भारतीय क्रिकेटमधील कमनशिबी गोलंदाज
By Admin | Updated: January 13, 2017 09:30 IST2017-01-13T00:22:09+5:302017-01-13T09:30:11+5:30
यंदाच्या क्रिकेटच्या मोसमात भारतीय संघ देशांतर्गत एकूण १३ सामने खेळला. इतक्या मोठ्या संख्येत याआधी फार पूर्वी म्हणजे

भारतीय क्रिकेटमधील कमनशिबी गोलंदाज
यंदाच्या क्रिकेटच्या मोसमात भारतीय संघ देशांतर्गत एकूण १३ सामने खेळला. इतक्या मोठ्या संख्येत याआधी फार पूर्वी म्हणजे १९७९-८०च्या मोसमात क्रिकेट खेळले गेले. आजच्या पिढीतील तीन युवा खेळाडूंपैकी दोघांचा त्या काळी जन्मदेखील झाला नव्हता.
या पार्श्वभूमीवर कसोटी सामने अति होत आहेत असे चित्र एकीकडे दिसत असताना (जे माझ्या मते स्वागतार्ह आहे) व टी-२० सामन्यांची लोकप्रियता कमालीची वाढत असताना, कसोटी सामन्यांमधून क्रिकेटच्या खेळाच्या उच्च दर्जाचे आणि समाधान देऊन जाणारे जे प्रदर्शन होत असते त्यावर बरीच चर्चा होणे स्वाभाविक आहे. अशाच चर्चेच्या ओघात एका तिशीतील क्रिकेट चाहत्याने मला विचारले की, असा कोणता उत्कृष्ट क्रिकेटर होऊन गेला, ज्याने कधीही भारताचे प्रतिनिधित्व केले नाही? त्याच्या या प्रश्नावर त्यानेच विचार करून उत्तरात अमोल मुजुमदार याचे नाव घेतले.
अमोल मुजुमदार हा मुंबई संघातला अत्यंत उत्कृष्ट फलंदाज. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अनिल आगरकर यांच्याप्रमाणेच तोदेखील रमाकांत आचरेकर यांच्या हाताखाली तयार झालेला. यातील सर्वांना भारतातर्फे खेळण्याची संधी लाभली, पण रणजी सामन्यात विक्रमी खेळी करून सुद्धा अमोल मुजुमदार मात्र कधीही भारताकडून खेळला नाही.
अमोल दुर्दैवी ठरला हे मान्य करतांना मी त्या तरुण चाहत्याला म्हटले की, त्याच्यावर दुहेरी पक्षपात केला गेला आहे. पण केवळ तो एकटाच नव्हे तर त्याच्या पिढीच्या अनेकांबाबतीत तो झाला. मी जवळपास पन्नास वर्षांपासून अ श्रेणीचे क्रिकेट बघत आलो आहे. माझ्या निरीक्षणानुसार माझे जे आवडते क्रिकेटर कधीच भारताकडून खेळले नाहीत ते बहुतेक सर्व गोलंदाज आहेत. त्यातचे राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर यांचा समावेश होतो.
गोयल आणि शिवलकर डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करत. गोयल पतियाळा, दक्षिण पंजाब, दिल्ली आणि हरयाणा संघाकडून रणजी सामन्यात खेळत असे तर पद्माकर शिवलकर फक्त मुंबई संघाकडून खेळत असे. दोघांची क्रिकेट मधली कारकीर्द दीर्घकाळ चालली होती, गोयल २७ वर्षांपेक्षा अधिक काळ तर शिवलकर ३३ वर्ष खेळत होता. या दोघांनी वर्षानुवर्षे गोलंदाज म्हणून कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे गोयलच्या कारकिर्दीची सुरुवात सलामीचा फलंदाज म्हणून झाली होती. पण शिवलकरने दहावा क्रमांक सोडून कधीच फलंदाजी केली नाही. त्याचे क्षेत्ररक्षण सुद्धा दर्जेदार नव्हते.
मात्र दोघे उत्कृष्ट गोलंदाज होते. दोघांचे चेंडूवर कमालीचे नियंत्रण होते. त्यांच्या हातात चेंडू वळवण्याचे कसब होते व गोलंदाजी भेदक होती. फिरकीला साथ देणारी खेळपट्टी असेल तर दोघेही अत्यंत घातक गोलंदाज म्हणून समोर येत असत. आजच्या काळातील रवींद्र जडेजामध्ये या दोघांचे गुण दिसतात.
शिवलकर आणि गोयल यांचा कारकिर्दीचा आलेख बरेच काही सांगून जातो. गोयलच्या नावावर १८.५८ च्या सरासरीने ७५० बळी आहेत तर शिवलकरच्या नावावर १९.८९ च्या सरासरीने ५८९ बळी आहेत. दोघांचाही धाव देण्याचा वेग प्रत्येक षटकाला दोन इतका कमी होता. पण त्यांच्यापैकी एकालाही भारतासाठी खेळण्याची संधी मिळली नाही व त्यामागील एकमात्र कारण म्हणजे बिशन सिंग बेदी! बिशन सिंग बेदी नावाजलेले फिरकी गोलंदाज होते. त्यांची गोलंदाजी शिवलकर-गोयल यांच्यापेक्षा सरस होती. बेदी दोघांचे समकालीन असल्याने जोवर ते भारतीय संघात होते तोवर शिवलकर-गोयल दोघे किंवा त्यांच्यापैकी कुणी एक, भारतातर्फे खेळणे शक्य नव्हते.
