एकदाची होऊनच जाऊ द्या सगळ्याचीच चौकशी!

By Admin | Updated: April 7, 2016 00:17 IST2016-04-07T00:17:10+5:302016-04-07T00:17:10+5:30

आपल्याला शिकवणारे शिक्षक कोण असावेत हे जर विद्यार्थीच ठरवू लागले तर उद्या मंत्रालयातील कर्मचारी आपल्या विभागाचे मंत्रिपद कोणाकडे असावे याचा निर्णय घेऊ लागतील

Just go ahead and inquire everything! | एकदाची होऊनच जाऊ द्या सगळ्याचीच चौकशी!

एकदाची होऊनच जाऊ द्या सगळ्याचीच चौकशी!

अतुल कुलकर्णी (वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)
आपल्याला शिकवणारे शिक्षक कोण असावेत हे जर विद्यार्थीच ठरवू लागले तर उद्या मंत्रालयातील कर्मचारी आपल्या विभागाचे मंत्रिपद कोणाकडे असावे याचा निर्णय घेऊ लागतील. अत्यंत घातक पायंडे सरकार पाडू पाहात आहे. एखाद्या शिक्षकाविषयी, एखाद्या डीन विषयी तक्रारी जरुर असू शकतात पण त्याची चौकशी करणे, त्यातील सत्यता शोधणे हे काहीही न करता थेट प्राध्यापकांची बदली करण्याची भूमिका घेण्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नातेसंबंधांनाही तडा गेला आहे. दुर्देवाने ‘नाणे’ गुरुजींचा जमाना आल्यामुळे साने गुरुजींची किंमत कोणालाही उरलेली नाही...
हे सारे सांगण्याचे कारण ठरले आहेत ते जे.जे. हॉस्पीटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने. डोळ्याच्या विभागात त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होतो अशी काही मुलांची तक्रार असल्याने ‘मार्ड’ने (निवासी डॉक्टरांची राज्यव्यापी संघटना) संपाचे हत्त्यार उपसले आहे. त्यावर विधान परिषदेत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी निवृत्त न्यायाधीश नेमून करतो असे सांगितले, तेव्हा सगळे सदस्य भडकले. सत्ताधारी मंत्री गिरीष महाजन हेदेखील उसळून बोलू लागले. या तीव्र भावना लक्षात येताच सचिवांकडून माहिती घेतो असे सांगून तावडे यांनी चार पावले मागे जाणे पसंत केले. मात्र आता तावडे यांनी केवळ या एका प्रकरणाचीच नव्हे, तर अनेक गोष्टींची न्यायमूर्र्तींच्या मार्फत चौकशी केली पाहिजे. सर्व संबंधित मुद्यांची एकदा चौकशी होऊनच जाऊ द्या म्हणजे जनता जनार्दनालाही कळेल की, पडद्याआड नेमके काय घडत आहे ते...
सर्वात आधी ज्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात होता ते विद्यार्थी तावडेंकडे न जाता भाजपाच्या नेत्या शायना एन.सी. यांच्याकडे का गेले, शायना यांनी या विषयी लहानेंना काही विचारणा केली का, की मुलांना थेट मुख्यमंत्र्यांकडेच नेणे त्यांना योग्य वाटले, याचीही चौकशी व्हायला हवी. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयात डोळ्यांचा विभाग आहे. जे.जे. मध्येच जाऊन डोळे तपासून घ्यावेत असे राज्यातल्या अत्यंत गरीब माणसापासून ते आयएएस अधिकाऱ्यांनाही का वाटते, ही बाब चौकशी समितीतून समोर यायला हवी. जेजेमधील डोळ्याच्या विभागाची ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) आणि अन्य आजारांची ओपीडी येथे किती रुग्ण येतात, याचीही आकडेवारी या चौकशीतून त्यांनी बाहेर आणावी. राज्यभरात जे सरकारी डॉक्टर सह्या करुन खाजगी हॉस्पीटलमध्ये जाऊन बसतात, सरकारी दवाखान्यातल्या यंत्रणा बंद पाडून खाजगी हॉस्पीटलकडून कमिशन घेतात, त्यांचीही या निमित्ताने चौकशी होऊन जाऊ द्या. जेजेची अवस्था लहाने येण्यापूर्वी काय होती आणि आज काय आहे याचाही ताळेबंद तावडे यांनी यानिमित्ताने मांडलाच पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांवर कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे आणि ज्याची चौकशी सुरु आहे त्या विषयी मार्डची भूमिका काय आहे, ती चौकशीच करायची नाही का, याचीही माहिती समोर येऊ द्या. जे.