विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा इस्लाम
By Admin | Updated: July 18, 2015 03:37 IST2015-07-18T03:37:34+5:302015-07-18T03:37:34+5:30
इस्लाम पूर्वकाळात अरबस्तानात अनेक टोळ्या होत्या. त्यांच्या आपापसात लढाया होत असत. मक्का शहर मोठे व्यापारी केंद्र होते. विलासीतेचा तेथे पूर आला होता.

विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा इस्लाम
-दिलीप श्रीधर भट
(ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक)
इस्लाम पूर्वकाळात अरबस्तानात अनेक टोळ्या होत्या. त्यांच्या आपापसात लढाया होत असत. मक्का शहर मोठे व्यापारी केंद्र होते. विलासीतेचा तेथे पूर आला होता. अशा परिस्थितीत मुहम्मद हजरत पैगंबरांचा जन्म झाला. स्तवनीय मुहम्मद पैगंबराचे लग्न झाल्यानंतर साधारण १५ वर्ष त्यांच्यावरती वेगवेगळी संकटे आली. वरून शांत दिसणारे आदरणीय मुहम्मद आतून अत्यंत अशांत होते. जाती जातीत भांडणे, पिढ्यानपिढ्या चालणारी वैरे, न संपणारे रक्तपात, अनीती बोकाळलेली, सर्वत्र अज्ञान, ईश्वराच्या नावाने भांडणारे नाना पंथ, अशी स्थिती होती.
पवित्र प्रकाशपर्वत (कोहेतूर) मुहम्मद साहेबांचा आवडता पहाड. त्यात झाड नाही, पाणी नाही. अशा पर्वताच्या गुहेमध्ये (हिरा-गुहेचे नाव) ते जात व ध्यान करत. तेथूनच त्यांना ईश्वरी संदेश मिळत गेले आणि ‘तू हे संदेश लोकांपर्यंत पोहोचव. तू माझा संदेशवाहक (पैगंबर) आहेस’ अशी ईश्वरीय आज्ञा त्यांना झाली. या संदेशांचे एकत्रीकरण म्हणजेच ‘पवित्र कुर-आन’ होय. ‘पवित्र कुर-आन’ हे तीस भागात (पारा) आहे. प्रत्येक पारामध्ये वेगवेगळे संदेश अनेक विषयांवर आहेत. हे सर्व ईश्वरी संदेश, वचन, आज्ञा ३० भागात ‘पवित्र कुर-आन’मध्ये आले आहेत.
ईश्वराचे आदेश पृथ्वीतलावर अवतरले. स्तवनीय मुहम्मद पैगंबर रमजानच्या महिन्यात गुहेत ध्यानात बसले असता त्यांना पहिली ईश्वरीय आज्ञा आली व ती म्हणजे ‘वाच’ आणि ती एका शिलेवरती कोरली गेली. नभोवाणीने ईश्वरीय वचन, आज्ञा येत, पैगंबर साहेब त्या मुखोद्गत करीत आणि गावात जाऊन सांगत. गावातील ज्याला लिहिता वाचता येत असे तो, त्या लिहून ठेवत असे. असे संदेश १३ वर्षे आले व तेराव्या वर्षीच्या रमजान महिन्यात ते संपूर्ण झाले आणि पवित्र कुर-आन लिखित रूपात परिपूर्ण झाले. हे आदेश केवळ धार्मिक नसून दैनंदिन जीवनात, व्यवहारात वर्तन कसे असावे याचा एक वस्तुपाठ आहे. अल्लाह सर्वसाक्षी असल्यामुळे कोणतेही वाईट काम करताना त्यांचे भय असावे. कारण अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाह अपराध्याला उचित असा दंड देईल हे पक्के ध्यानात ठेवावे.
इस्लामपूर्व काळात महिलेला सामाजिक अथवा कौटुंबिक असा दर्जा नव्हता. तो तिला इस्लामने दिला. मुस्लीम कन्या जन्मल्याबरोबरच तिला वारसाचा अधिकार प्राप्त होतो. स्वतंत्र भारतात हिंदू महिलेला हिंदू कोड बिल संमत झाल्यावर तो मिळाला. इस्लाममध्ये महिलेला फार मोठ्या आदराचे स्थान आहे. पैगंबर साहेबांना स्वर्ग कुठे आहे असा प्रश्न परत-परत तीनदा विचारण्यात आला असता तीनही वेळेस, तुझ्या आईच्या पायाखाली आहे असे उत्तर मिळाले. पैगंबर साहेब स्वत: त्यांची मुलगी त्यांना भेटायला आली असता तिच्याशी उभे राहून बोलत असत. इस्लाममध्ये पुरुषाला चार विवाह करण्याची अनुमती आहे, पण तशी आज्ञा नाही हे ध्यानात घ्यावे. इस्लाममध्ये घटस्फोट, तलाक होणे किंवा देणे ही अत्यंत निंदनीय घटना गणली गेली आहे. वैवाहिक जीवन जगणे असंभव झाले तरच तलाक देण्याची परवानगी आहे. मुस्लीम महिलाही तिच्या नवऱ्याला घटस्फोट देऊ शकते. त्यास खुला म्हणतात. खुला झाल्यावर तीन महिन्यानंतर (इद्दत) पूर्ण झाल्यावरच ती दुसरे लग्न करू शकते. पण लग्नात ठरलेला मेहर व तिला मिळालेल्या भेटवस्तूंवरचा तिचा हक्क, अधिकार जातो. खुला झाल्यावरती पतीपासून झालेल मुलाबाळांचा संपूर्ण खर्चपण तिला करावा लागतो. या कारणामुळे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसलेली महिला सहसा खुला मागत नाही.
