जयनंतर नामदेव आणि आता श्रीनिवासही...

By Admin | Updated: May 3, 2017 00:26 IST2017-05-03T00:26:27+5:302017-05-03T00:26:27+5:30

जय गेला, नामदेव हरवला आणि आता श्रीनिवासचेही प्रेत जमिनीत पुरलेले आढळले. महाराष्ट्राचे सरकार वाघांचा जीव राखू शकत नाही हे या तीन नामांकित व ताडोबाच्या व्याघ्र

Jainantra Namdev and now Srinivasa ... | जयनंतर नामदेव आणि आता श्रीनिवासही...

जयनंतर नामदेव आणि आता श्रीनिवासही...

जय गेला, नामदेव हरवला आणि आता श्रीनिवासचेही प्रेत जमिनीत पुरलेले आढळले. महाराष्ट्राचे सरकार वाघांचा जीव राखू शकत नाही हे या तीन नामांकित व ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकात लोकप्रिय झालेल्या दिमाखदार व देखण्या जिवांच्या हत्येतून देशाला कळले आहे. जय हा वाघ त्याची पूर्ण वाढ झालेला आणि पर्यटकांना ठरवून भेटावा तसा भेटणारा होता. त्याच्या चालीत राजाचा डौल होता आणि त्याचे दर्शन पाहणाऱ्याला नम्र करणारे होते. तो दिसेनासा झाला तेव्हा त्याच्या तपासाची फार नाटके वनखात्याने केली. त्यासाठी त्या विभागाचे अधिकारी सरकारी खर्चाने ठिकठिकाणी प्रवास करून आले. पुढे तो दिसल्याचे कधी सांगितले गेले तर कधी जो दिसला तो तोच होता किंवा नाही अशी शंका पुढे केली गेली. आता जयची चर्चा संपली आहे. नामदेव हा जयएवढाच दिमाखदार वाघही पर्यटकांच्या प्रेमाचा विषय होता. पाहणाऱ्यांनी काढलेली त्याची छायाचित्रे अनेक घरात आता लागली आहेत. तोही अलीकडेच बेपत्ता झाला आणि त्याचाही कुणाला आजवर पत्ता लागला नाही. नंतरची गोष्ट श्रीनिवासची. तो जयचाच बच्चा होता असे सांगितले जात होते. त्याचेही देखणेपण बापासारखेच ऐटदार होते. तो हरवला आणि त्याचे शवच मातीत पुरलेले परवा सापडले. गेल्या एक वर्षात दीड डझनाएवढे वाघ वा त्याची पिले अशी मारली गेली वा मेलेली आढळली. जगाच्या बाजारात जिवंत वा मृत वाघाची किंमत २० लाखांहून अधिक आहे. अनेक धनवंत शौकिनांना वाघ पाळायचे असतात तर काही चोरट्यांना त्यांचा बळी घेऊन त्यांचे अवयव चीनपर्यंतच्या बाजारात पोहचवायचे असतात. त्यातून एवढे बहुमोल जनावर साधे एन्ड्रीन पाजून मारता येते. वाघाने केलेल्या शिकारीच्या तुकड्यावर एन्ड्रीन नुसते टाकले तरी ते तुकडे पुन्हा खायला येणारे ते जनावर मरून पडते. जंगले लहान झाली आणि त्यावरचे माणसांचे अतिक्रमण वाढत चालले. एका वाघाला स्वतंत्रपणे जगायला किमान ५० चौ. कि.मी.