जे. हॉस्पीटलला सुपर स्पेशालिटीचा दर्जा मिळाला आहे. तिथे आता जवळपास ७०० ते ८०० कोटी रुपये खर्चून विस्ताराचे काम होणार आहे. अशा वेळी त्या कामात सरकारमधील मंत्र्यांचा ‘इंटरेस्ट’ असल्याचा जो आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे, तो गृहीत धरुन खरोखरीच अशा कोणत्या मंत्र्याचा त्यात इंटरेस्ट आहे याचीही चौकशी निवृत्त न्यायाधीशांनी केली पाहिजे. एवढेच नव्हे तर तावडे यांच्या विभागातील अग्नीरोधक यंत्रांच्या खरेदीच्या वेळी भ्रष्टाचार झाल्याचा जो आरोप झाला होता, त्याचीही चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत झाली पाहिजे. त्या खरेदीची फाईल माहिती अधिकारात मागूनही मिळत नाही, असा आक्षेप विरोधी पक्षनेत्यांचा आहे. ती फाईल कोण अडवून बसले आहे, हे सत्यही या निमित्ताने समोर येईल.
या संदर्भात प्रश्न चौकशी कोणाची आणि कशाची करायची हा नाही. पण डॉ. लहाने यांच्यासारखा माणूस दिवसातले १६ तास जे.जे. हॉस्पीटलच्या भल्यासाठी देतो असे जेजेत जाणारा प्रत्येकजण जेव्हां सांगत असतो तेव्हां त्यांच्या या सेवाधर्माचे त्यांना हेच फलीत मिळणार असेल तर राज्यातल्या एकाही सरकारी दवाखान्यातला एकही डॉक्टर झोकून देऊन काम करणार नाही. चांगले काम करणारे अनेक आयएएस अधिकारी तडकाफडकी बदलले गेले. परिणामी या राज्यात चांगले काम करावे की नाही अशीच मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये तयार होत असताना तीच री पुढे ओढली जात आहे. स्वत:च्या जाहिराती केल्या म्हणून डॉ. लहानेंना महाराष्ट्र ओळखत नाही. लाखो रुग्णांना दृष्टी दिली म्हणून त्यांची ही ओळख आहे. लहानेंनी स्वत:ची खाजगी प्रॅक्टीस केली असती तर ते आज मलबारहिल येथे स्वत:चा मोठा बंगला घेऊ शकले असते मात्र स्वत:च्या दोन्ही किडन्या गेल्यानंतर आईने दिलेल्या किडनीच्या आधारे हा माणूस अहोरात्र काम करतो आहे. गोरगरीब, कोणाचाही वशिला नसणारे रुग्ण उपचारांच्या अपेक्षेने जे.जे. सारख्याच राज्यातल्या अन्य हॉस्पीटलमध्येहीे जात असतो. पण तिथे उपचार मिळाले नाहीत म्हणून असा रुग्ण कोणत्याही वर्तमानपत्राकडे बातम्या द्यायला जात नाही, तर तिथेच समोर दिसेल त्या डॉक्टरच्या हाता पाया पडत उपचार करण्याची विनवणी करत राहातो. राज्यातल्या सरकारी हॉस्पीटलमध्ये स्वत:ची ओळख विसरुन फिरल्याशिवाय या गोष्टी दिसणार नाहीत. अशा चेहरा नसलेल्यांना उपचार मिळावेत म्हणून डॉ. लहानेंसारखे अनेक डॉक्टर राज्यात आपापल्या परीने काम करीत आहेत. रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून धडपड करीत आहेत. त्या सगळ्यांच्या भावनांना विलक्षण तडा देण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने या एका घटनेने केले आहे. शायना एनसी यांना या विषयाचे गांभीर्य किती आहे माहिती नाही. पण या विषयाच्या आडून जे कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असतील ते लोक चांगले काम करणाऱ्यांच्या मनात जी भावना रुजवत आहेत, ती अधिक वेदनादायी आहे. आज जे विद्यार्थी चौकशीचा ससेमिरा मागे लागला म्हणून ‘मास बंक’ करीत आहेत, त्यांना उद्या डॉक्टर व्हायचे आहे. त्यांच्यातल्या अनेकांना आपणही अमूक अमूक डॉक्टरसारखे व्हावे असे वाटत असेल. त्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी टाकण्याचे काम या घटनेने केले आहे.
कोण चूक, कोण बरोबर हा विषयच नाही, मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रकरण हाताळले जात आहे त्यातून कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरी पदरी निराशेशिवाय काहीही येत नाही हे ठासून सांगण्याचे काम झाले आहे. डॉ. लहाने १०० टक्के बरोबर आहेत असा त्यांचाही दावा नसेल. पण कोणाचे चुकत असेल तर या विभागाचे पालक म्हणून मध्यस्थाची भूमिका या खात्याच्या मंत्र्यांनी पार पाडायला हवी. मात्र खाजगीतील त्यांचा अंगुलीनिर्देश धक्कादायक दिशेने जाणारा आहे. डॉ. अभय बंग यांनी अशाच उद्विग्नतेतून चालवायला घेतलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सोडून दिले, हा अनुभव शासनाच्या गाठी तसाही आहेच...

Web Title: Just go ahead and inquire everything!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.