5 जी : जुही चावला म्हणते ते बरोबर आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:29 AM2021-06-02T05:29:08+5:302021-06-02T05:29:36+5:30

‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानामुळे जीवसृष्टीलाच धोका असल्याच्या चर्चा जगभर सुरू आहेत. या वादाचे निष्कर्ष नेमके काय निघणार?

Juhi Chawla files suit against 5G implementation in India | 5 जी : जुही चावला म्हणते ते बरोबर आहे का?

5 जी : जुही चावला म्हणते ते बरोबर आहे का?

googlenewsNext

- अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक

सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी भारतात नजीकच्या भविष्यात येऊ घातलेल्या ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानामुळे निव्वळ माणसालाच नव्हे तर एकूण जीवसृष्टीलाच धोका असल्याच्या शक्यतेविषयी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे खरोखरच या तंत्रज्ञानामुळे आपल्याला अपाय होऊ शकतो का; हा मुद्दा चर्चेला आला आहे. जवळपास प्रत्येक विषयाप्रमाणेच याही बाबतीमध्ये दोन टोकांची मतं असल्यामुळे त्याविषयी ठामपणे सांगणं अशक्य असलं तरी सारासार विचार करता जुही चावला यांनी मांडलेला मुद्दा दुर्लक्षणीय नक्कीच नाही. इतकंच नव्हे; तर त्यांच्या या मुद्यामुळे या प्रकरणी खरोखरच मूलभूत संशोधन होणं आणि ते पारदर्शकरीत्या आपल्यासमोर येणं गरजेचं आहे.



मुळात हा धोका मोजायचा तरी कसा? आपल्या मोबाईल फोनमधून तसंच ही सगळी यंत्रणा चालवणाऱ्या मनोऱ्यांमधून सतत संदेश बाहेर टाकले जात असतात किंवा ते टिपले जात असतात. अगदी आपला फोन आपण वापरत नसतानासुद्धा रात्रंदिवस हे काम सुरूच असतं. त्यातूनच आपला फोन चालू आहे का, तो कुठे आहे अशी सगळी माहिती मोबाईल सुविधा पुरवणाऱ्या कंपनीला मिळते. यामुळे या उपकरणांमधून किरणोत्सर्जन म्हणजेच ‘रेडिएशन’ होतं. साहजिकच हे किरणोत्सर्जन आपल्या शरीरावर सतत आदळत असतात. अशा प्रकारचं किरणोत्सर्जन फक्त मोबाईल फोन यंत्रणेमधूनच होतं असं नाही; तर असंख्य उपकरणांमधून ते होत असतं. यामधलं बरंच किरणोत्सर्जन आपल्यासाठी फार घातक नसतं असं मानलं जातं. याचं कारण म्हणजे या किरणांमध्ये आपल्या शरीरामधल्या पेशींपर्यंत पोहोचण्याची क्षमता नसते. कर्करोग झालेल्या रुग्णांचे जेव्हा किरणोत्सर्गी उपचार केले जातात तेव्हा याच्या उलट प्रकार होतो आणि त्यांच्या शरीरामधल्या रोगट पेशींना मारण्यासाठी त्या पेशींपर्यंत पोहोचणारी किरणं सोडली जातात. म्हणजेच नुसतं किरणोत्सर्जन झालं म्हणून ते धोकादायकच असतं असं सरसकट म्हणता येत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘स्पेसिफिक ॲब्सॉर्पशन रेट (सार)’ नावाचं मापक तयार केलं. आपल्या शरीरामधल्या पेशीमध्ये घुसण्याची क्षमता म्हणजे सार; असं आपण म्हणू शकतो. याविषयी बरंच संशोधन झालं आणि ते खूपच कष्टदायी होतं. यातून काही निष्कर्ष हाती येण्याची चिन्हं दिसत असल्यामुळे मोबाईल तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले उद्योग सावध झाले आणि त्यांनी अगदी काही अपवाद वगळता मोबाईल फोनचा वापर अत्यंत सुरक्षित असतो अशा प्रकारच्या बातम्या पसरवायला सुरुवात केली. याच्या जोडीला आपल्याला अनुकूल ठरतील असे निष्कर्ष काढण्यासाठीच्या अनेक संशोधन प्रकल्पांना त्यांनी चालना दिली. 



