पैसे असतील तरच खेळात ‘करिअर’, हे खरे आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 07:19 IST2025-03-03T07:17:56+5:302025-03-03T07:19:25+5:30

बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद यांचा ‘सल्ला’ सध्या चर्चेत आहे. खेळात ‘करिअर’ करण्याचे ठरवताना नेमकी दिशा कोणती असते, असली पाहिजे; याची चर्चा! 

is it true that a career in sports is only possible if you have money | पैसे असतील तरच खेळात ‘करिअर’, हे खरे आहे का?

पैसे असतील तरच खेळात ‘करिअर’, हे खरे आहे का?

सुमा शिरूर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या नेमबाजी प्रशिक्षक (शब्दांकन : रोहित नाईक)

घरची आर्थिक बाजू भरभक्कम असेल, तरच मुलांनी खेळाला आपले ‘करिअर’ म्हणून निवडण्याचा विचार करावा. कारण खेळात करिअर हे प्रकरण फार महागडे असते, अशा आशयाचा सल्ला ख्यातनाम बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पुलैला गोपीचंद यांनी अलीकडेच दिला आणि त्यावरून सुरू झालेली चर्चा बरीच रंगली. हा विषय आपल्याकडे फार गुंतागुंतीचा बनला आहे, हे खरेच. कारण यशस्वी खेळाडूंच्या सतत प्रसिद्ध होणाऱ्या ‘यशोगाथां’मुळे खेळाकडे वळू पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि अपेक्षित ‘व्यावसायिक’ यश मिळण्याच्या शक्यता त्याच पटीत धूसरही होत चाललेल्या दिसतात.

खेळांमध्ये करिअर घडविण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत हे खरे, पण माझ्या मते कुणीही ठरवून क्रीडा क्षेत्र नाही निवडू शकत. सर्वप्रथम आवड म्हणूनच खेळले पाहिजे. खेळता खेळता कौशल्यांमध्ये सुधारणा होते आणि त्यानंतर कारकीर्दीला किती लांबची दिशा मिळणार हे ठरते, ठरू शकते. एक आवड म्हणून खेळायला सुरुवात करताना शैक्षणिक बाजूनेही भक्कम समतोल राखला गेला पाहिजे.

केवळ खेळच नाही, तर कोणतीही कला आत्मसात करत असताना प्रत्येकाला हळूहळू जाणीव होते की, यामध्ये आपण किती दूरवर जाऊ शकतो, आपला दमसास किती आहे! खेळांमधील करिअरला आपोआप आकार येत जातो. अर्थात यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाही. मुळात खेळ आनंदासाठी खेळला गेला पाहिजे. खेळता खेळता कौशल्यांचा विकास होत जाईल, तितके अधिक पर्याय खुले होतील. मुलांसाठी महत्त्वाचे म्हणजे, अभ्यास आणि खेळ यामध्ये योग्य ताळमेळ साधला गेलाच पाहिजे.

अमेरिकेमध्ये प्रमुख ऑलिम्पिक खेळ विद्यापीठांमार्फत खेळवले जातात. तिथूनच अमेरिकेचे ऑलिम्पियन खेळाडू घडतात. त्यांना सर्व सोयीसुविधा विद्यापीठांमार्फतच मिळतात. तिथे असलेली व्यवस्था आपल्याकडेही रुजवली गेली पाहिजे. याच अर्थ असा नाही की, अभ्यास वगैरे सोडून सर्व वेळ खेळांनाच दिला गेला पाहिजे. ही मानसिकताच चुकीची असून, यामुळे अनेकांची चुकीच्या दिशेने वाटचाल होते आहे. कोणता खेळ कुणाला किती उंचीवर घेऊन जाणार, हे कोणीच ठरवू शकत नाही. गोपीचंद म्हणतात, त्याप्रमाणे खेळात व्यावसायिक कारकीर्द करायची मनीषा असेल, तर आर्थिक आधाराची गरज असतेच असते. तुम्ही घरचे श्रीमंत असा किंवा गरीब, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आयुष्यात काहीतरी कौशल्य असणे गरजेचे आहे. खेळामध्ये एखादा उत्तम टप्पा गाठल्यावर मिळू शकणारी नोकरी हा एक आधार गृहित धरता येऊ शकतो.  

खेळात करिअर करायचे म्हणजे खेळाडूच बनले पाहिजे, हा परंपरागत दृष्टिकोन पूर्ण चुकीचा आहे. खेळ म्हणजे केवळ खेळाडूच नसतात. प्रशिक्षक, पंच, स्कोअरर, फिजिओ अशा विविध भूमिका खेळांमध्ये महत्त्वाच्या असतात. एक खेळाडू म्हणून प्रत्येकाच्या मर्यादा असतात. त्या मर्यादा ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. या मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर खेळाडू इतर भूमिकांद्वारे स्वत:ला त्या-त्या खेळाशी जोडून ठेवू शकतो. यातूनही करिअर घडवता येते. 

सर्वात महत्त्वाचे, पालकांना जागे करणे! प्रत्येक पालकाच्या आपल्या मुलाकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्यात अपेक्षित निकाल आले नाहीत, तर ते यासाठी प्रशिक्षकांना जबाबदार धरतात. पण, आपल्या मुलामध्ये किती क्षमता आहे, हे कालांतराने क्रीडांगणावरच ठरणार असते. त्यामुळे आपले मूल खेळामध्ये करिअर करणार म्हणजे करणारच हा अनाठायी हट्ट पालकांनी सर्वप्रथम मनातून काढून टाकावा. पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्व गोष्टींचा ताळमेळ साधत वाटचाल करावी. यानंतरच खरी वाटचाल सुरू होते. मी देखील खेळातच करिअर करायचे म्हणून नेमबाजीकडे वळले नव्हते. त्यासोबत माझे शिक्षणही सुरू होते. मी केमिस्ट्रीमध्ये पदवी मिळवली. त्यामुळे खेळातून काम नाही मिळाले, तर पर्यायी मार्ग माझ्याकडे तयार होता.  योगायोगाने मला रेल्वेद्वारे नोकरी मिळाली आणि खेळाद्वारे माझे करिअरही घडले... हे नकळत झाले.  खेळामध्ये आवड असावी, मेहनतीची तयारी असावी, पर्याय तयार ठेवावेत... त्यातूनच मार्ग तयार होत जातो. 
 

Web Title: is it true that a career in sports is only possible if you have money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton