IPL 2020: ‘आयपीएल मेरी मुठ्ठी में’; मुंबई इंडियन्सचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 01:46 AM2020-11-13T01:46:58+5:302020-11-13T06:56:42+5:30

मुंबईच्या गोलंदाजीत प्रचंड असं वैविध्य आहे.

IPL 2020: ‘IPL in my hand’; Mumbai Indians beat | IPL 2020: ‘आयपीएल मेरी मुठ्ठी में’; मुंबई इंडियन्सचा दणका

IPL 2020: ‘आयपीएल मेरी मुठ्ठी में’; मुंबई इंडियन्सचा दणका

Next

- द्वारकानाथ संझगिरी

मुंबई इंडियन्सने अपेक्षेप्रमाणे पाचव्यांदा आयपीएल जिंकली. दिल्लीने तेजस्वी यादव व्हावं अशी किमान अपेक्षा होती. पण तसं काही घडलं नाही. मुंबई संघ जिंकला नसता तर मला प्रचंड धक्का बसला असता. कंगना शहाण्यासारखी बोलल्यावर बसेल तसा. या स्पर्धेतला तो सर्वोत्कृष्ट संघ होता. ‘आयपीएल मेरी मुठ्ठी में’ म्हणावं इतकी त्याची यंदाची हैसीयत होती. चांगल्या संघाचा कस हा कठीण परिस्थितीतच लागतो. मुंबई संघ तेल लावलेल्या पहिलवानासारखा वारंवार कठीण परिस्थितीतून निसटला.

मुंबईचा संघ हा अकराव्या मजल्यावर टेरेस फ्लॅटचा रहिवासी होता तर दिल्लीचा संघ हा सातव्या मजल्यावरचा. मधले सगळे मजले रिकामे होते. मुंबईच्या या उंचीचं कारण हा अत्यंत समतोल होता. आयपीएलमध्ये संघ कसा असावा, याचं मूर्तिमंत उदाहरण ! आधी फलंदाजी- रोहित, डीकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, पोलार्ड, कुणाल पंड्या आणि कुल्टरनाइल. यातला प्रत्येक फलंदाज अत्यंत हुकमीपणे मोठे फटके खेळू शकतो. रोहित, सूर्यकुमार, किशन, डीकॉक यांची फलंदाजी सुसंस्कृतपणाच्या साजूक तुपात घोळलेली आहे. त्यांना टी-२०चे कपडे फिट बसतात, ही त्यांची गुणवत्ता आहे.

हार्दिक पंड्या, पोलार्ड हे  षटकार ठोकतात तेव्हा ते मला घटोत्कच वाटतात. ते मायावी युद्ध तर खेळत नाहीयेत ना, अशी शंका येते.  शेवटच्या तीन षटकांत वगैरे ५०, ६० धावा घेणं हे त्यांच्यासाठी कधीकधी हातचा मळ आहे, असं वाटतं. त्यापेक्षा  त्यांना ताडगोळा सोलणं जास्त कठीण जाईल. मुंबईच्या गोलंदाजीत प्रचंड असं वैविध्य आहे. डावखुरा आणि उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज, लेग स्पिनर, ऑफ स्पिनर, मध्यमगती असे सगळ्या प्रकारचे गोलंदाज मुंबई संघात आहेत.  त्यात  मुंबईला दिल्लीने बोल्ट दिला.  एखादा संघ आपल्याला नको असलेला खेळाडू दुसऱ्या संघाला विकू शकतो. त्यावर मालक पैसे कमावतात.  दिल्लीने  बोल्टला घटस्फोट दिला. मुंबईने लग्न केलं. या बोल्टने मुंबईला वारंवार जिंकून दिलं.  आखातातल्या वातावरणात त्याने धमाल उडवून दिली. मुंबई संघ बोल्टवरच गुजराण करतो असं नाही. त्यांच्याकडे चक्क बुमराह आहे. म्हणजे द्रौपदीची थाळीच. विकेट हवीय?- ही घे. इतकं सोपं काम असतं त्याचं. त्याची चार षटकं कशीही वाटा, त्याचं ताट विकेटने भरलेलं असायचं. अंतिम सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाताना त्याला दृष्ट लागू नये म्हणून नियतीने  लावलेली तीट असावी ही. रोहित शर्मा हा चांगला कर्णधार आहे.

मुंबई त्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा जिंकली यातच प्रशस्तिपत्र लिहिलेलं आहे. तो मैदानावर शो ऑफ करत नाही. पण गरज पडेल तेव्हा आक्रमक क्षेत्ररचना, गोलंदाजीमधला एखादा अफलातून बदल यातून आपलं नेतृत्व दाखवतो. आयपीएलच्या फायनलमध्ये रोहितने आपण फिट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याने फॉर्मात यायलासुद्धा अंतिम सामन्याचा मुहूर्त गाठला. रोहितला निवड समिती आणि विराटला दाखवून द्यायचं होतं की तो फिट तर आहेच, शिवाय धावा अजूनही त्याच्या बॅटवर प्रेम करतात. पहिल्याच षटकामध्ये त्याने अश्विनला पुढे सरसावत सरळ षटकार ठोकला.

योग्यवेळी ज्वालामुखी जागा झाला. रोहितला असा सूर लागला की तो बाद होईपर्यंत एकदाही बेसूर झाला नाही. गंमत म्हणजे फिरकी गोलंदाजांना  काही वेळेला तो फॉरवर्ड डिफेन्सिव शॉट्स खेळला. कदाचित आपला फॉरवर्ड बचाव हा आपण विसरलेलो नाही ना? याची त्याला खात्री करून घ्यायची असावी ! पण ज्याक्षणी त्याला हवेत चेंडू किंचित जास्त वेळ दिसला त्यावेळेला पुढे सरसावत त्याने थेट षटकार चढवले. अंतिम सामन्यात मुंबई कधीच अडचणीत नव्हती. तो बाद झाल्यावर तर नव्हतीच नव्हती. जी गोष्ट रोहितला जमली, ती आयआयपीएलमध्ये विराटला नाही जमली. किमान टी-२० आणि वनडेत, रोहितने नेतृत्वासाठी आव्हान उभं केलंय का?
...नको, उगीच आगीत तेल कशाला टाकूया?

Web Title: IPL 2020: ‘IPL in my hand’; Mumbai Indians beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.