एव्हियातार डेव्हिड हा इस्रायलचा एक तरुण नागरिक. वय फक्त २४ वर्षे. कुटुंबासमवेत हसतखेळत त्याचे दिवस चालले होते. अतिशय आनंदी तरुण. त्याची तब्येतही चांगली कसलेली होती. नुकताच त्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. त्यात तो ओळखू येणार नाही इतका बारीक झाला आहे. हाडांची अक्षरशः कार्ड झाली आहेत. त्याच्या शरीरावर मांस कमी आणि हाडांचा सापळा फक्त दिसतो आहे.
या व्हिडीओत डेव्हिड त्याच्या अशक्त हातांनी एका अरुंद बोगद्यात एक खड्डा खोदताना तो दिसतो आहे. ही आहे त्याची कबर। आपल्या स्वतःच्याच हातानं तो आपली कबर खोदताना दिसतो आहे. व्हिडीओमध्ये रोम ब्रास्लास्की हा आणखी एक इस्रायली युवक दिसतो आहे. तोही केवळ २१ वर्षाचा. अत्यंत अशक्त, आजारी आणि भावविवश. या दोघांच्याही चेहऱ्यावर उपासमारीचे व्रण आहेत आणि आवाजात एक अनामिक भीती आहे. हे दोघेही इस्रायली सरकारला आपल्या सुटकेसाठी विनवणी करत आहेत. अगतिकपणे ते म्हणताहेत.. आमचा मृत्यू आता अतिशय जवळ आला आहे. आमचे फार दिवस राहिलेले नाहीत. सोबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना 'शिव्यांची लाखोली'ही ते वाहताहेत. त्याचं म्हणणं आहे, आमची आज जी काही अवस्था आहे, त्याला केवळ नेतन्याहू हेच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही मरणपंथाला लागलो आहोत..
इस्रायलचे हे दोन्ही युवक म्हणजे हमासनं ठेवलेले ओलिस आहेत. हा हृदयद्रावक व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर इस्रायलमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इस्रायली जनतेचं काळीज या व्हिडीओनं पिळवटून टाकलं आहे. हमासबरोबरचं युद्ध तातडीनं थांबवावं आणि ओलिसांची तातडीनं सुटका करावी, अशी मागणी इस्रायलमध्ये पुन्हा जोर धरू लागली आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दोन्ही युवकांचे पालक अतिशय हवालदिल झाले आहेत. त्यांच्या डोळ्यांतील अश्रूच्या धारा थांबायला तयार नाहीत. रोम ब्रास्लाव्स्कीचे वडील, ओफिर ब्रास्लाव्स्की अश्रूभरल्या डोळ्यांनी सांगतात, आत्ताच मी माझ्या मुलाचा व्हिडीओ पाहिला, पण माझा विश्वासच बसत नाहीए की हा माझाच मुलगा आहे. तो भुकेनं विव्हळतना दिसतो आहे, तहानेनं व्याकूळ आहे, त्याला औषध नाही, निवारा नाही. त्याचं शरीर अक्षरशः अस्थिपंजर झालं आहे, त्याचं मनही स्थिर नाही. तो भ्रमिष्ट झाल्यासारखा वाटतो आहे. तो आता संपल्यातच जमा आहे.. खूप झालं आता. कृपया हे युद्ध थांबवा आणि आमची मुलं परत आणा...
हमासनं ज्यांना ओलिस ठेवलं होतं, त्यातील काहीजणांना त्यांनी परत पाठवलं आहे, तर काहीजणांना ठार मारलं आहे. इस्रायली सरकारच्या माहितीनुसार, सध्या अजूनही सुमारे २० इस्रायली पुरुष बंधक जिवंत आहेत आणि सुमारे ३० बंधकांचे मृतदेह हमासकडे आहेत, जे परत मिळवता आलेले नाहीत.
गेल्यावर्षी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलच्या दक्षिण भागात हमासच्या लढवय्यांनी अचानक हल्ला केला होता. त्यात सुमारे १२०० लोक मारले गेले आणि अनेकांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यातच एव्हियातार डेविड आणि रोम ब्रास्लास्की यांचाही समावेश होता. तेव्हापासून ते दोघंही हमासच्या ताब्यात असून, गाझामध्ये कैदेत आहेत.