येकाचे बोलणे येका नये

By Admin | Updated: November 5, 2016 05:06 IST2016-11-05T05:06:45+5:302016-11-05T05:06:45+5:30

आंध्रच्या घनदाट अरण्यानंतर दुर्गम जागी श्रीशैल्यगिरीचे ज्योतिर्लिंग आहे.

It's not new to talk about each other | येकाचे बोलणे येका नये

येकाचे बोलणे येका नये


आंध्रच्या घनदाट अरण्यानंतर दुर्गम जागी श्रीशैल्यगिरीचे ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्र आणि आंध्र, कर्नाटक, तेलंगणा यांना विभागणाऱ्या सीमा पैनगंगा आणि आदिलाबाद पार केल्यावर गावांच्या वेगळ्याच नावांनी जाणवतात. तळी तुडुंब भरलेल्या नद्या दुथडी हिरवी भातशेतं घेऊन वाहणाऱ्या, हैदराबादजवळील अजस्त्र खडक लक्ष वेधून घेतात.
श्रीशैल्यला संध्याकाळी सातला पोहोचलो. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी ५००-६०० लोकांची रांग ताटकळत होती. स्पेशल दर्शनाची तिकिटे काढली तेव्हा भाग्याने २००-३०० लोकांच्या रांगेत जागा मिळाली. बऱ्याच अवधीनंतर दर्शनापासून वंचित ठेवणाऱ्या, कपाळभर चंदनम् लावलेल्या पुजाऱ्यांचे कोंडाळे गाभाऱ्यात दिसले. बाजूचे दर्शनासाठीचे कठडे रिकामे दिसताच आमच्या टूरमधील काही चपळाईने तिकडे धावले मात्र पुजाऱ्यांचे कोंडाळे फुटले. त्यांच्या अगम्य भाषेत, हातवारे करत काहीतरी ते सांगू लागले. त्यांनी हाताने दाखवलेल्या बोर्डकडे आमचे गांगरलेले लोक बघायला लागले. रिकामे असणारे ते कठडे दर्शनासाठी एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त भरणाऱ्यांसाठी होते!
१०-२० वर्षापूर्वीच्या या आठवणी आहेत. गोवा पाहून परतताना कोल्हापूरला जाण्यासाठी बेळगाव बसस्टँडवर स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये बसलो. बसस्थानक अतिशय स्वच्छ व नीटनेटके होते. बस सुटायला थोडा अवधी असल्याच्या समजुतीने दोन-तीन प्रवासी चहासाठी तर दोन-चार मुले बिस्किटे-चॉकलेट यांचा खुराक घेण्यासाठी बसमधून खाली उतरली. तेवढ्यातच कंडक्टरने बस सुटण्याचा इशारा दिला. बसमधले आमच्या ग्रुपचे लोक ‘ते खाली राहिले’ म्हणून कलकलू लागले. ड्रायव्हर-कंडक्टर कानडीतून खेकसू लागले. शेवटी बाहेर पडण्याच्या गेटपाशी ‘त्या’ लोकांनी बस गाठली. एकमेकांची भाषा कळत नसल्याने असे गोंधळ होतात.
एकदा मात्र दिल्लीहून अमृतसरकडे जाताना गावाबाहेरच्या धाब्यावर थांबलो आणि ‘वाह् गुरुजी की खालसा!’ हा जयजयकार कानी आला. ट्रक्स, ट्रॅक्टर्स भरभरून पोलिसांची गरज नसणारी मिरवणूक शिस्तबद्धपणे, वाद्यांच्या गजरात आनंदपूरसाहिबकडे निघाली होती. पंजाब-हरयाणातून निघालेल्या दिंड्या आषाढी एकादशीला निघालेल्या पंढरपूर, यात्रेसारख्याच भासत होत्या. त्या दिंड्यांबरोबर आमच्या बसला प्रेमाने थांबवून साऱ्या प्रवाशांना प्रसादाच्या शिऱ्याचे द्रोण व सुगंधी सरबत देण्यात आले.
भाषा भिन्न, देवाची नामे-रूपे भिन्न पण माणुसकीचा, बंधुत्वाचा एकच ओघ आम्हा साऱ्यांमधून वाहात असतो. छोट्या छोट्या मुद्यावरून भडकून उठण्यापेक्षा साऱ्यांची मने संवादाने गुंफणारे त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारले तर किती बरे होईल!
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे

Web Title: It's not new to talk about each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.