असहिष्णुतेचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 04:12 IST2016-10-25T04:12:52+5:302016-10-25T04:12:52+5:30

आता रतन टाटादेखील तेच बोलले आहेत, तेव्हां त्यांनाही देशद्रोहांच्या पंक्तीत नेऊन बसवायचे की काय? ्नत्यांच्यासारखा देशातील एक यशस्वी उद्योगपती आणि देशाच्या औद्योगिक

Intolerance dispute | असहिष्णुतेचा वाद

असहिष्णुतेचा वाद

आता रतन टाटादेखील तेच बोलले आहेत, तेव्हां त्यांनाही देशद्रोहांच्या पंक्तीत नेऊन बसवायचे की काय? ्नत्यांच्यासारखा देशातील एक यशस्वी उद्योगपती आणि देशाच्या औद्योगिक प्रगतीला विशिष्ट दिशा मिळवून देणाऱ्या उद्योग समूहाचा अत्यंत नेमस्त असा वारससुद्धा जेव्हां देशातील वाढत्या असहिष्णुतेविषयी जाहीर चिंता व्यक्त करतो, तेव्हां त्याची तरी संबंधित लोक गंभीर दखल घेणार आहेत का हाच खरा प्रश्न आहे. ग्वाल्हेर येथील ‘सिंदीया स्कूल’च्या वर्धापन-दिन सोहळ्यात आधी ज्योतिरादित्य शिंदे यांनी वाढत्या असहिष्णुतेचा विषय छेडला आणि नंतर रतन टाटा यांनी त्यांची री ओढली. पण केवळ तितकेच झाले नाही. समारंभानंतर पत्रकारांनी टाटांना छेडले असता त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ही असहिष्णुता कोठून येते हे सारेच जाणतात असे सूचक उद्गार काढून समाजात साऱ्यांनी एकोप्याने राहाण्याची गरज असताना, गोळ्या घालून लोकांना ठार मारले जाते, त्यांना वेठीस धरले जाते असेही ते म्हणाले. देशात लोकशाही आहे व लोकशाहीत चर्चा, वादविवाद आणि असहमती यांनाही सारखेच स्थान असले तरी असहिष्णुतेला अजिबात स्थान नाही, असेही रतन टाटा म्हणाले. याआधीही देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या संदर्भात आणि विरोधात देशभर मोठी चर्चा घडून आली होती. अनेक संवेदनशील लोकानी निषेध म्हणून त्यांना प्राप्त झालेले सरकारी सन्मान परतही केले होते. पण त्या काळी अशा लोकांची थट्टा केली गेली व काहींनी तर त्यांना थेट देशद्रोह्यांच्याच पंक्तीत नेऊन बसविले होते. आता तेच लोक रतन टाटांनादेखील देशद्रोही ठरविणार आहेत का? केन्द्रातील सत्ताबदलानंतर समाजातील एक वर्ग कानात वारे शिरल्यागत वागू लागला आहे. कोणालाही कोणतेही लेबल लावू लागला आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांना कोणीही हटकायला वा अडवायला तयार नाही. मध्येच कधीतरी पंतप्रधानांनी संदिग्ध स्वरुपाचे आवाहन करण्याने काहीही साध्य झालेले नाही हेच टाटांच्या विधानावरुन स्पष्ट होते.

Web Title: Intolerance dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.