विशेष लेख: 'घुसखोरां'ना अमेरिकेबाहेर जावेच लागेल!

By विजय दर्डा | Updated: February 3, 2025 06:33 IST2025-02-03T06:32:49+5:302025-02-03T06:33:40+5:30

फुटीरतावादी आणि बेकायदेशीररीत्या घुसून अमेरिकेत ठाण मांडलेल्या अन्य देशांच्या नागरिकांविरुद्ध राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे युद्ध पुकारले आहे.

Infiltrators must leave America! Special Article by vijay darda | विशेष लेख: 'घुसखोरां'ना अमेरिकेबाहेर जावेच लागेल!

विशेष लेख: 'घुसखोरां'ना अमेरिकेबाहेर जावेच लागेल!

-डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
ट्रम्प... ट्रम्प.. .ट्रम्प... संपूर्ण जगाचे लक्ष सध्या दहशत बसवणाऱ्या या एकाच नावाकडे आहे. उद्योजक असोत, प्रशासक असोत वा अन्य देशांचे राज्यकर्ते, ‘उद्या सकाळी हा माणूस काय निर्णय घेईल? कुणाच्या मुसक्या आवळण्यासाठी कुठली नवी घोषणा करेल?’ -याच विचाराने सारे त्रस्त आहेत. अलीकडेच ट्रम्प ब्रिक्स देशांवर चिडले. ‘डॉलरविरुद्ध दुसरे कुठले चलन उभे केले तर याद राखा’, अशी धमकीच त्यांनी दिली. राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांनी डॉलर गाडून टाकण्यासाठी युरो चलनामध्ये व्यवहाराला प्रोत्साहन दिले होते; सद्दाम यांचे काय झाले हे सगळ्या जगाने पाहिले. आपल्या देशाचे कोणी नुकसान करत आहे, हे अमेरिकेला सहन होत नाही.

‘एक बार मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नही सुनता’ - हा फिल्मी डायलॉग ट्रम्प यांच्याबाबतीत अत्यंत समर्पक ठरतो. निवडणुकीवेळी दिलेल्या प्रत्येक आश्वासनावर ट्रम्प वेगाने अंमल करत आहेत. बेकायदा मार्गानी अमेरिकेत घुसलेल्यांना पकडले जात आहे. सगळे दहशतीखाली आहेत. अमेरिकेत राहून भारताविरुद्ध कटकारस्थाने करणारे खलिस्तानीही त्यात आहेत; तसेच हमासचे समर्थन करणारे विद्यार्थीही! ‘फुटीरतावाद्यांचा कसा समाचार घ्यायचा हे मला कळते’, असे ट्रम्प यांनी बजावले आहे. 

ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाच्या एका व्हिडीओत  गुरपतवंत सिंह पन्नू केवळ उपस्थित नव्हता; तर त्याने खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या असे दिसते. त्यावर असा प्रश्न विचारला जात होता की, खलिस्तान समर्थकांविरुद्ध ट्रम्प यांची भूमिका काय असेल? पन्नू याला मारण्याच्या कथित प्रकरणावरून भारत आणि बायडेन प्रशासनात चांगलीच जुंपली होती. परंतु, ट्रम्प यांनी तत्काळ जाहीर करून टाकले की, एकेकाला शोधून बाहेर काढीन. 

गुन्हेगार आणि बेकायदा अमेरिकेत राहणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अमेरिकन पोलिसांनी अनेक धार्मिक स्थळांवर छापे मारले.  अमेरिका आणि कॅनडा धार्मिक आधारावर खलिस्तान समर्थकांना आश्रय देत असल्याचा आरोप कायम होत आला. ट्रम्प यांच्या कारवाईने बहुतेक दहशतवादी भारतीय तुरुंगात पोहोचतील, अशी आशा आता निर्माण झाली आहे. 

पन्नू अमेरिकेचा नागरिक आहे. त्यामुळे तो भले भारताच्या ताब्यात येणार नाही. पण कॅनडातले त्याचे साथीदार तर पकडता येतील. जस्टिन ट्रूडो हे पदावरून हटल्यानंतर आता अशी आशा करता येईल की, भारताने ज्या गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाची यादी दिली आहे ते गुन्हेगार कॅनडा आपल्या हवाली करेल.

ट्रम्प यांनी शिक्षणासाठी अमेरिकेत राहणाऱ्या आणि हमासचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवणे सुरू केले आहे. पॅलेस्टाइनच्या समर्थनासाठी होणाऱ्या सभांमध्ये हे विद्यार्थी भाग घेतात. अमेरिकन स्वातंत्र्याचा फायदा घेऊन दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या कुणालाही अमेरिकेत  थारा मिळणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. 

त्यांना मूळच्या देशात पाठवले जाईल आणि जर त्या देशांनी त्यांचा स्वीकार केला नाही तर त्यांच्यासाठी मोठ्या संकटाचा अध्याय सुरू होईल. अशा लोकांसाठी ट्रम्प यांनी कुविख्यात ग्वांतानामो किनाऱ्यावरील कारागृहात ३० हजार खाटा तयार ठेवायला सांगितले आहे. चोऱ्या आणि हिंसाचाराचा आरोप असलेल्या बेकायदा नागरिकांना सुनावणीच्या आधी कोठडीत टाकण्याची मुभा देणाऱ्या एका विधेयकावर ट्रम्प यांनी सही केली आहे.

गेल्या १० वर्षांत दरवर्षी साधारणतः २ लाख बेकायदा नागरिकांना अमेरिकेने त्यांच्या मूळ देशात पाठवले. बराक ओबामा यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात सुमारे १० लाख लोकांना अमेरिकेबाहेर काढले गेले. बायडेन यांच्या काळात ४.९ लाख आणि ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ७.७ लाख बेकायदा नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. ट्रम्प यावेळी सगळे विक्रम मोडीत काढतील, असे मानले जाते.

बेकायदा नागरिक मेक्सिकोतून सर्वाधिक संख्येने घुसतात. बेकायदेशीरीत्या तेथे राहणाऱ्यांमध्ये चीन, अल साल्वाडोर आणि भारतीयांची संख्याही मोठी आहे. २०२३ मध्ये अमेरिकेत बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २० हजारांपेक्षा जास्त भारतीयांना अटक केली गेली. वास्तविक अमेरिकेत बेकायदा घुसवण्यासाठी संघटित टोळ्या सक्रिय आहेत. हे लोक लाखो रुपये वसूल करतात. अमेरिकेत जाऊन कोट्यवधी रुपये कमवण्याच्या भ्रमात लोक लुटले जातात. आतापर्यंत  बेकायदा राहणाऱ्या १८ हजारपेक्षा जास्त भारतीयांची ओळख पटली आहे. परंतु, हा आकडा लाखाच्या घरात जाऊ शकतो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या चर्चेत हा मुद्दा आला होता. बेकायदा घुसलेल्यांचे राष्ट्रीयत्व निश्चित झाल्यानंतर भारत त्यांचा स्वीकारही करेल. पण अशा घुसखोरांबद्दल कुणाला सहानुभूती कशी वाटू शकेल? घुसखोरांच्या प्रश्नामुळे भारतही काही कमी त्रासलेला नाही. पण ती चर्चा पुन्हा कधीतरी! तूर्तास ट्रम्प यांचे साहस पाहता आशा बाळगूया की, त्यांनी उचललेले हे पाऊल संघटित टोळ्या आणि दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करेल. 

Web Title: Infiltrators must leave America! Special Article by vijay darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.