बेदी डाव्या हाताने आणि धीम्या गतीने गोलंदाजी करीत, पण त्यांची शैली शिवलकर आणि गोयल यांच्यापेक्षा वेगळी होती. बेदींचा सर्वाधिक भर खूप उंच टप्प्यांचे किंवा आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्यावर असे. पण गोयल आणि शिवलकर वेगवान तसेच आखूड उंचीचे चेंडू टाकीत असत. व्यंकटराघवन आणि प्रसन्ना यांच्या शैलीमध्ये जशी जमीनअस्मानाची तफावत होती तशीच तफावत गोयल आणि बेदी यांच्या शैलीत होती. पण दुर्दैव असे की, व्यंंकटराघवन व प्रसन्ना ही जोडी बऱ्याच वेळा एकत्रितपणे भारतासाठी खेळली असली तरी गोयल आणि बेदी मात्र कधीच एकत्रितपणे भारतातर्फे खेळले नाहीत.
व्यंंकट आणि प्रसन्ना यांचा उदय होण्याच्या कैक वर्षे आधी ग्रिमेट आणि ओरिअली या दोन महान फिरकीपटू खेळाडूंनी १९३० साली आॅस्ट्रेलियाला कसोटी मालिका जिंकून दिली होती. ग्रिमेटचा भर उंच टप्प्याच्या आणि चकवणाऱ्या चेंडूंवर असे तर ओरिअली चेंडू फिरवून त्याला उसळी देत असे. ते खूप कमी कसोटी सामने खेळले. १९७० साली फिल एडमंड्स आणि डेरेक अंडरवूड या दोघांनी एकत्रितपणे इंग्लंडसाठी खेळायला सुरुवात केली खरी पण एकाच सामन्यात दोन डावखुऱ्या गोलंदाजांना खेळवणे शक्य नव्हते. जागतिक पातळीवर खेळाडूंच्या निवडीच्या बाबतीत हाच एक प्रकारचा पूर्वग्रह दिसून येतो. तोच पूर्वग्रह भारतालासुद्धा लागू होतो आणि म्हणूनच गोयल आणि शिवलकर कधीही भारतासाठी खेळू शकले नाहीत.
गोयल-शिवलकर यांच्याही आधी मद्रासचे ए.जी. रामसिंग हे एक उत्कृष्ट डावखुरे फिरकीपटू होऊन गेले. त्यांची फलंदाजी पण चांगली होती. त्यांची अ श्रेणीच्या क्रिकेटमधील कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्यांनी १८.५६ च्या सरासरीने २६५ बळी घेतले होते आणि ३५ धावांच्या सरासरीने ३००० धावा काढल्या होत्या. पण त्यांचीही भारताच्या संघात निवड झाली नव्हती, कारण त्यांच्यासमोर विनू मंकड होते. पण एका बाबतीत मात्र ते गोयल आणि शिवलकर यांच्यापेक्षा भाग्यशाली ठरले, त्यांची दोन मुले भारतासाठी खेळली आहेत.
या स्तंभाच्या माध्यमातून ज्या स्वरुपाचा प्रश्न उपस्थित केला आहे तशा स्वरुपाचा एक प्रश्न क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशात कधी ना कधी विचारला गेला आहे व तो म्हणजे असा कोणता उत्कृष्ट खेळाडू आहे की जो कधीही इंग्लंड वा आॅस्ट्रेलियाकडून खेळला नाही? या प्रश्नावर काहीशी भावनाप्रधान, खेळकर तर प्रसंगी तप्त चर्चादेखील होऊ शकते.
काही दशकांपूर्वी क्रिकेटवर लिहिणारे इंग्रज लेखक ए.ए.थॉमसन यांनी आपल्या मित्राला असाच प्रश्न विचारताना म्हटले होते की, असा कोणता जागतिक कीर्तीचा खेळाडू आहे, जो इंग्लंडतर्फे कधी खेळलाच नाही. त्यांच्या मित्राचे उत्तर होते, डॉन ब्रॅडमन! ही गोष्ट १९५० च्या दशकातील आहे. आता याच धर्तीवर असा प्रश्न विचारला की असा कोणता उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे जो कधीच भारतासाठी खेळला नाही? तर त्याचे तिरकस पण अधिक स्पष्ट उत्तर असेल शेन वॉर्न किंवा जॅक कॅलीस अथवा सर डॉन ब्रॅडमन किंवा गारफिल्ड सोबर्स!
रामचन्द्र गुहा
(क्रिकेटचे चाहते अभ्यासक-समीक्षक)