जोशींचा विजनवास
By Admin | Updated: April 27, 2015 23:01 IST2015-04-27T23:01:18+5:302015-04-27T23:01:18+5:30
‘जोशी के साथभी करो मन की बात’ हा संजय जोशींच्या प्रेमातील कार्यकर्त्यांनी घेतलेला भावनिक आधार असतो आणि म्हणूनच त्यांच्या हुंदक्यांना घाबरत घाबरत का होईना वाट मोकळी करून देणारा ठरतो.

जोशींचा विजनवास
‘जोशी के साथभी करो मन की बात’ हा संजय जोशींच्या प्रेमातील कार्यकर्त्यांनी घेतलेला भावनिक आधार असतो आणि म्हणूनच त्यांच्या हुंदक्यांना घाबरत घाबरत का होईना वाट मोकळी करून देणारा ठरतो.
भाजपा नेते संजय जोशी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मागच्या जन्माचे नव्हे तर जन्मोजन्मीचे वैर असावे का, असा प्रश्न परवा नागपूर विमानतळावर जोशींच्या स्वागतासाठी जमलेले संघाचे आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना विचारत होते. मागील १० वर्षांपासून या कार्यकर्त्यांना हा प्रश्न सतावत असतो. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी रागातून, मोदी लाटेला भरती असताना काळजीतून आणि आता तिला ओहोटी लागल्यानंतर काकुळतीने तो व्यक्त होत असतो. या तिन्हीत एक गोष्ट कायम व ती म्हणजे जोशींबद्दलचे प्रेम आणि मोदींबद्दलची भीती.
कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता आपल्या पक्षातील कुठल्याही घटनेचा कार्यकारणभाव आपल्या वैचारीक कुवतीनुसार तपासून पाहत असतो. तो संघाचा आणि भाजपाचा असेल तर शाखेच्या शिस्तीतच त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. भाजपा आणि संघाचे कार्यकर्ते जोशींच्या पुनर्वसनासाठी करीत असलेले प्रयत्न याच पठडीत मोडतात. या प्रयत्नांमध्ये प्रार्थनेचा भाग जेवढा आहे तेवढाच प्रारब्धावरचा विश्वासही आहे. म्हणूनच पुढे असे काही घडेल आणि संजय जोशी पुन्हा मुख्य प्रवाहात येतील, असे त्यांना सतत वाटत असते. ते मोदींना दुखावू इच्छित नाहीत. ‘जोशी के साथभी करो मन की बात’ हा त्यांनी घेतलेला भावनिक आधार म्हणूनच त्यांच्या हुंदक्यांना घाबरत घाबरत का होईना वाट मोकळी करून देणारा ठरतो. संजय जोशींच्या वाढदिवसानिमित्त अलीकडेच देशभरात, नागपुरात होर्डिंग्स आणि बॅनर्स लागले. कार्यकर्ते अजूनही त्यांच्यावर प्रेम करतात, हा त्याचाच पुरावा आहे. जोशींचा विजनवास कधी संपेल, याचे उत्तर संघाजवळच आहे. जोशींचे पुनर्वसन व्हावे, असे संघाला मनोमन वाटते. पण सध्या तरी मोदींची नाराजी ओढवून घ्यायची संघाची मानसिकता नाही. आजवर करू न शकलेल्या व पुढे करावयाच्या सर्व ‘लिटमस टेस्ट’ संघाला मोदींच्या माध्यमातून करायच्या आहेत. मोदी ही संघाची ‘प्रयोगशाळा’ आहे. या प्रयोगशाळेच्या काही ‘टेस्ट’ गुजरातमध्ये होऊन गेल्या आहेत. पुढची दोन वर्षे त्या देशभरात सुरू राहतील. एकदा या चाचण्या संपल्या की मोदी लाटेचा भर वेगाने ओसरायला सुरुवात होईल. ही लाट जसजशी ओसरत जाईल तसतशी जोशींच्या स्वागताच्या होर्र्डिंग्सची संख्याही वाढत जाईल. एका व्यक्तीमागे एक पक्ष आणि त्याची पालक संघटना अशी फरफटत जाणे धोक्याचे तर आहेच; शिवाय आपल्या ‘संस्कृतीत’ बसणारे नाही, ही बाब संघाच्या धुरीणांनाही ठाऊक आहे.
जोशींकडे सत्ता नाही, पद नाही तरीही कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्याभोवती सदैव असते. नागपूर मुक्कामी किंवा दिल्लीतील वास्तव्यात पक्षाचे कार्यकर्ते आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात. यात गुजरातच्या समस्यांची संख्या लक्षणीय असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या समस्या सुटल्याचे समाधान घेऊनच हे कार्यकर्ते परत जात असतात. जोशींमुळेच मुख्यमंत्री होण्याची आपली पहिली संधी हुकली आणि केशुभाई पटेल मुख्यमंत्री झाले, हा मोदींच्या मनातील राग आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गडकरींनी त्यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपवली. तो संताप मोदींच्या मनात होताच. जोशींना राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढल्याशिवाय आपण मुंबईच्या बैठकीला येणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली व ती खरीही करून दाखवली. संघाच्या अलीकडच्या गुजरात शिबिरात जोशींना आवर्जून दिलेले निमंत्रण मोदींना रुचले नव्हते आणि तशी नाराजी अमित शहांमार्फत त्यांनी संघाकडे पोहोचवली, ही गोष्टही सर्वविदीत आहे. मोदी आज सर्वेसर्वा आहेत. त्या तुलनेत संजय जोशी कफल्लक आहेत. तरीही मोदी त्यांचा दु:स्वास का करतात, त्यांना इतके का घाबरतात, हा कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नच जोशींची उंची वाढवत आहे आणि मोदींचे उणेपण... नव्वद वर्षे वय असलेल्या संघ परिवाराने कुठल्याही एका व्यक्तीला कधीच शक्तिशाली होऊ दिले नाही. म्हणूनच अजातशत्रू असूनही अटलबिहारी वाजपेयी ‘मुखवटा’ ठरले, जिनांच्या कबरीवर फुले वाहिल्याचे निमित्त झाले अन् अडवाणी अडगळीत गेले. संघ मोदींच्याही बाबतीत तसे करण्यासाठी ‘अच्छे दिन’ची वाट पाहत असावो.
- गजानन जानभोर