कोल्हापुुरी परंपरेतील झुंझार नेता
By Admin | Updated: March 10, 2015 22:48 IST2015-03-10T22:48:50+5:302015-03-10T22:48:50+5:30
कोल्हापूरच्या मातीत घडलेली माणसं असोत की एखादी घडलेली घटना; त्यातील रांगडेपणाची नोंद घेतल्याशिवाय त्यावर काही लिहिताच येत नाही.

कोल्हापुुरी परंपरेतील झुंझार नेता
वसंत भोसले,
संपादक, लोकमत, कोल्हापूर
कोल्हापूरच्या मातीत घडलेली माणसं असोत की एखादी घडलेली घटना; त्यातील रांगडेपणाची नोंद घेतल्याशिवाय त्यावर काही लिहिताच येत नाही. अशाच रांगड्या परंपरेतून गेली सहा दशके राजकारण करणारे सदाशिवराव दादोबा मंडलिक यांचे मुंबईत सोमवारी मध्यरात्री निधन झाले. गरीब, शेतकरी वर्गासाठी राजकारण करण्यासाठीच आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण उपयोगी पडावा, अशी अपेक्षा ठेवूनच ते जगत आले. काही महिन्यांपूर्वी मुंबईत उपचारार्थ दाखल केले असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले. मुख्यमंत्री येणार हे समजताच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरील तेरा पत्रे या बहाद्दर नेत्याने तयार ठेवली होती. अतिदक्षता विभागातच ती त्यांना एक-एक काढून दिली. मुख्यमंत्र्यांनाही काही समजेना. हा माणूस आयुष्याच्या पैलतीरापर्यंत पोहोचला आहे; पण त्याला लोकांच्या प्रश्नांवर निर्णय झाले पाहिजे, याची आस काही सुटलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आले.
सदाशिवराव मंडलिक १९५४-५५पासून म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षापासून अखेरच्या ८१व्या वर्षापर्यंत अखंडपणे कार्यरत होते. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले, शेती आणि शेतकरी वर्गाशी जोडलेले, जमीन, पाणी आणि गरिबांच्या हिताची गोष्ट करीतच ते राजकारण करीत आले होते. सत्तेचे राजकारण करताना सामाजिक न्यायाची बाजू आणि कोल्हापूरचे लोकराजे शाहू महाराज यांच्या विचारांचा विसर त्यांनी कधी पडू दिला नाही. त्यामुळेच लोकहिताच्या ज्या ज्या चळवळी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्यात झाल्या, त्यात त्यांनी झोकून देऊन काम केले. त्याचबरोबर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची त्यांच्यावर पकड असल्याने शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले.
शाहू महाराजांच्या घराण्यात मोलमजुरी करणाऱ्या दादोबा मंडलिक यांच्या मुलाने पुढे जाऊन ‘शाहूंचे वारसदार’ कागलचे राजे विक्रमसिंंह घाटगे यांच्या विरोधातच राजकीय संघर्ष केला. ‘राजा विरुद्ध प्रजा’ असे या लढाईला स्वरूप देण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी चारवेळा कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पुढे लोकसभेसाठी ते चार वेळा लढले आणि जिंंकले. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.
धिप्पाड, सरळ नाक, देखणा चेहरा, जणू जुन्या मराठी चित्रपटाचा नायक शोभून दिसावा अशी त्यांची प्रकृती होती. पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्रिपद असताना दूधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरणाचे पाणी कर्नाटकाला देण्याचा प्रश्न आला. कर्नाटकातील सीमाभागातील मराठी गावांना हे पाणी मिळणार होते; पण आंतरराज्य करार सांगत होता की, पाणी कालव्याने द्यायचे आहे. ‘कर्नाटकाने कालवे केलेलेच नाहीत, पाणी देण्याचा आग्रह कसा धरता?’ असे अधिकारी सांगत होते. महाराष्ट्रानेही आपल्या हद्दीत कालवे पूर्ण केलेले नव्हते. सीमावर्ती मराठी भाषिकांना पाणी देता येत नाही, म्हणून मंडलिक कडाडले. ‘कालवे केव्हा पूर्ण करायचे ते पाहू; पण ओढ्यांमधून नदीपात्रात पाणी सोडा आणि सीमावासीयांना तातडीने पाणी द्याच,’ असा त्यांनी आग्रह धरला. त्यांचा राग पाहून दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांनी माना खाली घातल्या आणि गेली वीस वर्षे सीमाभागातील मराठी गावांना या धरणाचे पाणी मिळत आहे.