इस्लाममध्ये दारू पिणे हे महापाप आहे. तितकेच महापाप दारू तयार करणे, विक्री करणे, भट्टीसाठी, गोदामासाठी जागा भाड्याने देणे, एवढेच नव्हे तर दारूच्या व्यवसायात कमाई करणाऱ्याकडे पाणी पिणे पण हराम समजले जाते. व्यापार, उद्योग करताना २० टक्क्यांपर्यत नफा घेण्याची परवानगी असली तरी व्याज घेऊन कर्ज देणे किंवा घेणे यास सक्त मनाई आहे. कारण कर्जबाजारी लोक कर्जावरील व्याजापोटी देशोधडीला लागतात. आत्महत्त्या करतात. पवित्र रमजान महिन्यामध्ये रोजे (उपवास) ठेवण्याची आज्ञा आहे. सूर्योदयाच्या साधारण दोन तास आधी ते सूर्यास्त होईपर्यंत हे उपवास करायचे असतात. या कालावधीत निर्जली उपवास करायचा असतो. मात्र आजारी, वृद्ध व्यक्ती, गर्भवती तसेच शिशुला दूध पाजणाऱ्या महिला, बालके यांना रोजे न ठेवण्याची मुभा आहे.
इस्लाममध्ये विश्वबंधुत्वाची शिकवण आहे, पण ती आता फक्त ग्रंथात (पवित्र कुरआनमध्ये) राहिली असून प्रत्यक्षात आढळत नाही. मुसलमान या शिकवणुकीचे आचरण करीत नाहीत. युद्धे झाली व होत आहेत. इस्लाममध्ये जातीभेद नसला तरी मुसलमानांमध्ये आहे. इस्लाममध्ये मृत्युनंतर दफन करतात. त्याच्यावर एक मातीचा ढिगारा असतो. सर्वोत्तम कबर जमिनीच्या पातळीवरती होणारी (जमीबोस्त) असते. कबरीवरती कोणत्याही प्रकारचे बांधकाम थडगं किंवा दर्गा बांधण्यास मनाई आहे. महम्मद पैगंबरांची कबर साधी जमीन असून, तिच्याभोवती केवळ कुंपण आहे आणि चारही बाजूला भिंती असून, वर घुमट आहे, हे ध्यानात घ्यावे. कबर बांधणे, थडगे उभारणे, दर्गा उभारणे, मजार करणे इत्यादी प्रकार हा हिंदूंच्या प्रतिमापूजेचा एक वेगळा प्रकार आहे. असे मजार दर्गा हिंदुस्थान, बांगलादेश, पाकिस्तान, इराण, इराक इत्यादी देशात आहेत.
पैगंबर साहेबांच्या जीवनात अनेक अडचणीचे प्रसंग आले, त्यांच्यावर आघात झाले. अशा प्रसंगांवर त्यांनी कशी मात केली व त्यावेळी त्यांचे वर्तन व विचार कसे होते, यासंबंधीच्या प्रसंगांचे, आठवणींचे सार संकलन त्यांच्या मृत्युनंतर ‘हदीस’ या ग्रंथात करण्यात आले. या ग्रंथाने मुसलमान बांधवांना रोजच्या व्यवहारात प्रसंगी कसे वागावे ह्याचे मार्गदर्शन, शंका, समाधान होते.
पवित्र कुरआनमध्ये अत्यंत उत्तम अशा मानवी जीवनाला मार्गदर्शक आज्ञा आणि वचने आहेत, पण त्यानुसार वागणारे लोक दिसत नाही. कुराणातील वचनानुसार वागणारी माझ्या माहितीतील एकमेव मुस्लीम व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायक (मरहूम) मुहम्मद रफी साहेब हे होत. त्यांना रमजान महिन्यातील सर्वात पवित्र (३१ जुलै १९८०) अशा सत्ताविसाव्या तारखेस मरण आले. ते अत्यंत निष्पाप निरागस होते. अशी व्यक्ती लाखात करोडोत एखादीच असते.