लष्कर की जैश?

By Admin | Updated: February 7, 2017 23:20 IST2017-02-07T23:20:16+5:302017-02-07T23:20:16+5:30

घात नक्की कुणाचा झाला आहे किंवा होणार आहे हे कळू नये इतकी साशंकता सध्या पाकिस्तानी दहशतवादी गटांतही निर्माण झाली आहे.

Jism of the Army? | लष्कर की जैश?

लष्कर की जैश?

घात नक्की कुणाचा झाला आहे किंवा होणार आहे हे कळू नये इतकी साशंकता सध्या पाकिस्तानी दहशतवादी गटांतही निर्माण झाली आहे. आणि ती निर्माण करून स्वत:चाच फायदा करून घेण्याचा घाट पाकिस्तान सरकार आणि लष्करानं एकमतानं घातलेला दिसतो. तसं नसतं तर जैश-ए-मोहंमदच्या आक्रमक हालचालींना पाकिस्तानात वेग आला नसता. पाकिस्तानच्या तालुका पातळीच्या शहरांसह मोठ्या शहरातही खुलेआम दिवसाढवळ्या ‘रिक्रुटमेण्ट’ जैशनं गेल्या दोन-तीन दिवसात सुरू केलं आहे. एकीकडे लष्करचा म्होरक्या हाफीज सईदला पाक सरकारनं अटक करून नुकतंच नजरकैद केलं. हाफीजनं दावाही केला की आपल्याला झालेली अटक ही ट्रम्प-मोदी मैत्रीचा परिणाम आहे.

आपण दहशतवादविरोधी लढाईत वॉशिंग्टनसोबत आहोत असा मेसेज देण्यासाठी पाक सरकारने ही कारवाई केली. ‘लष्कर’च्या कारवायांना आळा घालण्याचा दावा करणाऱ्या पाक सरकारनं प्रत्यक्षात मात्र जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेला खुली छूट दिलेली दिसते. अल-कलम या जैशच्या अधिकृत जर्नलद्वारे जिहादसाठी तयार होण्याचं आवाहन पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधल्याही तरुणांना सरसकट करण्यात येत आहे. त्यातून संघटनेत भरतीही राजरोस सुरू झाली आहे. मात्र या साऱ्याशी जैशचा मुखिया मसूद अझहरचा काही संबंध नाही असं म्हणत पाक सरकार कानावर हात ठेवत आहे. भारतीय विमानाचं अपहरण, संसद हल्ला ते पठाणकोट हल्ला या साऱ्या दहशतवादी कारवाया मसूदच्या जैशच्याच. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारनं मसूदला अटकही केली होती.

म्हणजे खरंतर एक सुरक्षा कवचच पुरवलं होतं. एप्रिल २०१६ मध्ये त्याला सोडूनही दिलं. ना खटला, ना सुनावणी. विशेष म्हणजे, इंग्लंडसह अमेरिकेतही जैशवर बंदी आहे. मात्र या साऱ्याची पर्वा न करता पाकिस्तानने पुन्हा मसूद अझहरला वाट मोकळी करून दिली आहे. त्यासाठीच लष्करच्या हाफीज सईदला बाजूला करण्यात आलं असू शकतं अशीही सध्या एक चर्चा आहे. एक मात्र नक्की, मसूदच्या मागे चीन ठामपणे उभा राहत आला असून चीनच्या पाठिंब्याच्या जोरावर मसूदच्या नाकात वेसण घालणं पाक लष्करालाही जमलेलं नाही. वॉशिंग्टनचं वारं बदलत असताना आणि पाकिस्तानच्या डोक्यावरही बंदीची तलवार लटकत असताना जैशनं डोकं वर काढलं आहे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

Web Title: Jism of the Army?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.