चा अरण्य परिसर लागतो. तो त्यांना मिळत नाही. उन्हाळ्यात जंगलातले पाणी संपते. मग पाण्याच्या शोधात गावात येणारे अनेक वाघ अन् बिबटे विहिरीत पडून मेलेले आढळतात. सरकार हतबल आहे आणि वनखातेही दुबळे आहे. त्यांनी ठेवलेले वन्यजीवांचे रक्षकही त्यांच्यावर कुठपर्यंत लक्ष देतात, हाही विचारावा असा प्रश्न आहे. गळ्यात इलेक्ट्रॉनिक कॉलर अडकविलेले वाघ जमिनीत पुरलेले सापडत असतील तर ती यंत्रणाही निकामीच समजली पाहिजे. आताचा प्रश्न वाघ व अन्य वन्यजीव सांभाळायला जनतेची मदत घेण्याचा आहे. काही काळापूर्वी याविषयी भरलेल्या एका राष्ट्रीय परिषदेत तो उपस्थितही झाला होता. पण वनअधिकाऱ्यांच्या हट्टीपणापायी तो तसाच अपुरा राहिला. जे उद्योगपती व धनवंत वाघ पोसू शकतात त्यांना तसा परवाना आता देणे गरजेचे आहे. वाघासारखे जनावर पाण्यावाचून वा एन्ड्रीन पाजून मेलेले पाहण्याहून तसे करणे अधिक योग्य ठरणार आहे. शिवाय कुणाच्या बागेत वा खासगी व्यवस्थेत राहिल्याने वाघ त्याचा स्वभाव वा प्रवृत्ती बदलतही नाही. अस्वले पोसणारी माणसे देशात आहेत. अशा माणसांची छायाचित्र अनेक नियतकालिकांनी याआधी प्रकाशितही केली आहेत. अशा माणसांजवळची अस्वले वनखात्याने जप्त करताच ती मृत्यू पावल्याचेही प्रकाशित झाले आहे. राजस्थानात हरणांना व मोरांना घरात वाढविण्याची मुभा आहे. प्रकाश आमटे यांना वन्यजीवांचे चांगले पोषण केल्याबद्दल पद्म पुरस्कार दिला गेला आहे. मुंबईतील एका सिनेनटाकडे असलेले वाघ वनखात्याने जप्त करून नेले तेव्हा ते वाटेतच मरण पावल्याची कथा याविषयीच्या नोंदीत आहे. ज्या माणसांना वन्यप्राणी बाळगण्याचे परवाने दिले जावेत, त्यांच्यावर सरकारला कडक पाळत ठेवता येणेही शक्य आहे. त्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी कृत्रिम रेतनाचा उपायही करता येणारा आहे. जंगले संपली तर जंगलातले हे देखणे रहिवासी कुठे जाणार आणि कसे? त्यांच्याही पुनर्वसनाचा विचार आपण गंभीरपणे करायचा की नाही? डॉ. मनमोहनसिंग हे देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी वाघांच्या रक्षणाचा व त्यांच्या वाढीचा प्रश्न गंभीरपणे हाती घेऊन त्यासाठी एक यंत्रणाही उभी केली होती. ती सध्या काय करते? जी गोष्ट सरकारला करता येत नाही ती करायला खासगी यंत्रणा हाताशी धरण्याची सोय फक्त औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे काय? सरकारच्या अख्त्यारितील अनेक कामे व योजना खासगी यंत्रणांच्या स्वाधीन करण्याचा आताचा काळ आहे. या काळात वन्यजीवांचे रक्षण करण्याची जबाबदारीही या यंत्रणांवर वा व्यक्तींवर सोपविता येणे शक्य आहे. वन्यजीव ही देशाची शोभा आहे आणि वाघ वा सिंह हे त्याचे देखणे अलंकार आहे. ते जपायला सर्वतऱ्हेच्या सरकारी, खासगी वा स्वायत्त यंत्रणा कामाला लावणे ही आजची गरज आहे. नाही तर जयपाठोपाठ नामदेव जाणार आणि त्याच्यामागे श्रीनिवासही मातीत गाडलेला पाहावा लागणार. जबाबदारी मोठी आहे व म्हणूनच ती अनेकांनी एकत्र येऊन आपल्या खांद्यावर घेणे आवश्यक आहे.

Web Title: Jainantra Namdev and now Srinivasa ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.