इराणशी अणुकरार : जगाची साशंक नजर
By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:35+5:302015-07-25T01:14:35+5:30
जगातील सहा महाशक्तींनी मंगळवारी इराणशी केलेल्या आण्विक करारावर टीका होत असतानाच राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे

इराणशी अणुकरार : जगाची साशंक नजर
जगातील सहा महाशक्तींनी मंगळवारी इराणशी केलेल्या आण्विक करारावर टीका होत असतानाच राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आपण कूटनीतीच्या मार्गाने इराणशी समेट घडवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते जगात शांतता राखण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे. इराणसोबत करार झाला नसता तर मध्यपूर्वेत युद्धाची अधिक शक्यता होती. हा धोका लक्षात घेऊन मित्रराष्ट्रांनी इराणसोबत करार करण्यावर सहमती झाली. दुसरीकडे इस्रायलसह अनेक देशांच्या नेत्यांनी इराणसोबतच्या करारावर टीका केली. अशा प्रकारे करार करण्याचा पर्याय निवडणे चुकीचे होते, अशी प्रतिक्रि या अनेक देशांनी दिली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेत वादंग माजलेले असतानाच इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. आता जग इराणला जगासाठी धोकादायक मानत नाही. आण्विक ऊर्जेच्या पेचातून बाहेर पडून विकास करू शकेल. हा करार इराणसाठी कायदेशीर, तांत्रिक आणि राजकीय पातळीवरील मोठा विजय आहे, असे रुहानी यांनी म्हटले आहे. लॉस एन्जेलिस टाइम्सने याबद्दल मॅक्स बूट या विख्यात स्तंभलेखकांचा एक लेख प्रसिद्ध केलेला आहे. त्यात बूट यांनी इराणची तुलना लिबिया आणि उत्तर कोरिया या दोन देशांशी केली आहे. अमेरिकेला या दोन देशांच्या बाबतीत दोन वेगळे अनुभव आले आहेत. २००३ मध्ये बऱ्याच गुप्त वाटाघाटीनंतर अमेरिकेचा लिबियाशी करार झाला होता. या करारानुसार लिबियाने आण्विक शस्त्रे तयार करण्यासाठी उपयोगी ठरू शकणारी अनेक महत्त्वाची हत्यारे व उपकरणे नष्ट करायची होती. लिबियाने ती तशी नष्ट केलीदेखील. तथापि या संदर्भातला उत्तर कोरियाचा अनुभव चांगला नव्हता याची आठवण लॉस एन्जेलिस टाइम्सने करून दिलेली आहे. इराण म्हणजे लिबिया नव्हे असे सांगून जगणे याबाबत काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे हे लॉस एन्जेलिस टाइम्सने बजावलेले आहे. याच वृत्तपत्राने या विषयाच्या संदर्भात सॅम्युएल क्लेनिअर आणि टॉम एल्लेनार यांचा एक लेख प्रकाशित केला आहे. ‘रिपब्लिकन्सचा म्युनिक (सारखा) भ्रम’ या लेखात हिटलरशी चेम्बरलेन यांनी केलेल्या म्युनिक कराराची आठवण करून देऊन त्यावेळी चेम्बरलेन व इतर ‘शांतताप्रेमींची’ जशी फसगत झालेली होती तशीच यावेळी होत आहे असा इशारा देण्यात आला आहे. एकापाठोपाठ सवलती देऊन तेहरान मधल्या मुल्लामौलवींना खुश करण्याचा ओबामांचा हा एक चुकीचा प्रयत्न आहे अशा शब्दात या निर्णयावर माजी राजदूत जॉन बोल्टन यांनी टीका केली आहे. इराणबरोबरच्या या कराराच्या विरोधात अमेरिकेत एक मोठा वर्ग आहे. यात जनमत ‘तयार करण्यासाठी’ प्रसिद्धी आणि प्रचाराचे अनेक हातखंडे वापरले जात आहेत. यूएस टुडेने ओरन डॉवेल यांचा याबाबतचा एक विस्तृत वृतांत दिलेला आहे. इराणच्या करारावरून मोठ्या प्रमाणावर पैसा आणि जाहिरातींचे युद्ध सुरू होत आहे अशा शीर्षकाखालच्या वृत्तांतात या कराराला विरोध करणाऱ्या गटातल्या