझावाती कर्तृत्व असलेल्या या नेत्याचे स्मरण!

Keshavrao Jedhe, a nationalist who reaches out Congress to the rural people | खेडोपाडी काँग्रेस पोहोचवणारे देशभक्त केशवराव जेधे

खेडोपाडी काँग्रेस पोहोचवणारे देशभक्त केशवराव जेधे

googlenewsNext

- दिग्विजय जेधे, अध्यक्ष, 
देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन 
१९१७ साली भारतीय राजकारणात गांधीजींचा उदय झाला आणि राजकीय-सामाजिक स्तरावर नव्याने घुसळण होऊ लागली. राजकीय क्षितिजावर गांधींच्या उदयानंतर केशवराव जेधेंसारखा प्रागतिक-पुरोगामी विचारांचा युवक त्यांच्याकडे आकृष्ट होणं अगदीच स्वाभाविक होतं. १९३०पर्यंत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये  टिळक-समर्थक केळकर गटाचं प्राबल्य होतं; पण १९३० नंतर ही सूत्रे शंकरराव देवांसारख्या गांधीवादी गटाकडे जाऊ लागली. यादरम्यान महाराष्ट्राच्या राजकीय प्रतलात निर्माण झालेली पोकळी केशवराव जेधेंसारख्या ब्राह्मणेतर नेत्याने  समर्थपणे भरून काढली. १९२४ ली सप्टेंबर महिन्यात महात्मा गांधी जेव्हा पुण्यात आले होते, तेव्हा त्यांचा स्वागत-कार्यक्रम जेधे मॅन्शनमध्येच आयोजित करण्यात आला होता. ब्रिटिश हाच आपला मुख्य शत्रू आहे त्यामुळे या बलाढ्य शत्रूला नामोहरम केल्यानंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद सोडवला जाऊ शकतो, असे आवाहन महात्मा गांधीजींनी जेधे मॅन्शन इथल्या सभेत केले. याला प्रतिसाद देत केशवरावांनी आपला मोर्चा  ब्राह्मणेतर चळवळीकडून स्वातंत्र्य चळवळीकडे वळवला.


६ एप्रिल, १९३० रोजी महात्मा गांधींनी दांडी येथे मीठ उचलल्यानंतर  पुढे आठवडाभर केशवराव जेधे  विठ्ठल रामजी शिंदे, प्रा. धर्मानंद कोसंबी यांच्यासह पुण्याच्या पंचक्रोशीत फिरले.  मराठा समाजात जन्मलेले आणि कान्होजी-बाजी जेधेंचा जाज्ज्वल्य वारसा लाभलेले केशवराव  हे बहुजनांच्या, दलितांच्या वस्त्यांत जाऊ लागले आणि सत्याग्रहात सर्व जाती-धर्मांनी का सामील झाले पाहिजे, यावर प्रकाश टाकू लागले. कालांतराने गांधींच्या अनुयायांचंही अटकसत्र सुरू झालं. २६ जानेवारी १९३२ रोजी केशवराव जेधेंना अटक झाली आणि त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. या कारावासात सोबत असलेल्या काकासाहेब गाडगीळ यांच्याशी जेधेंचा मैत्रभाव वाढत गेला.
१९३४ च्या एप्रिल महिन्यात गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि त्याच वेळी काँग्रेसजनांना निवडणुकीचे वेध लागले. मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी ब्राह्मणेतरांचे नेते म्हणून केशवराव जेधे यांना पुणे प्रांतासाठी उमेदवारी द्यावी यासाठी काकासाहेब गाडगीळ आग्रही होते. शेवटी केशवराव  तयार झाले. सातारा जिल्ह्यातील जनतेने केशवरावांना बहुमतांनी निवडून दिले. 


१९३६ साली काँग्रेसच्या  फैजपूर अधिवेशनाची मुख्य जबाबदारी केशवरावांच्या खांद्यांवर होती. त्या काळी संदेशवहनाची आणि दळणवळणाची साधने आजच्या इतकी प्रभावी नक्कीच नव्हती. अशा प्रतिकूलतेतही केशवराव जेधेंनी कंबर कसली आणि मे ते डिसेंबर १९३६ या कालावधीत महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला.  डिसेंबर महिन्यात भरलेल्या या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू यांच्यासमोर जवळपास साठ हजारांचा विराट जनसमुदाय होता. १९३८ साली महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद केशवरावांना मिळालं आणि काँग्रेस मजबूत व्हायला, तळागाळापर्यंत पोहोचायला आत्यंतिक मदत झाली. केशवराव जेधेंसारखा ब्राह्मणेतर नेता ब्राह्मणवादी गटाचं वर्चस्व असलेल्या काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष व्हावा, ही घटना काँग्रेसच्या राजकारणाला नवं वळण देणारी ठरली. १९३७ साली ४६ हजार सभासद संख्या असलेली काँग्रेस केशवरावांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत १ लाख ६३ हजार ८८० सभासदांची प्रचंड मोठा जनाधार असलेली चळवळ झाली. १९३७-३८ या काळात तर ब्राह्मणेतर पक्षातील अनेक प्रमुख कार्यकर्ते-नेते केशवरावांचा झंझावात पाहून प्रभावित झाले आणि स्वतःहून काँग्रेसमध्ये आले. पुणे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसच्या छत्राखाली एकवटू लागले. 


काँग्रेस खऱ्या अर्थाने बहुजनांची होऊ लागली ती १९३८ नंतरच! मराठी प्रांतातल्या सर्वजातीय, सर्वधर्मीय बहुजनांना एका राष्ट्रव्यापी राजकीय चळवळीत आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय करण्याचं  कार्य सर्वप्रथम कोणी केलं असेल तर ते केशवराव जेधेंनीच! 
 

Web Title: Keshavrao Jedhe, a nationalist who reaches out Congress to the rural people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.