१९९३ साली जॉर्ज कार्लो यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेमध्ये या विषयावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या एका गटाची स्थापना करण्यात आली. या गटानं संशोधन सुरू करताच काही दिवसांमध्येच मोबाईल फोनच्या वापरामुळे संबंधित लोकांवर जनुकीय पातळीवर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून आलं. हे निष्कर्ष धक्कादायक असल्यामुळे त्यांची फेरतपासणी करण्यात आली आणि निरनिराळ्या मार्गांनी हे संशोधन नव्यानं करण्यात आलं. तरीसुद्धा निष्कर्षांमध्ये कसलेच बदल आढळले नाहीत. जागतिक पातळीवरच्या शास्त्रज्ञांच्या तीन गटांनी हे निष्कर्ष स्वतंत्रपणे तपासून ते योग्य असल्याचा निर्वाळा दिला. यामुळे मोबाईल कंपन्यांची ‘लॉबी’ हादरली आणि तिनं अत्यंत आक्रमकपणे हे प्रकरण दाबून टाकलं. यानंतर मोबाईल फोनमधून होत असलेलं किरणोत्सर्जन माणसांसाठी धोकादायक नसून फक्त त्यातून निर्माण होणारी उष्णता मात्र त्रासदायक ठरू शकते असं अमेरिकेच्या ‘फूड ॲँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए)’ कडून सातत्यानं सांगितलं गेलं. 



- यामागचं वैज्ञानिक कारण म्हणजे किरणोत्सर्जन हे मुख्यत्वे दोन प्रकारचं असतं: आयोनायझिंग (घातक) आणि नॉन-आयोनायझिंग (सुरक्षित). मोबाईल फोनमधलं किरणोत्सर्जन हे नॉन-आयोनायझिंग म्हणजे सुरक्षित प्रकारातलं आहे असं एफडीए म्हणते. आत्तापर्यंतच्या मोबाईल आणि तत्सम सुविधा ध्वनिलहरींच्या पट्ट्यांमधले जे पट्टे वापरतात त्यापेक्षा खूप जास्त फ्रिक्वेन्सीजचे पट्टे ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानामध्ये वापरले जातात. तांत्रिक भाषेत सांगायचं तर ते ३.५ गिगाहर्ट्झपासून सुरू होऊन पुढे बऱ्याच गिगाहर्ट्झपर्यंत जातात. याचं कारण म्हणजे हे तंत्रज्ञान खूप जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. साहजिकच या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होत असलेलं किरणोत्सर्जन आधीच्या तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या किरणोत्सर्जनापेक्षा खूप जास्त असतं हे उघडच आहे. असं असलं तरी हे किरणोत्सर्जनसुद्धा सुरक्षित प्रकारचंच आहे असं सांगितलं जातं. २०११ साली झालेल्या एका संशोधनात १४ देशांमधल्या ३० शास्त्रज्ञांच्या अभ्यासगटानं मोबाईलमधून येणाऱ्या किरणोत्सर्जनामुळे कर्करोग होऊ शकतो असं दिसून आलं. २०१७ सालच्या एका संशोधनातही मेंदूच्या कर्करोगाला मोबाईलमधलं किरणोत्सर्जन कारणीभूत ठरतं असं आढळलं. याच्या पुढच्याच वर्षीच्या अभ्यासात मात्र असं ठामपणे म्हणता येणार नसल्याचे निष्कर्ष निघाले. साहजिकच सातत्यानं उलटसुलट प्रकारचे निष्कर्ष निघत असल्यामुळे याविषयी काहीही म्हणणं योग्य ठरणार नाही. 

मुळात या निष्कर्षांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे कसं ठरवणार? प्राण्यांवर ’फाईव्ह जी’चे काय दुष्परिणाम होतात याविषयीचे अभ्यासच मर्यादित आहेत. २०१९ सालच्या एका अभ्यासात मोबाईल फोनच्या किरणोत्सर्जनाचे दुष्परिणाम उंदरांच्या पेशींवर होत असल्याचं आढळलं. याच्या तीन वर्षं आधी झालेल्या एका अभ्यासात कुठल्याही फ्रिक्वेन्सीजचं किरणोत्सर्जन प्राण्यांसाठी घातक ठरत असल्याचं दिसून आलं होतं. साहजिकच जुही चावला यांनी अधोरेखित केलेला मुद्दा एकदम रास्त असला तरी त्याविषयी निर्णायकपणे काही बोलणं शक्य नाही. तसंच यामध्ये इतके आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत; की ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाच्या वापराला खीळ बसेल अशा प्रकारचा निर्णय घेणं सध्यातरी कुणालाच शक्य होणार नाही. म्हणजेच या याचिकेमधले मुद्दे अगदी गंभीर आहेत यात शंका नाही; पण एकूण व्यावसायिक हित बघता त्याकडे दुर्लक्ष करून ‘फाईव्ह जी’ला पुढे रेटणं हेच सगळ्यांना व्यवहार्य वाटणार आहे. यामुळे भविष्यात आपल्याला महाभयंकर परिणामांचा सामना करावा लागू नये;  म्हणजे झालं! 
akahate@gmail.com

Web Title: Juhi Chawla files suit against 5G implementation in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.