अमेरिकन इस्रायली पब्लिक अफेअर्स कमिटी, सिटिझन्स फॉर न्युक्लिअर फ्री इराक यासारख्या संघटना कराराच्या विरोधातल्या प्रचारासाठी मोठा खर्च करणार असल्याचे त्यात म्हटले आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत रिपब्लिकन्सचा वरचष्मा असून, बहुसंख्य सदस्यांचा या कराराला विरोध असून, काहीही झाले तरी या कराराला मान्यता देण्याचा ठराव तिथे हाणून पाडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असे प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष बोहेनर यांचे निवेदन फॉक्स न्यूज तसेच न्यूजवीक वगैरेंनी दिले आहे. या कराराला विरोध करणाऱ्या हजारो लोकांनी न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये कराराच्या विरोधात निदर्शने केल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे. तसेच पोस्टने स्वत:च अशीही मागणी केलेली आहे की हा करार करताना इराणने पकडून ठेवलेल्या अमेरिकन व इतर पत्रकारांची सुटका करण्याची मागणी केली जावी. इस्रायलचा या कराराला विरोध असणार हे उघड आहे. बेन्जामिन नेतनयाहू यांनी तर ह्या कराराला कोणत्याही स्वरूपात विरोधच केलेला आहे आणि अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेतही तो फेटाळला जावा असाच त्यांचा प्रयत्न राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी कराराच्या समर्थनात जे सांगितले जाते आहे तसेच उत्तर कोरियाशी करार करतानासुद्धा सांगितले गेले होते असा सूर त्यांनी लावल्याचे अरु त्झ शेवा आणि द ब्लेझ यासारख्या इंग्रजी इस्रायली वृत्तपत्रातून वाचायला मिळते आहे. इंग्लंडच्या द टाइम्समधल्या आपल्या लेखात मेलॅनी फिलिप्स या स्तंभलेखिकेनेही काहीसा असाच नकारात्मक सूर लावलेला दिसतो आहे. या आठवड्यात अतर्क्य असणारी घटना घडते आहे... असे सांगत इराण बरोबरचा अणुकरार म्हणजे ओबामांनी इराणसमोर गुडघे टेकण्याचाच प्रकार आहे अशा शब्दात विचार मांडले आहेत. नेतनयाहू यांच्या विरोधाकडे फारसे लक्ष न देण्याचे ओबामा यांचे धोरण जरी योग्य असले तरी त्यांच्याकडे साफ दुर्लक्षही करून चालणार नाही असे बजावून नेतनयाहू मांडत असलेल्या शंका आणि त्यांनी व्यक्त केलेली भीती अगदीच दुर्लक्ष करता येण्यासारख्या नाहीत असेही इकॉनॉमिस्टने सांगितले आहे. आपल्या रमझानच्या संदेशात इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयतुल्ला खामेनाई यांनी मात्र इराणची जुनीच भाषा वापरल्यामुळे या कराराबद्दलच्या शंका वाढायला मदतच झाली आहे. तेहरान टाइम्सने या घटनेची बातमी देताना आयतुल्लांच्या भाषणाची सविस्तर माहिती दिलेली आहे. हिंसाचाराला आणि बालांसह इतरांच्या निर्घृण हत्त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेची आपली धोरणे इराण बदलणार नाही अशी स्पष्ट घोषणा त्यांनी केलेली आहे. अमेरिकेशी कोणताही द्विपक्षीय किंवा जागतिक वा अन्य विषयांवर चर्चा किंवा समझोता केला
जाणार नाही अशी स्पष्ट घोषणा किंवा आपल्या अणू कार्यक्र मात इराण कोणताही बदल करणार नाही असे इराणचे अध्यक्ष रुहानी यांनी बजावले आहे. त्यामुळेच
या कराराचे भवितव्य आणि तो झालाच
तर त्यामुळे जगात निर्माण होणारी
स्थिती याबद्दल सध्या साशंकतेचे वातावरण आहे. आर्थिक हितसंबंधांसाठी इराणशी करार करणाऱ्या अमेरिकेकडे पाहण्याची ही साशंक नजर या कार्टूनने चपखलपणाने दाखवलेली आहे.