शिक्षणसंस्थांबरोबरच सहकारी साखर कारखानदारीतही त्यांनी काम सुरू केले. अत्यंत कमी वेळात साखर कारखाना उभा करून उत्तम चालविला. एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेलेल्या ९० टक्के शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी उत्तम साखर कारखाना चालवून दाखविला.
तीन वर्षांपूर्वी ऊसदराचे आंदोलन पेटले होते. शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले होते. आंदोलनामुळे साखरेचा हंगामही लांबत होता. अशा प्रसंगी अस्वस्थ होणारे सदाशिवराव मंडलिकच होते. त्यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना विश्वासात घेतले. प्रथम आपल्या कारखान्याचा दर निश्चित करून मान्य करवून घेतला आणि तो जाहीर केला. त्याप्रमाणे बहुतांश साखर कारखान्यांनी दर जाहीर केले आणि ऊस आंदोलनाची कोंडी फुटली.
२००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. ती योग्य पद्धतीने न नाकारता त्यांना अपमानित करण्यात आले. सदाशिवराव मंडलिक यांच्या अंगातच कोल्हापुरी बाणा होता. तो त्यांनी जागविला. उतारवयात संघर्ष करण्याची गरज होती का? असा सवाल करणाऱ्यांना चपराक दिली. कोल्हापूरने १९५२ नंतर दुसऱ्यांदा अपक्ष उमेदवाराला खासदार केले. वयाच्या ७६व्या वर्षी ‘अपक्ष खासदार’ म्हणून ते निवडून आले.
कोल्हापूरच्या जनतेने अनेक वेळा संघर्षाची भूमिका घेतली. दिग्गज नेत्यांशी संघर्ष केला; पण लढवय्या नेतृत्वाला बळही दिले. असे बळ आणि प्रेम सदाशिवराव मंडलिक यांना सातत्याने मिळत गेले. त्याचा वापर त्यांनी सातत्याने जनतेसाठीच केला. केंद्र सरकार असो की राज्य सरकार; आपण सत्ताधारी झालो की विरोधी पक्षाचे प्रतिनिधी आपली भूमिका मांडणारे पत्र राज्यकर्त्यांना पाठविणारच, त्याचा पाठपुरावा करणारच. राज्यकर्ते ऐकत नसतील तर ते पत्र प्रसारमाध्यमांना देऊन जनतेला अवगत करणार. आपली भूमिका मांडणार. ती लोकांना पटली की संघर्षाची तयारी सुरू करणार, अशी त्यांची कार्यपद्धती होती. त्यांनी सत्तेचा किंंवा संपत्तीचा बडेजाव कधी केला नाही. तो सतत मस्तीत जगणारा झुंजार नेताच होता. विधानसभा निवडणुकीचा संघर्ष असो, की लोकसभा निवडणुकीचा असो; त्यांना एकतर्फी लढत देताच आली नाही. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्याचे वर्णन ‘राजकीय विद्यापीठ’ असे केले जाते. त्याचे सर्व श्रेय सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकीय संघर्षाला जाते. त्यांच्या बहुतांश निवडणुका या हजार-दोन हजार मतांच्या फरकाने झाल्या आहेत. कारण प्रत्येकाचे घर अन् घर मताला पक्के असायचे. ते अनेक वर्षे पक्के असायचे. आजही याच्या सुरस कथा कागल तालुक्यातील लोक सांगतात.
सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच घडलेला नेतृत्वाच्या साखळीतील आणखी एक दुवा निखळला आहे. अशी माणसे घडणे आता होणे नाही. चार लोक घरी आल्यावर त्यांना दोन घास खाऊ घालण्याची ऐपत नसताना राजकारणात उडी घेऊन आठ-दहा निवडणुका लढवायच्या, जिंंकायच्या. सत्ताधाऱ्यांबरोबर संघर्ष करायचा, स्वपक्षाबरोबरही संघर्ष करायचा, या कोल्हापुरी परंपरेतील एक नेता आज हरपला आहे.